Sunday, September 2, 2012

आदिवासी महिलेने दिला सुदृढ बालिकेस जन्म

राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियाना अंतर्गत मेळघाटातील गावांमध्ये सुरु असलेले अभियान यशस्वी होत आहे. कुपोषणग्रस्त बालकांना पोषण आहारासोबतच गर्भवती महिलांना आहार व औषधोपचारा बाबत प्रत्येक कुटूंबात जाऊन मार्गदर्शन मिळत असल्यामुळेच चिखलदरा तालुक्यातील मोथा या गावातील सौ. सुखराय शामलाल बेलसरे या आदिवासी महिलेला तीन किलो सातशे ग्राम वजनाची सुदृढ बालिकेस जन्म दिला आहे. 

कुपोषणमुक्त मेळघाट ही संकल्पना साकार करण्यासाठी तत्कालीन महासंचालक नंदकुमार यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका,आरोग्य सेविका, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी तसेच ग्राम विकास अधिकारी यांचेसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करुन कुपोषण मुक्तीसाठी दशपदी हा कार्यक्रम तयार केला होता. या कार्यक्रमाची अंमलबजावणी अत्यंत दुर्गम गावात जाऊन कुपोषित बालके व त्यांच्या मातापित्यांना याबाबत माहिती देऊन कुपोषणमुक्तीसाठी करावयाच्या उपाययोजना घरापर्यंत पोहचविल्या होत्या. 

मोथा येथील या गोंडस मुलीला जन्म देणारी सौ. सुखराय बेलसरे या मातेने व तिच्या सर्व परिवाराने राजमाता जिजाऊ मिशन तर्फे राबविण्यात आलेल्या अभियाना अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शनाचे काटेकोर पालन केले असून अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सालेहा खान यांनी या घरास नियमित भेटी देऊन गर्भवती मातांना मार्गदर्शन केले. त्यामुळेच कुपोषणावर मात करुन सुदृढ मुलगी जन्माला आल्याची प्रतिक्रिया  बेलसरे परिवाराने दिली.

सुदृढ बालिकेस जन्म हा संदेश

कोणत्या अभियानाची अंमलबजावणी जर चांगल्या पध्दतीने राबविल्यास व त्याचे पालन योग्य केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू येतो. राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियानाचे मेळघाट कुपोषण मुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या अभियाना अंतर्गत मार्गदर्शक सुचनाचे योग्य पालन केल्यास जन्माला येणारी नवजात बालके निश्चितपणे कुपोषण मुक्त होतील ग्राम मोथा येथील सौ.सुखराय शामलाल बेलसरे (22) या आदिवासी महिलेनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. सदर महिलेनी सुदृढ बालिकेला नव्हे तर इतर महिलांनी यातून प्रेरणा घेण्याचा संदेश सुध्दा दिला.

नवजात मुलीचे नाव नंदिनी ठेवले 

मोथा गावाच्या इतिहासात एखाद्या बालकाचे ग्रामसभेत नामकरण होण्याची ही पहिलीच घटना होय. राजमाता जिजाऊ कुपोषण मुकत ग्रामअभियानाचे तत्कालीन महासंचालक नंदकुमार यांनी सदर अभियान मेळघाट मध्ये प्रभावीपणे राबविणे सुरु केले होते. त्यांच्याच नावावरुन चिखलदारा येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका सालेहा खान यांनी त्यांच्या कलपनेतून त्या मुलीचे नाव ग्रामसभेत नंदिनी ठेवले. या अभियानाबाबत सालेहा खान यांनी माहिती दिली. ग्रामसभेतच ग्रामवासीयांनी नंदिनी नावाचा नामकरण सोहळा साजरा करुन आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपसरपंच साधूरामपाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी सी.डी.ढोलणे, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष जगत शनवारे, अंगणवाउी पर्यवेक्षिका सालेहाखान,  ग्रामपंचायत. सदस्या सीता खउके, मारुती तिखाडे, अंगणवाडी सेविका अनिता कास्देकर, झिमाये, दहिकर, ग्रामसेवक सिंगलवार व ग्रामवासी उपस्थित होते. एखाद्या बालकाचा नामकरण सोहळा ग्रामसभेत होण्याची मेळघाटातीलच नव्हे तर, महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण बी.जी.सोमवंशी यांनी याबाबतची दाखल घेतली आहे.

तत्कालीन महासंचालक नंदकुमार यांची भेट 

राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियानाचे तत्कालीन महासंचालक नंदकुमार यांनी याबाबतची माहिती घेतली असून अंगणवाडी पर्यवेक्षिका सालेहा खान तसेच मोथा येथे जन्मलेली नवजात बालिका नंदिनी व तिच्या मातेची भेट घेतली. तसेच बेलसरे परिवारासोबत कुपोषणमुक्त मेळघाट अभियाना अंर्तगत केलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. कुपोषणमुक्त मेळघाट अंतर्गत विविध विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत नंदकुमार यांनी समाधान व्यक्त केले. 

अनिल गडेकर,जि.मा.अ.वर्धा 

No comments:

Post a Comment