महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे
आजुबाजुच्या विहिरींमधील पाण्याची पातळी वाढल्याने बाभुळगाव तालुक्यातील
चिमणापूर या गावातील शेतकरी वर्षातून दोन ते तीन पीके घेतात. पूर्वी
सिंचनाच्या अभावामुळे केवळ एकाच पीकावर अवलंबून राहावे लागत असलेल्या येथील
शेतकऱ्यांना आता बंधाऱ्यामुळे विविध प्रकारची पीके घेणे शक्य झाले आहे.
बाभुळगाव तालुक्यातील चिमणापूर हे गटग्रामपंचायतीतील छोटेसे गाव. या
गावातील धनराज हेमचंद सुखदेवे, गिरधर जयवंत शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या
एका नाल्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन
2012-13 मध्ये सिमेंट बंधारा बांधण्यात आला. पूर्वी या नाल्यातील सर्व पाणी
वाहून जायचे. त्यामुळे शेतालगतच नाला असूनही या पाण्याचा शेतकऱ्यांना
उपयोग होत नव्हता. बंधारा बांधल्यामुळे नाल्याला येणारे पाणी अडवल्या गेले
त्यामुळे सुखदेवे व शिंदे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील
विहिरीतील पाण्याच्या पातळीतील वाढ झाली. आता परिसरातील विहिरींमध्ये
बाराही महिने पाणी राहत असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मुख्य पिकासह
रब्बी व इतर पिके घेणे शक्य झाले.
पूर्वी एकच पिक घेणारे शेतकरी इतर दिवसांमध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांच्या
शेतावर मजुरीला जायचे किंवा रोजमजुरीसाठी शहराचा मार्ग पत्कारायचे.
बंधाऱ्यांमुळे बाराही महिने सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने भाजीपाल्याचे
पिकही घेता येत असल्याचे धनराज सुखदेवे व गिरधर सिंदे यांनी सांगितले.
बंधाऱ्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पातळीही वाढल्याने
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे
रोहयोच्या सिमेंट बंधाऱ्यामुळे आमच्या गावाला लाभ झाला तसाच लाभ इतरही
शेतकऱ्यांना होण्याच्यादृष्टिने बंधाऱ्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात
यावी, अशी अपेक्षा गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मंगेश वरकड प्र.जिल्हा माहिती अधिकारी यवतमाळ
No comments:
Post a Comment