पोलीस
विभागात अपर जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरुन सेवानिृत्त झाल्यानंतर शेतीकडे
वळलो. परंपरागत शेतीमधून उत्पादनाची हमी नसल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेतील
सुरुवात केली. एक एकरात तायवान पपईचे बाराशे झाडे लावली. पपईची बाग बहरली
असून सुमारे दोन लाखाच्या उत्पादनाची हमी मिळाली.
केळापूर (वर्धा) येथे वडिलोपार्जित शेती होती. परंतू शासकीय नौकरीमुळे ती
दूर्लक्षित होती. सेवानिवृत्ती नंतर शहरात न राहाता शेतीवरच घरबांधून
आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. आज पपई, मोसंबी, लिंबू, उस
आदी सोबतच हळद व तुरीचे पीक घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासोबत
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रियपद्धतीने शेती निश्चितच लाभदायक ठरत
असल्याचा विश्वास हनमंतराव महादेवराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
एक एकरात तायवान -786 या प्रजातीचे एक हजार दोनशे झाडे लावली. आज सहा ते
सात महिन्यानंतर संपूर्ण बाग फळांनी बहरली आहे. एका झाडाला 20 ते 25 पपई
लागल्या असून सरासरी 4 ते 5 किलो वजनची पपई आहे.
सर्व सामान्य जनतेला पपई सारख्या फळाची अत्यंत आवड असल्यामुळे तालुका व
जिल्हास्तरावर विक्रीची सुविधा उपलब्ध आहे. पपईच्या लागवडीबद्दल सांगतांना
हनुवंतराव म्हणाले की, कृषी विभागाकडून पपई लागवडीबद्दल मार्गदर्शन मिळाले.
त्यानुसार शेतीची मशागत करुन शेणखत टाकले. डिसेंबर महिण्यात तायवान -786
जातीच्या पपईची रोवणी केली. नियमित झाडाची निगा राखण्यासोबत पोषण द्रव्याची
मात्रा दिल्याने संपूर्ण बाग आज बहरली आहे.
संत्रा, मोसंबी या फळबागाप्रमाणे पपईच्या बागासुद्धा व्यापाराकडून खरेदी
केल्या जातात. नागपूर, दिल्ली, अमरावती येथील व्यापारी झाडावरील फळांच्या
संख्येनुसार बागेची रक्कम ठरवितात. चार ते पाच किलोच्या एका झाडाला 20 ते
25 पपई लागतात. एक क्विंटलसाठी सरासरी चारशे ते पाचशे रुपये दराप्रमाणे
सरासरी दीड ते दोन लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आर्वी जवळील कदम यांच्या
एक एकरातील पपईचा बगिचा सहा लाख रुपयाला विकला गेला. त्यांच्या प्रेरणेनेच
पपईची बाग फुलविण्याची माहिती हनुमंतराव ठाकरे यांनी दिली.
पपईच्या झाडांची व्हायरस, वादळ तसेच माकडासह इतर प्राण्यापासून संवर्धन
करावे लागते. पपईच्या वाढीसाठी गांडूळखत, पोटॅश आदी पुरक अन्नद्रव्य दिले
तर पपईची वाढ चांगल्या प्रकारे होते.
शेतकरी शेतात प्रामाणिकपणे राबतो. पण परंपरागत शेतीमध्ये त्याला
आवश्यकतेनुसार उत्पादन होत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय खर्चिक होत आहे.
पारंपरिक शेतीऐवजी सिंचनाची सुविधा निर्माण करुन आधुनिक पद्धतीने शेती
केल्यास शेती निश्चितच फायदेशीर ठरु शकते, असा विश्वास प्रगतिशील शेतकरी
हनुमंतराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी,वर्धा
No comments:
Post a Comment