Saturday, December 31, 2011

द्रुतलयीतील मैफल...

भारतातील गांधीजींचा पहिला पुतळा घडविण्याचा मान वयाच्या २२ व्या वर्षी मिळविणारा एक तरूण शिल्पकार आजमितीला ८४ वर्षाचा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध असून जागतिक किर्तीचा शिल्पकार आहे. निरनिराळ्या तत्वांना आपण शिल्पस्वरूप देऊ शकतो आणि आचरणात आणावी अशी तत्वे तर शिल्पाचे विषय नक्कीच होऊ शकतात, अशी सकारात्मक मानसिकता आपल्या बोलण्यातून व्यक्त करतो. थोर व्यासंगी, आपल्या तत्वांचा आग्रह धरणारे, मनाने कवी, तर वृत्तीने इतिहास संशोधक आणि तत्ववेत्ते असलेले शिल्पकार श्री. सदाशिव साठे यांच्याशी साधलेला हा संवाद...
माझं आतापर्यंतच बहुतेक काम व त्यातून होणारी निर्मिती बहुतांशी पारंपरिक पद्धतीनेच झाली. आपल्या देशात शिल्पकला ही अजूनही पारंपरिक शैलीच्या बाहेर पडलेली नाही. नवकलेच्या सृजनशील निर्मितीचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर सुरू झाले असले तरी त्याला खर्‍या अर्थाने लोकमान्यता व लोकाश्रय मिळत नाही. समकालीन (contemporary) विशुद्ध वा अमूर्त शिल्पकलेला अत्यंत मर्यादित आश्रय मिळतो. कलादालन, कलाप्रदर्शन यामध्येच ती मांडलेली दिसतात. पण शिल्पाची खरी जागा असते उघडय़ावर, नैसर्गिक छायाप्रकाशात, त्याच्या भव्य आकारात, त्याचं चिरकालीनत्व सामावलेल असतं.

गेली पन्नास वर्षे कलानिर्मिती करीत असताना एक कलाकार म्हणून मला खूप आनंद व समाधान लाभलं. अनेक व्यावहारिक व तांत्रिक अडचणींना आणि आव्हानांना तोंड देऊन मी ती कामे यशस्वीरीतीने पूर्ण केली. अडचणींचे दु:ख कधीच वाटले नाही. उलट त्यांच्यावर मात करतांना एका विलक्षण धुंदीचा अनुभव मी घेतला.
तरीसुद्धा, आज मागे वळून बघतांना त्रयस्थपणे शिल्पकलेच्या सामाजिक संदर्भात विचार करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, शिल्पकलेची जाण आमच्या समाजात अभावानेच दिसते. शिल्पकला ही इतर नृत्य, संगीत, वाङ्मय, चित्र कलांइतकीच प्रतिष्ठित आहे, याचा कुणी गांभीर्याने विचार करीत नाही. सर्वसाधारण माणसांपर्यंत शिल्पकलेची महती पोहोचली पाहिजे. यासाठी जुन्या नव्या शिल्पकृतींचा आस्थेने सांभाळ केला पाहिजे.

शिल्पालय हे म्युझियम कल्याणमध्ये गांधी चौकात आहे. कलाप्रेमी लोकांना एकत्र आणणे आणि सर्व सामान्य लोकांना एकत्र आणून त्यांच्या कलेविषयी आवड निर्माण करणे हा म्युझियम निर्मितीचा मुख्य हेतू आहे. मी आत्तापर्यंत निर्माण केलेल्या जवळजवळ १५० कलाकृती इथे जतन करून ठेवल्या आहेत. या शिल्पालयाच्या इमारतीत एक छोटेसा व्याख्यान हॉल असून तिथेच फिल्म दाखविण्याची ही सोय आहे. विद्यार्थी आणि कलाप्रेमींना दृकश्राव्य माध्यमातून कलेचा आस्वाद घेता येईल अशी ही व्यवस्था आहे. ह्या शिल्पालयाची माहिती आपल्याला shilpalay.org या वेबसाईटवर पहाता येईल. 

शिल्पकलेविषयी म्हणावे वाटते की, आजच्या महापुरूषांची स्मारके करताना नुसते पुतळे न उभारता ज्या कारणासाठी ही थोर मंडळी झटली ते विषय घेऊन ती बनवावीत. असे विषय, अशी आव्हाने आपण शिल्पकारापुढे उभी करून पहा, नव्या दमाचे प्रतिभावान कलावंत पुढे येतील. नवनव्या संकल्पना आकार घेतील व प्रतिभाशून्य डबक्यात अडकून पडलेल्या या कलेला मोकळी वाट मिळेल. आपल्या पायांनी नव्या वाटा शोधीत ही कला प्रवाहित होईल. वेरूळ ही लेणी नुसती संख्येने मोठी नाहीत तर आशयाच्या दृष्टीने त्या पेक्षाही मोठी आहेत. शतकामागून शतके कलावंत दगडाला आकार देत होते, पण त्यांचे विषय संपले नाहीत. प्रतिभा खुंठली नाही. सामाजिक संस्कृतीबरोबर कलेची अभिव्यक्ति प्रवाहित व प्रगत होत गेली. 
खरे म्हणजे ही आमची कला परंपरा, ही आमची संस्कृती! या परंपरेत आमची आजची शिल्पकला कोठेतरी जवळपास उभी राहू शकते का? कुठले तरी नाते आम्हाला घारापुरीच्या परंपरेशी जोडता येईल का? हा खरा आजचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 

  • प्रतिभा वाघ 
  • कृषि प्रदर्शनातून आधुनिक तंत्रज्ञान

    डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातंर्गत गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पटांगणावर २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात सर्वप्रथम हजेरी लावणाऱ्या शेतकऱ्याच्या हस्ते आले. या प्रदर्शनात राज्यातील अनेक जिल्ह्यातील कृषी विषयक माहिती देणारी दालनं लावण्यात आली होती. अतिमागास म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणुन घेतली. दरम्यान गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम असल्याने येथील शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनातील माहिती देण्यासाठी अनेक तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने एसटी महामंडाळाच्या बसगाड्यांनी शेतकऱ्यांची ने-आण करण्याची सोय करण्यात आली होती. 

    या प्रदर्शनात विदर्भ तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राचे तसेच विविध संस्थांची दालनं लावण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांना चित्रफितीद्वारे कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. तसेच फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनऔषधी, कापूस, ज्वार कडधान्य, तेलबिया, पाणलोट, ऊस संशोधन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, कुक्‍कुटपालन, कृषी अवजारे, मत्स्य संवर्धन, एकात्मिक किड व्य्वस्थापन आदी दालने कृषी प्रदर्शनात लावण्यात आले आहे. 

    या तीन दिवसांमध्ये कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. येथील शेतकरी पारंपारिक पध्दतीने प्रामुख्याने धानाचे पिक घेतात आणि ते पण वर्षातून एक वेळेस कारण जिल्ह्यातील सिंचानाच्या सुविधा उपलब्ध नाही. परंतु या प्रदर्शनामुळे येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात येणाऱ्या विविध प्रकाराची कृषी विषयक माहिती मिळाली. यामुळे प्रदर्शनात हजेरी लावत असलेला प्रत्येक शेतकऱ्यास त्यास उपयुक्त माहिती मिळाली असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. गडचिरोलीमध्ये प्रथमच राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावली होती. 

    या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फिरत्या कृषी चिकित्सालयाचे (मोबाईल व्हॅन) प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. याद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावरच मृद व जलपरीक्षण करुन त्याचा अहवाल देण्यात येणार आहे. तसेच पिकावरील रोग, किडी, कृषी अवजारे आदींची माहिती देखील चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. तसेच विद्यापीठातील विविध प्रकाशने देखील वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. 

    याबरोबरच कृषि विज्ञान केंद्राच्या परिसरात विविध पिकांचे प्रात्य‍‍‍क्षिक क्षेत्र लावले होते. यामध्ये तूर, लाखोरी, ज्वारी, मका, जवस, चना, वाटाणा आदी पिकांचे प्रात्याक्षिक लावण्यात आले होते. यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी प्रात्याक्षिक क्षेत्राला भेट देऊन पिकांची माहिती जाणून घेतली. यामध्ये कृषि उत्पादन तंत्रज्ञान, जल व मृद संधारण तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, जैविक खते, किटकनाशके, सेंद्रिय निविष्ठा आदी माहिती पिक प्रात्याक्षिकाद्वारे देण्यात आली. यामध्ये कृषि विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर माहिती दिली. पिकासाठी किती पाण्याची आवश्यकता असते ? किती दिवसात पीक निघणार ? पिकाला कोणते खत द्यावे ? आदी विषयावरील माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली. 

    या तीन दिवसीय कृषि प्रदर्शनात राज्यातून भागत घेतलेल्या विविध गटातील उत्कृष्ट दालनांना आयोजन समिती मार्फत यावेळी गौरविण्यात आले.

    या प्रदर्शनास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सनदी अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली. यामध्ये जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, जेष्ठ समाजसेवा डॉ. अभय बंग यांचा समावेश होता. 

