एड्स
या भयानक रोगावर अजूनही खात्रीशीर इलाज उपलब्ध झाला नसल्यामुळे अत्यंत कमी
कालावधीत भीषण परिणाम या रोगाने दाखवून दिले आहेत. जवळपास एक कोटी लोक
आशिया खंडात या रोगाने बाधित आहेत. भारतात एड्सचे रुग्ण प्रामुख्याने
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यात आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरात एच. आय.
व्ही. बाधित संशयित व्यक्ती आढळून येतात. शासनाच्या आरोग्य विभागाने विविध
उपाययोजना केल्यामुळे सांगली जिल्ह्यातील एच.आय.व्ही. बांधितांची संख्या
कमी होत असल्याचे चित्र असून समाजाचा दृष्टीकोनही आता बदलू लागल्याचे
आकडेवारीवरुन दिसून येत आहे. जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या निमित्ताने
एड्स रोगाविषयी...
शासनाच्या वतीने व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने गेल्या काही वर्षात
एड्स या रोगाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा कार्यक्रम व प्रचार
केल्यामुळे या रोगाला काहीशा प्रमाणात आळा बसत असल्याचे आढळून येत आहे.
अलिकडे केलेल्या सर्व्हेक्षणात एड्स रोगाची लागण होण्याच्या प्रमाणात
जवळपास 56 टक्क्यांनी घट झाली आहे. ही आकडेवारी निश्चितच समाधानकारक आहे.
एड्स म्हणजे काय ? AIDS (एड्स)- ऍ़क्वायर्ड इम्यूनो डिफिसियन्सी सिंड्रोम.
HIV(एच.आय.व्ही.) - ह्यूमन इम्यूनोडिफिसियन्सी व्हायरस. एड्स म्हणजे एक अशी
स्थिती असते की, ज्यामध्ये एच.आय. व्ही. मुळे आपल्या प्रतिकार शक्तीमधील
टी हेल्पर सेल्स किंवा ज्याला सी. डी. 4 काऊंट म्हणतात, या कमी होतात.
त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. रोज होणारे लहान-सहान संसर्गही
माणूस सहन करु शकत नाही.
एड्सची लक्षणे - कारणे----
एड्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी होणे, ताप येणे, डायरीया, रात्रीचा
घाम येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. एड्सग्रस्त व्यक्तीबरोबर शारिरीक
संबंध ठेवणाऱ्या अन्य व्यक्तीमध्येही याची लागण होते. असुरक्षित शारिरीक
संबंध, दूषित रक्त, मातेच्या दुधात एच.आय.व्ही. व्हायरस असेल तर
एच.आय.व्ही. बाधित लागण झालेल्या गर्भवतीकडून तिच्या बाळालाही धोका उद्भवू
शकतो.
एच.आय.व्ही. होऊ नये म्हणून विवाहापूर्वी लैंगिक संबंध टाळावेत. विवाहित
असाल तर जोडीदाराशी प्रामाणिक राहणे ,इंजेक्शन घेताना निर्जंतूक सुईचा
आग्रह धरावा. ज्यावेळेस रक्ताची गरज असेल त्यावेळी दूषित रक्त वापरले जाणार
नाही याची खात्री करुन घेणे, लैंगिक संबंधावेळी निरोधचा वापर करणे आदी
गोष्टीची दक्षता घेतल्यास एच.आय.व्ही. पासून तुम्ही निश्चित सुरक्षित
राहाल.
यावर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त शून्य गाठायचा आहे हे घोषवाक्य असून
यापुढे नवीन एच.आय.व्ही. संसर्ग होऊ द्यायचा नाही. कलंक भेदभाव शून्यावर
आणणे, एड्सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे ही उद्दिष्टे
ठेवण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात 2004 मध्ये सर्वसाधारणपणे एड्सचे
प्रमाण 24.58 टक्के इतके होते तेच प्रमाण 2012 मध्ये 5.62 इतके खाली आले
आहे.
सांगली जिल्ह्याचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शाळा,
महाविद्यालयातून चर्चासत्रे, मेळावे, व्याख्याने आयोजित करुन तरुण
पिढीमध्ये या रोगाबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्याकरिता शाळा, महाविद्यालयातून वत्कृत्व, निबंध, पोस्टर्स आदी स्पर्धा
आयोजित करुन त्या माध्यमातूनही समाजात प्रबोधन करण्यात येत आहे. आरोग्य
यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल व स्वयंसेवी संस्थांच्या
सहकार्याने एड्स या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी विविध उपक्रमही हाती
घेण्यात आले आहेत.
जिल्हृयातील प्रमुख शहरात व तालुक्याच्या ठिकाणच्या प्रमुख मार्गावरुन
प्रभात फेरी व रॅलींचे आयोजन करुनही समाजामध्ये या रोगाच्या परिणामाविषयी
जागृती करण्यात येत आहे. तसेच या रॅलीमध्ये पथनाट्याचाही समावेश करण्यात
आला आहे. घडीपत्रिका व माहितीपुस्तिका, आकाशवाणी व स्थानिक केबल
वाहिन्यांच्या माध्यमातूनही सर्वसामान्यापर्यंत या रोगाबाबत समाजास माहिती
देवून त्यांच्यात जागृती करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेबरोबरच आरोग्य विभागाने एड्सचा प्रसार
रोखण्यासाठी विविध उपाययोजना करुन त्या राबविल्यामुळे जिल्ह्याने चांगलीच
प्रगती केली असली तरी या वर्षाच्या घोष वाक्याप्रमाणे शून्य प्रमाण
आणण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, महापालिकेचे आयुक्त संजय देवगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
पांडुरंग बुरुटे, एड्स कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत व
स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते जिल्ह्यातून एड्स रोगाचे उच्चाटन
करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
-- दिलीप घाटगे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,सांगली
No comments:
Post a Comment