Wednesday, December 5, 2012

एकात्मिक बाल विकास सेवा योजना

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत कोणते उपक्रम राबविले जातात त्याची माहिती मागील लेखात घेतली. या लेखात कुपोषण निर्मितीची कारणे आणि कुपोषण निर्मुलनाचे उपाय याचा आढावा घेतला आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत यापूर्वी मुलांना 1,2,3 व 4 श्रेणीमध्ये विभाजन करण्यात येत होते. श्रेणी 3 व 4 मधील मुलांना अतिकुपोषित संवर्गात मोजले जायचे. परंतु शासनाने जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन निकषाची अंमलबजावणी करण्यास जून 2010 पासून सुरुवात केली आणि नवीन निकषांप्रमाणे मुलांची फक्त 3 भागात श्रेणीकरण करण्यास सुरुवात केली. त्याच प्रमाणे मुलांच्या आणि मुलींच्या वाढीचे निकष वेगवेगळे ठेवणे सुरु केले. नवीन निकषात 3- एसडी म्हणजे तीव्र कमी वजनाचे बालक , 2 एसडीमध्ये मध्यम कमी वजनाचे बालक व सर्वसाधारण बालक असे श्रेणीकरण केले जात आहे.

जुलै 2010 च्या मासिक प्रगती अहवालानुसार 6689980 मुलांचे वजन घेण्यात आले. त्यात तीव्र कमी वजनाची बालके 3,15,373(4.71 टक्के) तर डिसेंबर 2011 मध्ये 62,24,787 वजन केलेल्या मुलांपैकी 1,44,961 मुले तीव्र कमी वजनाची आढळली. हे प्रमाण 2.33 टक्के होते. यावरुन कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे फलित होय. बालमृत्यूच्या प्रमाणातही 2006 पासून आतापर्यंत सातत्याने घट झाली आहे.

कुपोषण निर्मुलनाचे उपाय
• 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे 100 टक्के सर्वेक्षण केले जाते.
• कुपोषित बालकांना भरती करण्याकरिता बाल विकास केंद्राची स्थापना.
• कुपोषित बालकांना गाव पातळीवर भरती करण्याकरिता डे-केअर सेंटरची स्थापना.
• पुरक पोषण आहार दोन वेळा विभागून दिला जातो.
• बालकांना पुरक पोषण आहार अंगणवाडी केंद्रात खाण्याकरिता सक्ती केली जाते.
• स्वास्थगट व महिला मंडळ स्थापन करुन त्यांचा सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला जातो.
• जनजगृती करण्याकरिता अंगणवाडी स्तरावर दरमहा माता बैठकांचे आयोजन केले जाते.
• समुदाय वृध्दी पत्रकाद्वारे बालकांच्या वाढते सामाजिक लेखा परिक्षण केले जाते.
• सहा महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान देण्याकरिता आरोग्य शिक्षण दिले जाते.
• 6 महिन्यानंतर अर्ध वार्षिक वाढ दिवस साजरा करुन पुरक पोषण आहाराची सुरुवात केली जाते.
• जंतनाशक औषधाचे वाटप
• वयोगटानुसार जीवनसत्व ‘अ’चे नियमित वाटप करण्यात येते.
• अंगणवाडीतील बालकांची दर तिमाही आरोग्य तपासणी केली जाते.
• कुपोषण श्रेणी 3 व 4 च्या बालकांची तसेच वजनवाढ नसलेल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.
• खाजगी बालरोग तज्ज्ञांमार्फत कुपोषण ग्रेड 3व 4 बालकांची तपासणी केली जाते.

कुपोषणाची कारणे
• जन्मत: एक तासाच्या आत स्तनपान न करणे
• स्तनपान न देणे किंवा अपुरे देणे
• कमी वयात लग्न व अशा मातेच्या पोटी जन्माला येणारे मुल.
• वारंवार होणारे बाळांतपण
• पुरक आहार खूप उशिरा सुरु करणे
• आहाराविषयक व मुलांच्या पोषणाविषयी गैरसमजूती, अंधश्रध्दा व अपूरी माहिती.
• कुटूंबातील अपूरा व कमी प्रतीचा आहार
• संसर्गजन्य आजार उदा. अतिसार, गोवर, श्वास संस्थेचे आजार
• गरीबी
• बेरोजगारी
• अशिक्षितपणा
• समाजाचा सहयोग नसणे
• गर्भधारणेनंतर त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क न करणे.
• मातेच्या प्रसूतीपूर्व व प्रसूर्तीपश्चात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे.

कुपोषणाची कारणे समजली की त्यावर उपाय एकात्मिक बालसेवा योजनेंतर्गत केले जातात. यामुळे कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यास मदत होत आहे. राज्यातील अतिसंवेदनशील आदिवासी क्षेत्रातील बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी जादा प्रमाणात पूरक पोषण आहार देण्यात येतो. किती लोकसंख्या असेल तिथे अंगणवाडी सुरु करावी याचे निकष ठरविण्यात आले आहेत. सर्व साधारण ग्रामीण व शहरी क्षेत्रात 400 ते 800, आदिवासी क्षेत्रात 300 ते 800 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी सुरु करण्यात येते. त्याच प्रमाणे 150 पेक्षा जास्त व 400 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या वस्तीत एक अंगणवाडी सुरु केली जाते व आदिवासी क्षेत्रात 150 ते 300 च्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या वस्तीत एक या प्रमाणे मिनी अंगणवाडी केंद्र सुरु करता येते.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे राज्यात ग्रामीण क्षेत्रात 364, आदिवासी भागात 85 तर नागरी क्षेत्रात 104 प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राज्यात ग्रामीण प्रकल्प आणि आदिवासी प्रकल्प जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमार्फत राबविण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषदांना प्रतिवर्षी 5 टक्के अभिकरण शुल्क देण्यात येते.

0 ते 6 महिने वयाच्या मुलांसाठी - माता व बाल संगोपनाच्या दृष्टीने आहार व पोषण पध्दतीबाबत वर्तनात्मक बदल घडवून आणण्याकरिता स्तनपानाबाबतचे मार्गदर्शन, स्तनपानाची योग्य पध्दती, बाळ जन्मल्याबरोबर एक तासाच्या आत स्तनपान, सहा महिने निव्वळ स्तनपान, दोन वर्षापर्यंत सतत स्तनपान इ. बाबींवर प्रबोधन, जनजागृती करुन जन्मानंतर उद्भवणारे बाळाचे कुपोषण टाळण्याचा प्रयत्न केला जातो.

6 महिने ते 3 वर्ष वयाच्या मुलांसाठी – घरी नेण्याचा आहार दिला जातो. या आहारातून 12 ते 15 ग्रॅम प्रथिने व 500 किलो कॅलरी उष्मांक मिळतात. तसेच हा आहार सूक्ष्म पोषण तत्वांनी रासायनिक पध्दतीने समृध्द, स्वच्छतापूर्ण वातावरणात तयार केलेला असतो.

3 वर्ष ते 6 वर्ष मुलांसाठी- महिला मंडळ, स्वयंसहाय्यता महिला बचत गटांमार्फत गरम ताजा सकस आहार व सकाळचा नाष्टा अंगणवाडीत दिला जातो.

6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या मुलांसाठी- फोर्टीफाइड केलेले स्वच्छ असे 800 किलो कॅलरी असणारे व 20 ते 25 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार घरी खाण्यासाठी दिला जातो.

3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या मुलांसाठी- सकाळी नियमित, ताजा गरम सकस आहार अंगणवाडीत दिला जातो. तसेच फोर्टीफाईड केलेले व स्वच्छतापूर्ण वातावरणात बनविलेला 800 कॅलरी व 20 ते 25 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार घरी खाण्यासाठी दिला जातो.