    विविध विषयावर लावण्यात आलेल्या १५० दालनाच्या या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचा अतिदुर्गम क्षेत्रातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा झाला असून त्यांना विविध पिकांचे उत्पादन घेण्याबाबतची माहिती देखील मिळाली. 

  • अरुण सूर्यवंशी
  • दर्दी रसिकांमुळे रंगला परभणी ग्रंथोत्‍सव

    परभणीच्‍या जिल्‍हा माहिती कार्यालय व मराठी भाषा विभागांतर्गत महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या संयुक्‍त विद्यमान परभणी येथील रघुनाथ सभागृहात 'ग्रंथोत्‍सव २०११' हा साहित्‍यविषयक उपक्रम यशस्‍वीपणं आयोजिण्यात आला.

    १४ ते १६ डिसेंबर या तीन दिवसांच्‍या कालावधीत दर्दी रसिकांची उपस्‍थिती हे या उपक्रमाचं वैशिष्‍ट्य ठरलं. १४ डिसेंबर रोजी सकाळी जिल्‍हाधिकारी डॉ.शालीग्राम वानखेडे यांच्‍या हस्‍ते तर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी एन.पी.मित्रगोत्री यांच्‍या उपस्‍थितीत ग्रंथोत्‍सवाचं उद्घाटन झालं. यावेळी वनीकरण विभागाचे उपसंचालक डॉ. देसाई, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी अजेय चौधरी, गणेश सार्वजनिक वाचनालयाचे संदिप पेडगावकर, डॉ. आनंद देशपांडे, महेश देशमुख, विजय देशमुख, एस.एस. पवार आदी उपस्‍थित होते. सायंकाळी कवीश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्‍या कवितांवर आधारित 'रसयात्रा' हा कार्यक्रम झाला. 

    गायक श्रीकांत देशपांडे यांनी 'सर्वात्‍मका सर्वेश्‍वरा' हे शब्द आळवून सुरु केलेल्‍या कवीश्रेष्‍ठ कुसुमाग्रजांच्‍या काव्‍यसागरात सर्व रसिक मनसोक्‍त डुंबत होते. सुमारे दीड तास चाललेली ही काव्‍यरसयात्रा संपूच नये, असं रसिकांना वाटत होतं.श्रीकांत उमरीकर यांचं बहारदार सूत्रसंचालन, इंद्रजीत भालेराव आणि रविशंकर झिंगरे यांचं नाट्य-पद्य-गद्यमय सादरीकरण यामुळं कवी कुसुमाग्रज आणि नाटककार वि.वा.शिरवाडकर या एकाच व्‍यक्‍तीचे विविधांगी पैलू रसिकांसमोर सोदाहरण उलगडण्‍यात आले. 

    १५ डिसेंबरला सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी 'गरज वाचनसंस्‍कृती जोपासण्‍याची' या विषयावर वक्‍तृत्‍व स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत वैष्‍णवी देशमुख प्रथम, नितीन चव्‍हाण द्वितीय तर पंजाब खानसोल तृतीय पुरस्‍काराचे मानकरी ठरले. ऋतुराज कुलकर्णीला उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार मिळाला.

    यावेळी संवादफेक, आवाजातील चढ-उतार, संवादानुरुप चेहर्‍यावरील भाव, आवश्‍यक त्‍या शारीरिक हालचाली यातून मधुकर उमरीकर यांनी वक्‍तृत्‍व स्‍पर्धेसाठी आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना वास्‍तुपाठच घालून दिला. त्‍यांनी 'श्‍यामची आई' या प्रयोगातील ' श्‍याम चोरी करतो' हा आणि शेवटचा प्रवेश सादर केला. त्‍यातील ह्रदयद्रावक प्रसंगानं उपस्‍थितांच्‍या डोळ्यात अश्रू उभे राहिले, पण त्‍याच वेळी वक्‍तृत्‍व सादर करताना कोणत्‍या गुणांची आवश्‍यकता आहे, याचं थेट प्रात्‍यक्षिकच सर्वांना पहावयास मिळालं. स्‍पर्धेच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी समन्‍वयक म्‍हणून डॉ. आनंद देशपांडे यांनी तर परीक्षक म्‍हणून श्रीमती अर्चना डावरे, हनुमंत एम. कुलकर्णी, विजय उत्‍तमराव देशमुख यांनी जबाबदारी पार पाडली.

    सायंकाळी निमंत्रितांचं कविसंमेलन झालं. प्रेमभर्‍या कवितांनी प्रारंभ झालेल्‍या काव्‍यसंध्‍येत न पाहिलेल्‍या आईच्‍या आठवणींनी व्‍याकूळ झालेल्‍या तसंच शेतकर्‍यांची व्‍यथा-कथा मांडणा-या संवेदनशील कवितांनी परभणीकर मोहरुन गेले. 'काव्‍यसंध्‍या' या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ. रावसाहेब चोले हे होते. यावेळी केशव खटींग, रेणू पाचपोर, मोहन कुलकर्णी, केशव वसेकर, प्रा. संजय चिटणीस, संतोष नारायणकर, कमलताई कुलकर्णी, सरोजनी करजगीकर, आत्‍माराम कुटे, वसुधा देव, महेश कोरडे-पाटील, दादासाहेब सादोळकर, बालासाहेब गायकवाड, महेश देशमुख आदींनी आपल्‍या कविता सादर करुन श्रोत्‍यांची दाद मिळवली.

    १६ डिसेंबरला सकाळी ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आसाराम लोमटे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली 'माध्‍यमांचे वाचक चळवळीवरील परिणाम' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये ज्‍येष्‍ठ पत्रकार डी. एन. शिंदे, हेमंत कौसडीकर, संदिप पेडगावकर आदी सहभागी झाले. समारोपप्रसंगी विनोद कापसीकर, नितीन धूत, गजानन निशानकर, दत्‍ता लाड, प्रसाद आर्वीकर, डॉ. धनाजी चव्‍हाण, मंचक खंदारे आदी उपस्‍थित होते. यावेळी वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत यश संपादन केलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रशस्‍तीपत्र व रोख रक्‍कम देऊन गौरवण्‍यात आलं. 

    ग्रंथ हा माणसाचा खरा मित्र आहे. समाजाची बौद्धिक उंची वाढवण्‍यासाठी वाचन हा एक पर्याय मानला जातो. ग्रंथच माणसांना घडवितात, माणसांच्‍या जाणीवांच्‍या कक्षा रुंदावण्‍याचं काम करतात. हे लक्षात घेऊन ग्रंथोत्‍सवातील सर्व कार्यक्रम त्‍याभोवती केंद्रीत करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक प्रा. रामदास डांगे, देविदासराव कुलकर्णी, इंद्रजीत भालेराव, श्रीकांत उमरीकर, आसाराम लोमटे, विनोद कापसीकर, अशोक कुटे, संतोष धारासूरकर, हेमंत कौसडीकर, नितीन धूत, सतीश जोशी, सूरज कदम, दत्‍ता लाड, सुरेश जंपनगीरे, प्रवीण चौधरी, धाराजी भुसारे, चंद्रकांत डहाळे, राजकुमार हट्टेकर, रामेश्‍वर पवार , संदिप पेडगावकर, डॉ. आनंद देशपांडे, महेश देशमुख, मधुकर उमरीकर, सुरेशचंद्र गुप्‍ता, प्रवीण देशपांडे, मल्‍हारीकांत देशमुख, त्र्यंबक वडजकर, आनंद पोहनेरकर, सुरेश मुळे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, गणेश पांडे, संजय भराडे, शरद काटकर, सुरेश मगरे, विजय दगडू तसंच परभणी आकाशवाणी केंद्राचे संचालक सतीश जोशी यांचं सहकार्य लाभलं. अशा प्रकारच्‍या कार्यक्रमांच्‍या आयोजनाचा कोणताही पूर्वानुभव नसताना जिल्‍हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रणचालक गोविंद कुलकर्णी, प्रवीण भानेगावकर, एकनाथ मुजमुले, चव्‍हाण, निरडे यांनी घेतलेल्‍या मेहनतीमुळं परभणीकरांना या कार्यक्रमाचा आस्‍वाद घेता आला. 

    'सेलिब्रिटीज'ना पाचारण करुन हा ग्रंथोत्‍सव केवळ उत्‍सवी किंवा गर्दीचा न बनवल्‍यामुळं खर्‍या दर्दी परभणीकरांना विविध कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटता आला, अशी रसिकांनीच दिलेली पावती हेच या उपक्रमाचं यश मानावं लागेल. 

