Wednesday, December 26, 2012

.. सुरुवात दुसऱ्या धवलक्रांतीची


महाराष्ट्र राज्य सर्वच बाबतीत आघाडी घेणारे राज्य आहे. असाच एक उपक्रम म्हणजे राज्यात असणाऱ्या पशुधनाची गणना आणि त्या सर्व पशुंना क्रमांक देणे या उपक्रमाचे नाव महाराष्ट्र पशुधन ओळख व नोंदणी प्राधिकरण अर्थात मायरा होय.

आपल्या देशाची ओळख जगातील पहिल्या क्रमांकाचा दूध उत्पादक देश अशी असली तरी असणाऱ्या क्षमतेच्या तुलनेत उत्पादनाच्या बाबतीत आपल्या देशाचा क्रमांक खालून दुसरा आहे. याला अनेक कारणं आहेत. त्या सर्व कारणांवर एकत्रितपणे मात करण्याच्या हेतून ही पशुगणना आज सुरु झाली आहे.दुध उत्पादनात युरोपातील छोट्या-छोट्या देशांनी खूप मोठी क्रांती करुन दाखवली आहे. अमेरिकेत ऑस्टीन ही गायीची जात आहे. या गायीपासून वर्षात 10 हजार लिटरपर्यंत उत्पादन घेण्यासाठी अमेरिकेने संशोधन, लसीकरण, उत्तम दर्जाच्या वळुंपासून रेतन आदी पध्दतींचा वापर केला. कंधरी सारखी भारतीय गाय ऑस्ट्रीयात नेऊन या देशाने याच पदध्तीने 11 हजार लिटरपर्यंत उत्पादन क्षमता वाढवली. आपल्याकडे ही गाय 4 हजार लिटरपर्यंत दूध देते हे उल्लेखनीय आहे.

माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीची जोड आणि संशोधन यांच्या मदतीने राज्यात हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु झाला आहे, असे पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी याबाबत बोलतांना सांगितले.राज्यभरात पशु गणना करण्यात येईल. ज्यांच्या आधारे उत्तम जातीचे वळु नैसर्गिक संयोगासाठी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. यामध्ये मुऱ्हा, खिल्लार, लालकंधारी, देवणी तसेच गवळाऊ असे दर्तेदार जनूक असलेले वळू कोठे उपलब्ध आहेत याची माहिती या गणनेतून होणार आहे. पैदासक्षम गाईंच्याबाबत माहितीही यात होईल. या दोन्हीची सांगड घालून वळूची शारिरीक तपासणी व रोगमुक्तता यांच्या आधारावर रेतनासाठी वळू मिळणार याची खात्री शेतकऱ्यांना राहणार असल्याने भविष्यात दूध उत्पादन निश्चितपणे वाढणार आहे.

याच पध्दतीने शेळ्या, मेंढ्या, ससे, वराह, कोंबड्या, इमू, बटेर यांचीही गणना होत असून याबाबत प्रत्यक्ष शेतांवर आणि गोठ्यांवर जाऊन माहिती जमा केली जाईल. ती मायराच्या मुख्यालय असलेल्या खडकी, पुणे येथील कार्यालयात जमा होईल. शेतकऱ्यांना ही माहिती इंटरनेटव्दारे www.midb.in या संकेतस्थळावरील MAIRA या लिकव्दारे उपलब्ध होणार आहे.तीन दशकांपूर्वी गुजरात मधील आजंद पासून देशातील पहिल्या दुध क्रांतीची सुरुवात झाली. आता मायराच्या रुपाने ही दुसरी धवक्रांती संत्रानगरीत सुरु झाली असे म्हणावे लागेल.

- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment