शासनाच्या
प्रयत्नांमुळे विस्तारलेल्या बचत गट चळवळीच्या माध्यमातून अनेक हातांना
रोजगार मिळाला आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील महिला
विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करू लागल्या आहेत. रत्नागिरी
जिल्ह्यातील असगोली गावच्या महिलांनी असाच चाकोरीबाहेरचा मार्ग निवडून
खतनिर्मिती व्यवसाय यशस्वीपणे चालविला आहे.
गुहागरच्या असगोली गावातील महिलांनी 2004 मध्ये एकत्र येऊन श्री
व्याघ्रांबरी बचत गटाची स्थापना केली. प्रारंभी 25 रुपये एकत्र करून
त्यांनी बचतीस सुरुवात केली. पंचायत समितीचे गजेंद्र पवनीकर यांच्या
मार्गदर्शनामुळे या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी
पारंपरिक व्यवसायाला फाटा देऊन खतनिर्मिती करण्याचा निश्चय केला.
पंचायत समितीकडून 2005 मध्ये प्रारंभी 1 लाख 60 हजार आणि नंतर 40 हजार असे
एकूण 2 लाख रुपयाचे कर्ज मंजूर झाले. प्रारंभी या महिलांनी भाजीपाला
करण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र पाण्याअभावी तो व्यवसाय सोडून त्या
गांडूळ खतनिर्मितीकडे वळल्या. खतनिर्मितीसाठी युनिट तयार करण्यापासून सर्व
प्रकारचे श्रम या महिलांनी केले. कृषि विभागामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन
अभियानातून गांडूळ खतनिर्मितीसाठी 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले.
खतनिर्मितीसाठी गावातील शेण, केरकचरा या महिला स्वत: एकत्र करतात. शेण कमी
पडल्यास शेजारील गावातून गाडीने आणले जाते. गाडी भरण्याचे व रिकामी
करण्याचे कामही महिलाच करतात. डेपोची देखभाल, योग्यवेळी पाणी देणे, खताचे
पॅक करणे, विक्री करणे, हिशेब ठेवणे आदी सर्व कामे महिलाच करीत आहेत.
वर्षाला 25 टन खतनिर्मिती केली जाते. 7 हजार रुपये प्रति टन दराने हे खत
परिसरातील शेतकरी खरेदी करतात. महिला श्रमात कुठेही कमी पडत नाही,
मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले तर यापेक्षाही उंच झेप घेण्याची तयारी
असल्याचे गटाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर यांनी सांगितले. कुटुंबाची
जबाबदारी पेलतांना बचत गटाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यातही या महिलांना यश
आले आहे.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना एका चाकोरीबाहेरील व्यवसायात सतत 7 वर्षे
टिकून राहण्याची किमया श्री व्याघ्रांबरी बचत गटाने केली आहे. ग्रामीण
भागात नव्या जाणिवा घेऊन मजबूतीने पुढे जाणाऱ्या या गटाने जिल्हा तसेच
विभागीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळविले आहे. पण त्यापेक्षाही महत्वाचे
म्हणजे त्यांच्या यशातील सातत्यामुळे हा गट समाजाकडून कौतुकास पात्र ठरला
आहे.
-डॉ.किरण मोघे
No comments:
Post a Comment