    - राजेंद्र सरग

    सैनिकांचे गाव 'भादोला'

    प्रत्येक गावाला आपली एक वेगळी ओळख असते. बुलडाणा-खामगांव मार्गावर बुलडाणा शहरापासून सात कि.मी. अंतरावर असलेले भादोला गाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. भादोला गावातील अनेक तरुण सैन्यदलात आहेत. सद्यस्थितीत ६५ तरुण सैन्यदलात भरती होऊन आपल्या मायभूमीचे रक्षण करीत आहेत. दरवर्षी साधारण ५ ते १० तरुण सैन्यात भरती होतात. कोणतेही प्रशिक्षण नाही. सैन्यात भरती होण्यासाठी लागणारी शरीरयष्टी कमवण्यासाठी कोणतीही अत्याधुनिक व्यायामशाळा नाही किंवा कोठलेही मार्गदर्शन नसतानाही येथील तरुणांनी सेवानिवृत्त सैनिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सैन्यदलात भरती होण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

    तरुण हाच देशाचे भविष्य मानला जातो. मात्र, आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या युगात तरुणाई भरकटलेली दिसत असताना भादोला गावातील तरुणांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारख आहे. याबरोबरच भादोला गाव हे लोककलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर प्रभाकर गवई यांची ही जन्मभूमी आहे. शाहीर अण्णासाहेब मिसाळ, शाहीर जनार्दन गवई यांची शाहिरी याच मातीत फुलली, बहरली व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या शाहिरांच्या डफावरील थाप दणाणली. 

    ज्यांच्या वाणी व लेखणीने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली, असे लोककवी वामनदादा कर्डक यांनी भादोला गावाला आपली कर्मभूमी मानले. याच भादोला गावाच्या मातीत दादांनी अनेक गीते लिहिली. भादोला गावाशी वेगळं नातं त्यांनी प्रस्थापित केलं. म्हणूनच वामनदादा कर्डकांच्या अस्थी त्यांच्या निर्वाणानंतर भादोला येथे आणण्यात आल्या. आज वामनदादा कर्डकांच्या नावाने येथे स्मृतीस्तंभ उभारण्यात येत आहे. सध्या या स्मृतीस्तंभाचे काम प्रगतीपथावर आहे.

    भादोला गाव तसं पुरोगामी विचारांच आहे. आजही येथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. सार्वजनिक कार्यक्रम येथे सर्वांच्या सहभागातून साजरे होतात. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे एकाच छताखाली आहेत. गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करुन या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण केले. येथे दरवर्षी जगदंबा देवीचा पाच दिवसांचा उत्सव भरतो. ग्राम दैवत म्हणून जगदंबादेवीचा उत्सव घराघरात साजरा केला जातो. या उत्सवाला मुली माहेरी येतात. 

    भादोला गावाचे भूमीपूत्र किशोर भालेराव यांनी येथील जीर्ण झालेल्या मंदिराच्या जागेवर लाखो रुपये खर्चून भव्य खंडोबाचे मंदिर बांधून दिले. येथील पुरातन जैन मंदिराचे कामसुध्दा प्रगतीपथावर आहे. २० वर्षाअगोदर श्री शिवाजी विद्यालयाची स्थापना शेलसूर येथील माधवराव देशमुख यांनी येथे करुन शिक्षणाचे दालन गावासाठी खुले केले. अकरा सदस्य संख्या असलेल्या भादोला ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण गवई तर उपसरपंच डॉ. संजय सिरसाट आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार त्यांनी लोकाभिमुख केला आहे.

    Thursday, December 29, 2011

    RAJESH KHADKE

    RAJESH KHADKE

    असे ग्रंथोत्सव पुन्हा पुन्हा व्हावेत

    अलिबाग हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरात चांगले साहित्यिक होऊन गेले. वाचकांची वाचनाची भूक भागविली जावी यासाठी शहरात तीन तर संपूर्ण तालुक्यात शासनमान्य वाचनालये दहा आहेत. ही वाचनालये वाचकांसाठी चांगली सेवा देत आहेत, त्यांनी चांगली सेवा द्यावी म्हणून अनुदानाच्या रुपाने त्यांना शासन मदत करीत असते. या वाचनालयांसाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे आणि वाचन संस्कृती वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथ प्रदर्शन ग्रंथोत्सवाचे आयो‍जन केले होते. 

    त्यातीलच एक ग्रंथोत्सव माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने, रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. अलिबागच्या ग्रंथोत्सव २०११ साठी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व सेवकवर्गाने चांगली मेहनत घेऊन तो यशस्वी केला.

    अलिबाग शहरात पुस्तकांची दुकाने आहेत परंतु वाचक या ठिकाणी पुस्तक खरेदी करण्यास जातोच असे नाही. दुकानात जरी पुस्तके असली तरी ती स्वत:ला चाळता येत नाहीत, पाहता येत नाही, परंतु ग्रंथ प्रदर्शनातून, ग्रंथोत्सवातील लावलेल्या पुस्तक प्रदर्शन वा स्टॉलमधून वाचकाला स्वत:ला पुस्तके पाहण्याचा, चाळण्याचा अधिकार असतो, स्वातंत्र्य असते, यातून तो आवडलेली पुस्तके खरेदी करतो. ही पुस्तके खरेदी करण्याचा त्याला मोह होतोच. एरव्ही बाजारपेठेतील दुकानातून आपण आपल्याला लागणारी वस्तू खरेदी करतो. गावात जत्रा व आठवडा बाजार असेल तर यातून या वस्तू माफक दरात मिळत असल्यामुळे त्या आपण आवर्जून खरेदी करतो. हीच गोष्ट खरेदीबाबतची ‘ग्रंथोत्सवा ’ ची आहे. असे ग्रंथोत्सव पुस्तक प्रदर्शने जिल्हा पातळीबरोबरच तालुका पातळीवर वारंवार भरवली तर पुस्तकांची खरेदी वाचक चोखंदळपणे करतील असे मनमुराद विचार अनेक वाचकांनी ग्रंथोत्सवप्रसंगी बोलून दाखविले. अशा प्रदर्शनातून पुस्तकांची खरेदी होऊन वाचन चळवळ अधिक वृद्धींगत होईल यात शंका नाही. 

    अलिबाग येथे दिनांक १८,१९, २० डिसेंबर रोजी ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ग्रंथोत्सवाची सुरुवात शहरातील जोगळेकर नाक्यावरील विठ्ठल रखुमाईचे पूजन व ग्रंथाचे पूजन करुन ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. 

    प्रथम चौकात असलेल्या छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येऊन दिंडी बाजारपेठेतून फिरुन ग्रंथोत्सवस्थळी आली. सुंदर वाद्यसंगीत व अभंगवाणीच्या निनादात निघालेल्या या ग्रंथदिंडीत जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी, प्रमुख कार्यवाह संजय भायदे, सहकार्यवाह वसंत भाऊ चौलकर, राज्य ग्रंथालय संघाचे कार्योपाध्यक्ष उदय सबनीस, शहाबाज वाचनालयाचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील व संचालक मंडळ, पत्रकार मुश्ताक घट्टे, साहित्यिक गे.ना.परदेशी, पी.एन.पी. महाविद्यालयाच्या प्रा.श्रीमती बोराडे, विद्यार्थी वर्ग, तालुक्यातील, जिल्ह्यातील ग्रंथालयांचे पदाधिकारी, सेवकवर्ग व नागरिक सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात ही ग्रंथदिंडी संपन्न झाली.

    ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले. यावेळी मराठी भाषा आणि वाचन संस्कृती या विषयांवर परिसंवाद झाले. या परिसंवादात कृषीवलचे मुख्य संपादक संजय आवटे, नितीन केळकर, प्रा. शंकर सखाराम, सतीश काळसेकर, अनुराधा औरंगाबादकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याचे सूत्रसंचालन जयंत धुळप यांनी केले. 

    बालकाव्य वाचन, महिला काव्यसंमेलन, काव्यसंध्या, दिवाळी अंक स्पर्धा, बदलत्या काळातील वाचन संस्कृती या विषयांवर चर्चासत्र झाले. यात हरी नरके, अभिनंदन थोरात, जयंत धुळप, प्रफुल्ल फडके आदींना चर्चासत्रात भाग घेऊन मार्गदर्शन केले व ग्रंथालय, वाचन चळवळ वाढली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. 

    तीन दिवस चाललेल्या या ग्रंथोत्सवासाठी अनेक मान्यवरांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, वाचकवर्गांनी उपस्थित राहून ग्रंथ, पुस्तके खरेदी केलीय. ग्रंथोत्सवाचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे व रायगड जिल्हाधिकारी एच.के.जावळे यांच्या उपस्थितीत झाला. 

    रंगसेवा संस्थेने सादर केलेल्या ‘स्मारकाच्या गावा’ हा प्रभावी नाट्यप्रयोग होऊन ग्रंथोत्सवचा समारोप झाला. अगदी चांगला प्रतिसाद लाभलेला हा ग्रंथोत्सव सतत व्हावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

    चला जावू या वज्रेश्वरीला. . .

    मार्गशीर्ष महिन्यात डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सर्व भाविकांची गर्दी होते हे मी जाणून होते. आपणही देवीच्या दर्शनासाठी जावं अशी आस माझ्याही मनाला लागली होती. पण मार्गशीर्ष महिना संपत आला तरीही नियोजन होत नव्हतं. दरम्यान डिसेंबरमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवार-रविवार सुट्टीला डहाणूला सहल काढण्याची इच्छा व्यक्त केली. पण म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल. देवाची इच्छा असेल तर भक्तांसाठी मार्ग आपोआप खुले होतात, याचा प्रत्यय मलाही आला. हो-नाही करीत अखेर आम्ही शनिवार – रविवार सुट्टीचा मुहूर्त साधत एक दिवसाचा दौरा ठरवून डहाणूला जायचे निश्चित केले. शनिवारी ठाणे स्टेशन येथे सर्वांनी भेटण्याचे ठरवून आम्ही कार्यालय सोडले.