गर्भवती माता व स्तनदामाता -यांना देखिल 600 कॅलरी व 18 ते 20 ग्रॅम प्रथिने असलेला आहार घरी खाण्यासाठी दिला जातो.माहिती शिक्षण व संवाद- महिला व बाल विकास आयुक्तालयाच्यावतीने’लोक स्वास्थ’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करुन ते प्रत्येक अंगणवाडी केंद्रात पाठविले जाते. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत आहार, आरोग्य, स्वच्छता, माता बाल आरोग्य या बाबतची वैज्ञानिक जाणीव जागृतीसाठी हे नियतकालिक प्रकाशित केले जाते. या मासिकाद्वारे जनमानसाचे आरोग्य व आहार शिक्षण होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकल्पामध्ये ‘सामुदायिक वृध्दी ’पत्रकाचे वितरण करण्यात येते. यामुळे बालकांना आपल्या पाल्याची श्रेणी समजण्यास मदत मिळते. अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयाच्या बालकांना पूर्व शालेय शिक्षण देण्यासाठी तक्ते, फ्लिपचार्ट, फळे, रंगकाम, वह्या इ. साहित्य पुरविले जाते.

पूरक पोषण आहार- वास्तविक मुख्य आहार घरातूनच मिळणे गरजेचे असते. तथापि, घरातून चांगला आहार मिळत नाही व कुपोषण सुरु होते. हे थांबविण्यासाठी पूरक पोषण आहार एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून दिला जातो. हा पूरक आहार लाभार्थ्यांना अंगणवाडी मध्येच खाऊ घातला जातो. 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी बालकांना तसेच तीव्र कमी वजनाच्या मुलांना सकाळी 9, दुपारी 12 आणि दुपार 3 वाजता पूरक पोषण आहार दिला जातो. सायंकाळी 6 वाजताचा आहार घरी खाण्यासाठी दिला जातो. दिवसातून चार वेळा पोषण आहार दिला जातो. सकाळी अंगणवाडीत नाश्ता सुरु करण्यात आला आहे. नाश्त्यात कुरमुरा लाडू, चिवड, केळी देण्यात येतात.

6 महिने ते 3 वर्षांच्या लाभार्थी बालकांना त्याचप्रमाणे स्तनदा, गर्भवती मातांना घरी नेऊन खाण्यासाठी शिरा, उपमा, सुरवडी, सन्तू असा आहार दिला जातो. गावकरी, महिला मंडळ यांच्या सहकार्याने अंगणवाडीमधील पूरक पोषण आहारात आणखी पोषणमूल्य वाढवित यासाठी गूळ, पालक, तुळशीची पाने, शेवग्याच्या शेंगा इत्यादीचा समावेश केला जातो.

अंगणवाडीत पुरविण्यात येणारा माल/ थेरेप्युटिक फुड यांच्या गुणवतेसंबंधी संनियंत्रण करण्यासाठी मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी नियमितपणे पाठवून गुणवत्तेसंबंधी खबरदारी घेतली जाते. लाभार्थ्यांना विहित पूरक पोषण आहारात पोषणमूल्य मिळण्याची खात्री करण्यात येते. तसेच तो ताजा व रुचकर राहील याचीही काळजी घ्यायची असते.
पावसाळयात अतिदूर्गम व आदिवासी क्षेत्रात डोंगराळ भागातील गावात पावसाळयाच्या दरम्यान 3 महिने पुरेल एवढया पूरक पोषण आहारासाठी आवश्यक धान्यादी मालाचा पुरवठा तसेच 2 महिने पुरेल एवढ्या अन्नाचा साठा उपलब्ध केला जातो. त्याच प्रमाणे महिलांना घरी उपलब्ध असलेल्या खाद्य पदार्थांमधून सकस आहार कसा तयार करता येईल व अतिकुपोषित बालकांना खाऊ घालावयाच्या आहारासंबंधी जागरुकताही एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत केली जाते.



आकाश जगधने
सहाय्यक संचालक(माहिती)

No comments:

Post a Comment