    रेल्वे मार्गानेही डहाणू गाठता येते. परंतु रेल्वेने वेळ लागतो व पश्चिम रेल्वेच्या गर्दीतून प्रवास हा नकोसा होतो म्हणून आम्ही शनिवारी सकाळी नऊ वाजता ठाणे येथून सुमो वाहनाने निघालो. रेल्वेने डहाणूला जाता येते. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरारच्या उत्तरेला ६५ कि.मी.अंतरावर डहाणू वसलेले आहे. मुंबई सेंट्रल, दादर किंवा विरारहून रेल्वे सेवेने डहाणू गाठता येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.८ पासून २० कि.मी. अंतरावर चारोटी नाका आहे. त्यापासून ४ कि.मी.अंतरावर महालक्ष्मी मंदिर आहे. सकाळी ११.३० वा. आम्ही महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. 

    महालक्ष्मी देवी ही आदिवासींची कुलदेवता असून यात्रेच्या काळात आदिवासी येथे तारपा नृत्य सादर करतात. दरवर्षी महालक्ष्मी देवीची यात्रा ही १५ दिवसांची असते. यात्रेला हनुमान जयंतीपासून सुरुवात होते, अशी माहिती मिळाली. महालक्ष्मी देवीचे मूळ पीठ डोंगरावर आहे. डोंगराचा शिखर हा निमूळता असून पर्वत रागांमधून महालक्ष्मीचा डोंगर सहज ओळखता येतो. परंतु तेथे चढून जाणे अवघड असल्याने पायथ्याशी मंदिर बांधण्यात आले आहे. महालक्ष्मी देवीची मूर्ती ही मुखवट्याच्या रुपात आहे. मुखवटा शेंदूरी रंगाचा असून चांदीचा मुकूट परिधान केलेला आहे. मंदिर मुंबई- सुरत महामार्गापासून जवळ असल्याने दर्शनासाठी मुंबईतूनच नव्हे तर गुजरात राज्यातूनही भाविक येतात. एसटी महामंडळाच्या गाड्यांची सुविधा उपलब्ध असल्याने सुट्टीच्या काळात, यात्रेच्या वेळी गर्दी होते. येथे धर्मशाळेची व निवासाची सोय आहे. शांत व चोहोबाजूंनी डोंगर व झाडांनी वेढलेल्या या मंदिराला पर्यटक नेहमीच भेट देतात. महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही तेथून डहाणू कार्यालयाला भेट देण्यासाठी रवाना झालो. कार्यालयात कर्मचाऱ्यांनी आनंदाने स्वागत केले. कार्यालयाच्या जवळ असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये भोजन घेऊन जवळच असलेला बीच पाहावयास निघालो. डहाणू तालुक्याला १०-१२ कि.मी.अंतराची सागरी किनारपट्टी लाभली आहे. समुद्रावर घोडागाडी, घोडस्वारीची सुविधा उपलब्ध आहे. स्वच्छ व नितळ समुद्र किनाऱ्यावरुन पाण्यात उतरण्याच्या मोह झाला. शेवटी निळसर पाण्यात उतरुन मनसोक्त पाणी पायावर घेतले तेव्हा मनाला आणखी उभारी आली. त्यानंतर वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघालो.

    वज्रेश्वरीला जाताना वाटेत गणेशपुरीला गाडी वळविली. गणेशपुरी येथे नित्यानंद महाराजांची समाधी व आश्रम आहे. त्यांचे शिष्य स्वामी मुक्तानंद यांचा गुरुदेव आश्रम योग- शिक्षणासाठी प्रसिध्द आहे. विदेशी पर्यटक तेथे मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसले. आश्रमात थोडा वेळ साधना करुन आम्ही वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघालो.

    वज्रेश्वरी हे तीर्थस्थान ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असून कल्याणमार्गे किंवा वसईमार्गे येथे जाता येते. वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे प्रसिध्द आहे. वज्रेश्वरी देवी ही पार्वतीचे रुप मानले जाते. पार्वतीने इंद्राचे वज्रास्त्र गिळले म्हणून रामाच्या विनंतीवरुन तिला वज्रेश्वरी नाव पडले, अशी पुराणात कथा आहे. तसेच वज्रेश्वरीला ऐतिहासिक महत्वही आहे. पेशव्यांच्या काळात पोर्तुगिजांनी जनतेचा छळ सुरु केला तेव्हा चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला की युद्धात विजय झाला तर वसईच्या किल्ल्यासारखे तुझे मंदिर बांधीन. त्याप्रमाणे सन १७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकला व वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले. मंदिरात तीन मूर्त्या असून त्या पुर्वाभिमुख आहेत. मधोमध वज्रेश्वरी देवीची मूर्ती असून डाव्या बाजूला कालिका माता तर उजव्या बाजूला रेणूका मातेची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात दत्तगुरु, शंकर, हनुमान मंदिरे आहेत. वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेऊन १ कि.मी अंतरावरील अकलोली येथील गरम पाण्याची कुंडे पाहण्याचा मोह आवरता आला नाही. या कुंडातील गरम पाण्याचा अनुभवही आनंदी आणि अचंबित करणारा होता. अशा तऱ्हेने आम्ही एक दिवसात वज्रेश्वरी महालक्ष्मीमार्गे यशस्वी प्रवास पूर्ण केला.मग आपण कधी येताय वज्रेश्वरीला?

  • भारती वाघ
  • Tuesday, December 27, 2011

    नाशिक जिल्हयात यशस्वी मत्स्य शेती

    आपण आपल्या शेतीत नव्या प्रयोगातून काही नव नवीन घडवू शकतो असा निर्धार केला तर यशाची व्दारे सदैव उघडी राहतील याच संकल्पनेतून मत्स्य व्यवसाय , मत्स्य शेती करणे , त्याची विक्री व्यवसाय बघणे हे एक आव्हानच आहे. शासनाच्या विविध योजना मत्स्योत्पादनासाठी माशांची उपलब्धता तसेच मोठया प्रमाणात होणारे संशोधन मत्स्यबीजांची उपलब्धता या कारणांने या क्षेत्रात वाढ होत आहे. त्या विविध मत्स्य बीज संस्था मत्स्य बीज पुरविते त्यामुळे ही शेती शक्य झाली आहे. यासाठी माशांचे संगोपन , संवर्धन या तंत्रज्ञानाची योग्य व सखोल माहिती असावी लागते.

    मत्स्यशेती करताना मुबलक पाणी, साठवून ठेवणारी अशी उत्तम जमीन , मत्स्य बीजांची उपलब्धता या तीन गोष्टी आवश्यक आहे. माशांच्या कोंळबीच्‍या योग्य जातीची निवडही तेवढीच महत्वाची असते. माशांचे गाढे अभ्यासक, संशोधक, यांचे मते मानवी शरीराची योग्य वाढ होण्यासाठी प्राणीज प्रथीनांचा योग्य पुरवठा अत्यंत अल्प खर्चात करण्याच्या आवश्यक आहे.

    नाशिक मध्ये चणकेश्वरी आदिवासी सहकारी संस्था ही मत्स्य व्यवसाय करीत आहे. सहकारी तत्वावर तलाव भाडयाने घेवुन ६६५ हेक्टरवर हे मत्स्य पालन करत आहेत. यासाठी त्यांना शासनाची मदत मिळते. या तलावात जवळपास २० लाख कोळंबी ,१५ लाख मत्स्यस बीज टकतात. राऊ करला, कोबडा, तसेच लोकल व्यहारायटीमध्ये मरळ, कटयारना पाबदा, असे मासे पाळतात . यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात मत्स्यबीज खरेदी करुन त्यांचे संगोपन करतात. या तलावात मत्स्य बीज निर्मिती , मासे पालन तसेच इथूनच विक्रीही करता येते.

    तसेच जवळपास ५०० लोक एका वेळेस येथे काम करतात. ४०० ते ५०० रुपये रोज त्यांना मिळतो. यामुळे जिल्हयातील अनेक लोकांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळ जवळ ५०० कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न यामुळे सुटलाय.

    मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त. यु. पी. बनसोड यांनी याबाबत सांगितले की, आदिवासींसाठी सहकार तत्त्वावर चालवलेली ही संस्था आज नाशिक जिल्हयात उत्कृष्ट काम करते आहे. मत्स्य व्यवसाय हा नाशिक जिल्हयात चांगला विकसित होत आहे. जिल्हयात छोटे-मोठे ३००-४०० शेत तलाव निवडताना काय काळजी घ्यावी माहिती सांगताना ते म्हणाले की, ब-याच ठिकाणी पडिक जमीन किंवा चोपण जमिन असतांना ज्यात कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही अशा जमिनीत तलाव तयार करुन माशांचे संगोपन चांगल्या प्रकारे करता येते.. काही बेरोजगार युवकांनी छोटे तलाव तयार करुन तेथे माशांचे संगोपन चांगल्या प्रकारे करता येते. काही बेरोजगार युवकानी छोटे तलाव तयार करुन तेथे मासे, झिंगे यांचे संगोपन करुन त्यावर रोजगार मिळविला आहे. नाशिक जिल्हयाच्या स्थानिक बाजारात माश्यांना चांगली मागणी आहे. मुंबई सारख्या ठिकाणीही माल पाठवून त्यातुन सुध्दा नफा मिळतो. याप्रमाणे नाशिक जिल्हयात मत्स्य शेती हा व्यवसाय यशस्वी झाला आहे.

    Monday, December 26, 2011

    सफर रत्नागिरीची -३

    आसूद गावापासून दापोली केवळ ६ किलोमीटर अंतरावर आहे. दापोली थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जून भेट द्यावी. विद्यापीठातील अनेक नवे प्रयोग अचंबित करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचना देखील तेवढीच सुंदर आहे. दापोली परिसरात कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते. इथे फळबागामधील भटकंती आणि थकल्यावर मिळणारा कोकणी पद्धतीच्या आहाराचा आनंद काही निराळाच असतो.

    दापोली दाभोळ रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २० किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पहायला मिळतो. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या २९ गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मूर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षून घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळीलमार्गे मळे गावात मुख्य मार्गाला आपण लागतो. 

    मूळेपासून दापोलीकडे चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. अत्यंत सौम्य स्वभावाच्या कर्तबगार राजा दांडेकरांशी गप्पा मारल्यावर आमचा दिवसभराचा थकवा दूर झाला. एखादे मोठे कार्य अडथळ्याची शर्यत पार करून कसे उभे राहते याचे उत्तम उदाहरण आमच्या समोर होते. त्यांचा निरोप घेऊन आम्ही दाभोळची खाडी गाठली.

    सायंकाळ झाल्याने अंडामशिदीचे सौंदर्य पाहता येणार नव्हते. दाभोळला मुक्काम करण्याऐवजी आम्ही गुहागरला जायचे ठरविले. दाभोळच्या खाडीतून फेरीबोटीची व्यवस्था असल्याने आम्ही वाहनासह बोटीत बसलो. पाचच मिनिटात आम्ही गुहागर तालुक्यात आलो. (रस्त्याने गुहागरला येण्यासाठी किमान तीन तास प्रवास करावा लागला असता.) धोपावे गावातून वेलदूरमार्गे १६ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गुहागर शासकीय विश्रामगृहात मुक्कामासाठी पोहचलो. गुहागरला अनेक ठिकाणी निवास-न्याहरी योजने अंतर्गत उत्तम निवास व्यवस्था आहे. त्यामुळे पर्यटकांची चांगली व्यवस्था होऊ शकते.

    सकाळी लवकर उठून फेरीबोटने आम्ही दाभोळला चंडिकादेवीच्या मंदिरात गेलो. दाभोळहून दापोलीला जाताना ४ किलोमीटर अंतरावर हे जागृत देवस्थान आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील दगडांमध्ये कोरीव काम करून मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दीपमाळ आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मूर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपांनी प्रकाशित गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक याठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.

    श्री चंडिकेचे दर्शन घेतल्यावर दाभोळच्या खाडीला लागून असलेल्या अंडामशिदीचे सौंदर्य न्याहाळता येते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हिने १६५९ मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले. त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची माहिती याठिकाणी आम्हाला मिळाली.

    खाडीच्या पलिकडे गेल्यावर अंजनवेल येथील गोपाळगडला भेट देता आली. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. समुद्राच्या बाजूला असलेल्या दाट गवतातून जात तटबंदीचे छायाचित्र घेण्याचा मोह आवरला गेला नाही. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूरहून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो. किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दीपगृहेदेखील आहे. परतीच्या प्रवासात विस्तीर्ण परिसरात असलेला प्रसिद्ध रत्नागिरी गॅस ऊर्जा प्रकल्प दिसतो. गुहागरला परतल्यावर नारळाची दाट रांग आपल्या स्वागतासाठी तयार असते. निसर्ग सौंदर्याचे आगर असलेल्या या गावातील मुक्काम खरोखर आनंददायी असतो. खरं तर निसर्गाचे सान्निध्यच मुळात आनंद देणारे असते. व्यवहाराचा विचारही मनात न आणता हृदयाचे कप्पे उघडून मोकळा श्वास घेण्याची तयारी आपली असेल तरच हं!


    (क्रमश:)

    दिल्लीतील मराठी पाऊलखुणा


    सुमारे १४८३ चौ.कि.मी. वसलेल्या दिल्ली शहराची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार १,६७,५३,२३५ इतकी असून हिंदी, पंजाबी, व उर्दू या येथील प्रमुख भाषा आहेत. दिल्लीने आतापर्यंत अनेक वंशांची राज्ये उदयाला आलेली पाहिली तसेच त्यांचा अंतही पाहिला. अनेक राजवटींच्या अनेक खुणा ऐतिहासिक वास्तुच्या स्वरूपात आजही पहावयास मिळताता. असे म्हटले जाते की, महाभारतात ज्या इंद्रप्रस्थ शहराचा उल्लेख आहे ते शहर म्हणजे दिल्लीच, आजच्या आधुनिक, रेखीव दिल्लीची रचना इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ एडविन ल्युटिन याने केली. त्यांनी उभारलेल्या या नव्या दिल्लीने डिसेंबर २०११ मध्ये शंभर वर्ष पूर्ण केले आहे. बाकीच्या भागात वसलेले आहे ते जुने दिल्ली शहर.

    दक्षिणेकडून येणाऱ्या गाडीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा त्यापूर्वी टिळक ब्रिज व शिवाजी ब्रिज ही खास मराठी नावे गाडीतील मराठी माणसाचे स्वागत करतात व दिल्लीबाबत उपरेपणाची भावना प्रवेश केल्यापासून नाहीशी होते. नवी दिल्ली स्थानकातून बाहेर पडताच अजमेरी गेट बाजूला मिंटो ब्रिजनजिकचा छत्रपतीच्या पुतळा व पहाडगंज विभागात असलेला बाळकृष्ण मुंजे यांचा पुतळा पहिल्यानंतर आपण महाराष्ट्रातच तर नाही ना, असे वाटते.

    दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.

    पानीपतच्या युध्दानंतरही, १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली आणि मराठेशाहीचे सुवर्णयुग दिल्लीत अवतरले. दिल्लीपर्यंत येऊन मोगलांशी टक्कर देऊन वर्चस्व प्रस्थापित करण्याची किमया फक्त मराठी माणसांनीच दाखविली. महादजी शिंदे यांच्या बरोबर रघुनाथ कुलकर्णी, त्यांचे बंधु गोपाळराव, कृष्णराव, मल्हारअप्पा खंडेराव, अंबुजी इंगळे, रामजी पाटील, रामजी जाधव, बाळाजी गुळगुळे अशा त्या काळातील अनेक कर्तबगार प्रमुखांची नावे इतिहासात आढळतात. इंग्रजांनी आधुनिक शस्त्रे, नवीन विचारधारा, नवीन युद्धनीती वापरून १८०३ साली मराठयांचा पराभव केला. इंग्रज व मराठी सैन्याची दिल्लीमध्ये ज्या परिसरात लढाई झाली, तो परिसर अजूनही बाडा हिन्दुराव या नावाने ओळखला जातो. चांदणी चौकातील अप्पाजी गंगाधर यांनी बांधलेले शिवालय आजही मराठे शाहीची साक्ष देते, मराठी सैन्याचा तळ पडला होता तो येथील तालकटोरा भाग हा मराठी इतिहासाची साक्ष आहे. कालकाजी मंदिराच्या परिसरात मदनगीर म्हणजेच महादजींची गढी होती. दिल्लीतील आद्य मराठी माणसांच्या या पाउलखुणा होत.

    स्वातंत्र्यलढयात दिल्ली येथे मराठी बाणा दिसून येतो. घटनेचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो ते डॉ. बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी भारतीय संविधान सभेच्या घटनासमितीचा अध्यक्ष पद सांभाळून भारताला समता, स्वातंत्र्य, न्याय बंधुत्वादी संविधान अर्पण केले. त्यांनी आपल्या लेखणीने दिल्लीतच नव्हेतर जगात किर्ती मिळविले. विविधतेत नटलेल्या भारताला सविंधानअंतर्गत एकरूपी माळेत विणले. महाराष्ट्रातील प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची केंद्रातील कारर्कीद नेहमीच अविस्मरणीय आहे. महाराष्ट्रातून जेव्हा-जेव्हा केंद्राला नेतृत्व देण्याची वेळ आली त्या-त्या वेळी महाराष्ट्राने आपले नेतृत्व केंद्राला अर्थातच दिल्लीला दिले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापनाही १९६० पासून दिल्लीत झाली. दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींच चित्र राज्यात सकारात्मकरित्या उमटविण्याची जबाबदारी मागील पन्नास वर्षापासून हे कार्यालय पार पाडीत आहे.

    लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या थोर महापुरूषांचे पुतळे बघुन सर्वसामान्य मराठी माणसांना अभिमान होईल असेच हे चित्र आहे. आधुनिक महाराष्ट्राची ओळख फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीमुळे निमार्ण झाली आहे. या चळवळीचे या तीन महापुरुषांच्या प्रतिमा संसदेच्या परिसरात पाहतांना आनंद आणि अभिमान दोन्ही दाटून येतो याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक शिवाजी महाराज यांचा मराठी बाणा असणारा पुतळा ही येथे आहे.

    मराठी माणूस दिल्लीमध्ये करोलबाग, पहाडगंज, नया बाजार अशा भागात एकत्रितपणे राहातो त्यांच्यासाठी स्व. काकासाहेब गाडगीळ यांच्यासारख्या अनेक द्रष्टया मराठी नेत्यांच्या पुढाकाराने नूतन मराठी विद्यालय, चौगुले शिशुविहाराच्या इमारती दिल्लीत मोक्याच्या जागी उभ्या राहिल्या, दिल्लीमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेल्या पहाडगंज भागातील बृहन्ममहाराष्ट्र भवनाची इमारत, त्यासमोरचे महाराष्ट्र रंगायन हे भव्य नाटयगृह रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. जनकपुरी भागातील दत्तमंदिर, रामकृष्ण पुरम भागातील विठ्ठल मंदिर लोधी रोडवरील वनिता समाज ही पण दिल्लीतील मराठी माणसांची एकत्र येण्याची सध्याची ठिकाणं आहेत. सर्वसाधारणपणे दिल्ली व आसपासच्या परिसर मिळून अंदाजे अडीच लाख मराठी माणसं आहेत.

    येथील कोपर्निकस मार्गावरील राज्य शासनाचे महाराष्ट्र सदन व नजिकच्याच कस्तुरबा गांधी मार्गावरील बांधले जाणारे नविन महाराष्ट्र सदन आता नव्याने कात टाकत आहे. दिल्लीतील रस्त्‍यांना दिली गेलेली महाराष्ट्राच्या महापुरूषांची नावे तसेच या पुरुषांचे ठिकठिकाणी उभारलेले पुतळेही दिल्लीतील महाराष्ट्राची साक्ष देताना आढळतात.

    महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली

    Saturday, December 24, 2011

    सर्प - मानवाचा शत्रू नव्हे मित्र! (भाग२)

    सर्पाचे नीट जवळून शास्त्रीय अभ्यास केला की, सर्प विनाकारण कोणालाही दंश करीत नाही. ज्यावेळी सापाच्या अंगावर आपला पाय पडतो, तो डिवचला जातो, त्याची कोंडी होते त्याच वेळी सर्पाची स्वत:च्या रक्षणाकरिता जी प्रतिक्रियात्मक क्रिया होते, त्यालाच सर्पदंश म्हणतात. 

    वस्तुत: सर्प शेतकरी बांधवांचा खऱ्या अर्थाने मित्रच आहे. कारण उंदीर शेतातील बी-बियाणांचा तसेच उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र नाग, धामण, डुरक्या, घोणस, मंडोल इत्यादी प्रकारचे सर्प शेतातील उंदरांची वाढत जाणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेऊन निसर्गातील समतोल राखण्यास सहकार्यच करतात अशी माहिती सर्प दर्शन ऑफ इंडिया, मुंबई चे संचालक, सर्पमित्र भरत जोशी यांनी महान्यूजशी बोलताना दिली.

    प्रश्न:-प्रथमोपचार दिल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ? 
    उत्तर :- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस प्रथमोपचार दिल्यानंतर दोन तासांच्या आत जवळील रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असते. त्यास बांधलेली आवळपट्टी दर १० ते १५ मिनिटांनी सोडून परत बांधणे गरजेचे असते.आवळपट्टी अशीच दोन ते तीन तास घट्ट बांधून ठेवली तर त्या व्यक्तीच्या हाताला शुद्ध शक्ताचा पुरवठा होऊ शकणार नाही व हातास गँगरीन होऊन तो हात निकामी होऊ शकतो. दंश झालेला भाग हृदयाच्या खालच्या बाजूस ठेवावा. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णवाहिका, उपलब्ध वाहन यामधून त्याच्या शरीराची कमीत कमी हालचाल होईल यावर देखरेख ठेवून रुग्णालयात त्वरित घेऊन जावे. 

    प्रश्न:-रुग्णालयात सर्पदंशावर कोणती उपचार पद्धती आहे ? 
    उत्तर :- प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात सर्पदंशावर त्वरित उपचार केले जात असून अशा व्यक्तीस प्रतिविषे (लायफोलाईज्ड अँन्टी-स्नेक-व्हेनम-सिरम) ही इंजेक्शने नसे द्वारे दिली जातात. विषधर सर्पापासून जास्त प्रमाणात विष गेले असल्यास त्या व्यक्तीस ४० ते ५० पर्यंत इंजेक्शने लागतात. 

    रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असल्याने व्हेंटीलेटर द्वारा उपचार करत असता डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या हृदयातील स्पंदनावर लक्ष ठेवता येते. व आवश्यकतेनुसार उपचार पद्धतीमध्ये फेरबदल करता येतो. हजारोत एखादी व्यक्तीअशी असते की, त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्पदंशावरील प्रतिविषे त्याच्या शरीरात सुट होत नाहीत. अशा वेळी ती प्रतिविष सलाईन द्वारा एकास दहा या प्रमाणात म्हणजेच दोन हात व दोन पायातील नसांद्वारे दिले जातात. 

    प्राथमिक वैद्यकीय उपचारांबरोबरच सर्पदंश झालेल्या व्यक्तीशी सकारात्मक बोलून त्यास मानसिक धीर देणेही तेवढेच गरजेचे असते. सर्पदंशानंतर रक्तातील श्वेतपेशींचे प्रमाण कमी होत असल्याने त्याची प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होत जाते. अशा वेळी त्या व्यक्तीची मानसिकशक्ती वाढवण्याची नितांत गरज असते. कित्येकदा साप चावला या घटनेने मानसिकदृष्ट्या हतबल होऊन हृदयविकाराने मृत्यूमुखी पडल्याची असंख्य उदाहरणे आढळून आली आहेत. 

    प्रश्न:-या क्षेत्रात अंधश्रध्दा दिसून येते का ?
    उत्तर :- हो ! सर्पांच्या मोठ्या प्रजाती असतात त्याच्या दुप्पट अंधश्रद्धा असतात कारण सर्पांच्या आपण वैज्ञानिक दृष्टिने अभ्यास करीत असतो. माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे असे आपण नेहमीच म्हणत असतो मात्र अजूनही समाजात या क्षेत्रात अंधश्रद्धेचा अंधार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 

    राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये तसेच आदिवासी मध्ये अजूनही सर्पदंश झाल्यावर 'मंत्र तंत्र', जडीबुटी, कोंबड्या लावण्याची पद्धत आढळून येते. अशा व्यक्तीस ते रुग्णालयाऐवजी शंकराच्या देवळात घेऊन जातात. मोठमोठी वाद्ये जोरात वाजविली जातात. त्या व्यक्तीच्या डोक्यावर पाण्याच्या घागरी उपड्या केल्या जातात. शहरी भागातील सुशिक्षित लोक वैद्यकीय उपचारांकडे वळलेले आढळतात. 

    प्रश्न:-सर्पविषयक शास्त्रीय ज्ञानाचा आपण समाजात कसा उपयोग करुन दिला. ? 
    उत्तर :- सर्पविषयक शास्त्रीय माहिती शहरापासून ते ग्रामस्थांना व्हावी त्याचप्रमाणे विषारी तसेच बिनविषारी सर्प कसे ओळखावेत ? सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे? सर्प दंशाची लक्षणे, त्यावरिल प्रथमोपचार आणि वैद्यकीय कार्यक्रमांचे आयोजन करुन आतापर्यंत ४३ हजार बांधवांनी याचा शैक्षणिक लाभ घेतला आहे. त्यामध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट्स, आदिवासी, कातकरी, वनवासी, शेतकरी बांधव, रोटरी, लॉयन्स क्लब, सेक्टर, मधील अधिकारी आदींचा समावेश आहे. परंतु तसेच आकाशवाणी-मुंबई,पुणे, रत्नागिरी, इंदोर, भोपाळ, कलकता, गोवा, यवतमाळ आणि दूरदर्शन व्दारे मुंबई, पुणे, गोवा, नागपूर वरुन सर्पविषयक विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. 

    या शिवाय दैनिक, पाक्षिक, मासिके, राज्य शासनाचे लोकराज्य यामध्येही सर्पांविषयक शैक्षणिक लेखांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे.

    प्रश्न:- या कार्यक्रमांदरम्यान आपल्याला काही अनुभव आले काय ?
    उत्तर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनविभागाचे तत्कालिन संचालक प्रकाश ठोसरे या कार्यक्रमामुळे खूपच प्रभावित झाले व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हानिहाय सर्पविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले. सुमारे सहा हजार लोकांना याचा शैक्षणिक लाभ झाला या दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आलेला अनुभव स्मरणात जाऊ शकत नाही.

    कार्यक्रम संपवून एस टी स्टँड कडे चालत जात असताना तो रस्ता शेतातून होता. एक शेतकरी शेतात काम करत होता त्याच्याजवळ जाऊन मी त्याला स्टॅन्डचा रस्ता विचारला असता त्यानं चक्क नकार दिला कारण तो बिचारा जन्मताच अंध असल्याचे समजले. हे ऐकताच मनात एक विचार आला आपण डोळस व्यक्तींकरिता कार्यक्रम करतो याच विचारात मी परतलो. 

    डोळस लोकांसाठी सर्पविषयक शास्त्रीय पुस्तके लिहिली तसेच सर्पविषयक माहितीच्या घडीपत्रिका तसेच चार्टस तयार केले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे 'भारतातील सर्प' या पुस्तकाची निर्मिती महाराष्ट्रातील सर्पमित्रांची नावे, पत्ते आणि मोबाईल क्रमांक इत्यादीसह तयार केली. पण शेतात राबणाऱ्या अंधबांधवांकरिता काय ?

    प्रश्न:-नेत्रहीन व्यक्तींसाठी आपण काय पाऊले उचलली ? 
    उत्तर :- नॅब मधील सहायक संचालक हेमंत पाटील यांच्या मदतीने सुमारे २१ दिवसात ब्रेल लिपी शिकलो आणि अंधबांधवांविषयी सर्पविषयक सर्वंकष-शास्त्रीय माहिती असलेली 'सर्पस्पर्श' ही ब्रेल लिपीतील २५ पानांची पुस्तिका तयार करुन राज्यातील १०० अंध शाळांना मोफत वितरित केली. 

    सर्पस्पर्श ही पुस्तिका एका अंध बांधवाने वाचले तेव्हा त्यांनी लगेच दूरध्वनीवर संपर्क साधून प्रतिक्रिया व्यक्त केली. जोशी सर ! तुम्ही तयार केलेलं पुस्तक खूप भावलं कारण यात सर्पविषयक माहिती आम्हा अंध बांधवांना सहज सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे मांडली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यास शास्त्रीय अधिष्ठान आहे. 

    ती अंध व्यक्ती पुढे म्हणाली,जर एखाद्या डोळस व्यक्तीला सर्पदंश झाल्यास आम्ही तेथे जाऊन त्या माणसाचा प्राण वाचवू शकू. 

    प्रश्न:-सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे ? 
    उत्तर :- घरासमोरचा परिसर स्वच्छ ठेवा, घराजवळील लता-वेली, झाडांच्‍या फांद्या छाटून टाकाव्यात, घरातल्या दारावरील, भिंतीवरील, भेगा बुजवून टाकाव्यात. जेणेकरून ह्यात सर्प जाणार नाहीत. अंधारात घराबाहेर जाताना विजेरीचा उपयोग करा.

    पाणवठा, तळी, अडगळीची जागा, लाकूडफाटा, दगडविटांचा ढिगारा येथे जात असता पायात बूट घाला तसेच हातात काठी असणे आवश्यक ठरेल.

    जंगलातून फिरताना झाडावरील सर्पदंश टाळण्यासाठी टोपीचा वापर करावा. शेतातून जाताना शक्यतो पायवाटेचा वापर करावा.

    समुद्र किनारी समुद्र सर्प निपचित पडला असता त्यास चुकूनही हात लावू नका. कारण त्या सर्पापासून दंश होऊ शकतो. समुद्रसर्प हा नागापेक्षा दहा पटीने जास्त विषारी असतो. हे विसरु नका. 

    प्रश्न:-आपण आधुनिक नागपंचमी हे पुस्तक प्रकाशित केले ,त्या पुस्तकाची संकल्पना काय ? 
    उत्तर :- आधुनिक नागपंचमी या पुस्तकात अशी मांडणी केली आहे की, नागपंचमीचे दिवशी जिवंत नागाची पूजा न करता नाग प्रतिमेची, मातीच्या मुर्तीची किंवा पाटावर अष्टगंधाने नाग काढून, जिवतीचा कागद देवघरात ठेवून नागाचे स्मरण करा त्याच्या उपयुक्ततेचा स्मरण करा , मी सापाची नाहक हत्या करणार नाही व इतरांना त्यापासून परावृत्त करीन अशी प्रार्थना हीच खरी नागाची श्रद्धायुक्त पूजा ठरु शकेल, हे या आधुनिक नागपंचमी या पुस्तकात दिलेले आहे.

    सर्प - मानवाचा शत्रू नव्हे मित्र! (भाग१)

    सर्पाचे नीट जवळून शास्त्रीय अभ्यास केला की, सर्प विनाकारण कोणालाही दंश करीत नाही. ज्यावेळी सापाच्या अंगावर आपला पाय पडतो, तो डिवचला जातो, त्याची कोंडी होते त्याच वेळी सर्पाची स्वत:च्या रक्षणाकरिता जी प्रतिक्रियात्मक क्रिया होते, त्यालाच सर्पदंश म्हणतात. 

    वस्तुत: सर्प शेतकरी बांधवांचा खऱ्या अर्थाने मित्रच आहे. कारण उंदीर शेतातील बी-बियाणांचा तसेच उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र नाग, धामण, डुरक्या, घोणस, मंडोल इत्यादी प्रकारचे सर्प शेतातील उंदरांची वाढत जाणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेऊन निसर्गातील समतोल राखण्यास सहकार्यच करतात अशी माहिती सर्प दर्शन ऑफ इंडिया, मुंबई चे संचालक, सर्पमित्र भरत जोशी यांनी महान्यूजशी बोलताना दिली.

    प्रश्न:- नाग/साप हे शब्द कानावर आले तरी सामान्य माणूस घाबरतो आणि प्रत्यक्ष पाहिल्यावर तर नखशिखान्‍त हादरतो असे असताना या प्राण्याविषयी आपली जिज्ञासा कशी जागृत झाली ?
    उत्तर :- गृहरक्षक दलात कार्यरत असल्यामुळे सत्तरच्या दशकात राज्य शासनाचा झालेल्या दीर्घकालीन संपाच्या काळात आम्हाला परळ येथील हाफकिन संस्थेत जाण्याचे आदेश मिळाले. या ठिकाणी १५० नाग, ६५ मण्यार, ७५ घोणस, ३५० फुरशी त्याच प्रमाणे १००० काळे, तांबडे विंचू यांची देखभाल करण्याचे काम आमच्यावर सोपविण्यात आले. 

    आमच्यापैकी पाच जणांची सर्पालयात नियुक्ती करायची होती.उपस्थितांपैकी कोणीच पुढे येईनात अखेर ते आव्हान मी स्वीकारण्याचे ठरवून अन्य चौघांनाही यासाठी उद्युक्त केले. पिंजऱ्यातील नागांना खाद्य म्हणून पांढरे उंदीर देऊन पाण्याच्या वाटीत स्वच्छ पाणी घालून ती वाटी पिंजऱ्यात ठेवायची असे कामाचे स्वरुप होते. दिवसा सुमारे २० विषधर सर्पांना त्यांचे खाद्य व पाणी पुरविले जाई. 

    नागाचा पिंजरा उघडताच तो फणा काढून फुत्कार टाकीत असे, सुरूवातीस भीती वाटली मात्र सर्पाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करता लक्षात आले की, हूक स्टीकचा वापर योग्य प्रकारे केल्यास नाग आपल्या काबूत येऊ शकतो. हूक स्टीकचा स्पर्श होताच नाग थोडा खाली जाई अशा वेळी पटकन पाण्याची वाटी काढून पाणी बदलायचे व वाटी जागेवर ठेवून त्या नागास पांढऱ्या उंदरांचे खाद्य द्यायचे. एका पिंजऱ्यात एकच नाग असे, अशा प्रकारे सर्पालयातील आमचे काम आठवडाभर व्यवस्थित सुरु होते. 

    नवव्या दिवशी एका पिंजऱ्याचे झाकण उघडताच त्यामध्ये दोन ब्लॅक कोब्रा नाग आढळून आले. नागाच्या पोटाकडील भागास हूक स्टीकचा धक्का लागला. त्याचक्षणी दुसऱ्या नागाने उसळी मारली त्याबरोबर पहिला नाग पिंजऱ्याबाहेर आला आणि मण्यार सर्प लोखंडी रॅक खाली दडला. पिंजऱ्यातील दुसऱ्या नागाने देखील चपळाईने पहिल्या नागाचे अनुकरण केलं. 

    ही घटना वरिष्ठांच्या कानावर घातली असता त्यांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना पाचारण केले. तथापि काही वेळातच सर्पालयातील वरिष्ठ वैज्ञानिक, डॉ.निळकंठ एकनाथ वाड त्या ठिकाणी राऊंडवर आले असता या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हूक स्टीक समवेत सर्पालयात प्रवेश केला. आणि त्या दोन जिवंत नागांना शोधून परत पिंजऱ्यात ठेवलं. 

    सर्पविष म्हणजे नक्की काय असतं या विषयावर डॉक्टरेट मिळवलेल्या वाड यांची धाडसी कृती मी आवाक होऊन पाहत राहिलो. ही घटना माझ्या जीवनाला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरली. 

    प्रश्न:- याविषयी आवड निर्माण झाल्यावर आपण काय केले ? 
    उत्तर:- उपरोक्त घटनेनंतर या विषयाचा सर्वंकष अभ्यास करायचा मला ध्यास लागला. प्रारंभीच्या काळात हाफकिन संस्थेच्या वाचनालयात असलेली सर्प-विषयक सर्व पुस्तकं अभ्यासली. हाफकिन संस्थेद्वारा आम्हाला सर्पविषयक प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्याचप्रमाणे मद्रास येथील सर्पालयात अद यावत प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आलं होतं. 

    प्रश्न:-देशात सर्पांच्या प्रजाती किती आहेत ? 
    उत्तर :- आपल्या देशात सुमारे २५६ प्रकारचे सर्प आढळून येतात त्‍यातील ५५ प्रजाती या विषारी आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण ५५ सर्पजाती आढळून येत असून त्यातील नाग, मण्यार,घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्रसर्प हे विषारी आहेत तर उर्वरित सर्व प्रजाती उदा.धामण, कवड्या, डुरक्या-घोणस, नानेटी, हरण टोळ, श्वान सर्प, मंडोल(दुतोंड्या), रुकई, अजगर वगैरे बिनविषारी प्रकारात मोडणाऱ्या प्रजाती असतात.

    प्रश्न:-सर्पाची आश्रयस्थाने कोणती ? 
    उत्तर :- जमिनीतील बिळे, दगड-विटांचे ढिगारे, झाडाझुडपातील जागा, मोकळी मैदानी जागा, भात शेती तसेच सपाट भूभाग ही सर्पांची मुख्य आश्रय स्थाने आहेत. मात्र जागतीकीकरणामुळे, गगनचुंबी इमारतीच्या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणात जंगलतोड होते आणि हे सर्प निसर्गाकडून मानवी वस्तीत येतात.

    प्रश्न:-साप घरात आढळल्यास काय करावे ? 
    उत्तर :- कोणत्याही प्रकारचा सर्प घरात आल्यास त्याला न मारता, निष्णात आणि अनुभवी साप पकडणाऱ्यास बोलवावे, घराजवळ लोकांची गर्दी करु नये, सर्पास कपाटामागे अडगळीत, बिळात तसेच खोलीच्या आतील बाजूस जाण्यापासून रोखावे, संध्याकाळच्या वेळेस दारे बंद ठेवावीत. 

    घरातील, पडवीतील दिवे लावावेत, विजेरी पटकन मिळेल अशा ठिकाणी ठेवावी .सापास घरातून बाहेर हुसकावण्यास लांब काठी, तारेचा आकडा, छत्रीचा आकडा यांचा उपयोग करुन सर्पास मानवी वस्तीपासून दूर सोडावे.

    प्रश्न:-विषारी बिन-विषारी सर्पाचा दंश कसा ओळखावा ? 
    उत्तर :- सर्वसाधारणपणे सर्पाचा दंश माणसाच्या हाताला किंवा पायाला होत असतो. दंश झालेल्या ठिकाणी तो साप जर विषारी असेल तर त्या जागी विषदंतांच्या दोन खुणा स्पष्टपणे आढळून येतात आणि साप जर बिनविषारी असेल तर तशा खुणा आढळून येत नाहीत. 

    प्रश्न:-विषारी सर्प दंशाची लक्षणे कोणती ? 
    उत्तर :- सर्पाचे विष फिकट पिवळसर आणि पारदर्शक असून काहीसं चिकट असतं. मज्जासंस्थेवर परिणाम करणारे न्युरोटॉक्सीक आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे हिमोलॅटीक असे त्याचे दोन प्रकार असतात.

    नाग, मण्यार समुद्र सर्प यापासून दंश झाल्यास माणसाच्या मज्जा संस्थेवर विषाचा परिणाम होतो व त्याचे पुढील दुष्परिणाम दिसून येतात.दंशाच्या जागी सूज येऊन बधीरपणा येतो. श्वासोच्छवासास त्रास होतो. जीभ आत ओढली जाते. तोतरेपणा येतो, डोळे मिटू लागतात, व्यक्ती बेशुद्धावस्थेतून कोमात जाण्याची शक्यता निर्माण होते. विष हृदयापर्यत गेल्यास रक्ताचे पाणी होऊन पांढऱ्या रंगाचा फेस तयार होतो, तो तोंडावाटे बाहेर पडू श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आणि अखेर हृदयक्रिया बंद पडून माणसाचा मृत्यू ओढवतो. 

    प्रश्न:-रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या विषाची (सर्पदंशाची) लक्षणे कोणती ? 
    उत्तर :- एखाद्या व्यक्तीला घोणस, फुरसे, हिरवा घोणस या सर्पांनी दंश केला असता त्याच्या विषाचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या रक्ताभिसरणावर होतो. सर्पदंश झालेल्या जागी बरीच सूज येऊन तो भाग हूळहूळा होऊन लालसर दिसू लागतो. त्वचा काळी निळी पडते. रक्तवाहिन्यातील रक्तात गुठळ्या निर्माण होऊन ते रक्त तोंड, नाक, कान याद्वारे बाहेर पडू लागतं. शरीरात विष अधिक प्रमाणात भिनल्यास पोटातील आतडी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे विष महारोहीणी द्वारे हृदयापर्यंत जाते आणि अखेर शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयास न झाल्याने मृत्यू होतो. 

    प्रश्न:-सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार कसे करावे ? 
    उत्तर :- सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर दहा ते पंधरा मिनिटांच्या आत प्रथमोपचार कळणे आवश्यक आहे. 

    सर्वप्रथम जखम स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉल च्या पाण्याने धुवावी. हाताला सर्पदंश झाला असल्यास कोपराचे वर म्हणजेच दंडावर (एकेरी हाडावर ) पायास सर्पदंश झला असता गुडघ्याच्यावर (एकेरी हाडावर ) म्हणजेच मांडीवर दोरी किंवा कापडाचा तुकडा, दुपट्टा, वडाची पारंबी, केळीचे सोप, केपर बँडेज, किंवा आवळपट्टी बांधावी ज्यामुळे सर्पाचे विष शरिरातील अन्य भागात पसरण्यास मज्वाव होईल. 

    चिरा छेदन पद्धती - नाग, मण्यार या सर्पांद्वारे दंश झाल्यास चिरा छेदन पद्धतीचा उपयोग करता येतो. सर्पदंशाचे दोन व्रणांवर पाव सेंटीमीटर लांब, रुंद आणि खोल अशी तिरपी चिर द्यावी .जेणेकरुन जखम उघडी होऊन त्‍या द्वारे ५० टक्के विष आणि विषारी रक्त शरीराबाहेर पडून प्रवाहित होईल. 

    पोटॅशियम परमँगनेट (KmnO४)च्या द्रावामध्ये विषातील २६ विषघटकांपैकी ५० टक्के विष-घटकांचे निराकरण करण्याचे सामर्थ असल्याने एका ग्लासात अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात पोटॅशियम परमँगनेटचे चार ते पाच कण टाकून ढवळावे व सर्पदंशाच्या जागेवर याची संतत धार धरावी. 

    क्रमश:

    Friday, December 23, 2011

    सफर रत्नागिरीची (भाग-२)

    मंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्र किनारा लागतो. नारळाच्या दाट झाडी कडून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरुबन लागते. समुद्र किनारा विस्तीर्ण असून याठिकाणी विविध आकाराचे शंख-शिंपले सापडतात. शांत-निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असल्याने पर्यटनांचा मनमुराद आनंद लुटता येतो.

    केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर परिसरात तळे असून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर सुंदर आहे. संध्यासमयी सनईचे सूर सुरू असतांना पाय मंदिराच्या परिसरातच रेंगाळतात. मंदिराच्या उजव्या बाजूने 'हजरत याकूबबाबा सरवरी रहमतुल्ला दर्ग्या'कडे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. याकूबबाबा सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ स्वारीची तयारी सुरू असतांना त्यांची व याकूबबाबांची भेट झाली. याकूबबाबांनी त्यांना स्वारीसाठी मार्गदर्शन केल्याचे वर्णनही या भागात ऐकायला मिळते. याठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठा 'उरुस' होतो. या सोहळ्यात अनेक हिंदू व मुसलमान भाविक सहभागी होतात.

    केळशीहून दापोलीकडे जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे श्रीगणेशाचे जागृत दैवत आहे. या स्थानाला कड्यावरचा गणपती म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. देऊळ ११ व्या शतकातील असून त्याचा १७८० मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय, मध्ययुगीन रोमन आणि अर्वाचीन पाश्चात्य वैशिष्ट्यांचा संगम झालेला दिसतो. भव्य आणि तेवढीच सुंदर गणपतीच्या मुर्तीवर भाविकांचे लक्ष खिळून राहते. मंदिराच्या समोरच्या बाजूस तळे आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिराची रचनादेखील तेवढीच रेखीव आहे.

    श्रीगणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजर्लेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवरच्या पुलावरून सुंदर दृष्य दिसते. अनेक बोटी या खाडीत विसावलेल्या असतात. बोटींवरचे विविध रंगी झेंडे आणि बोटींचे रंग, शीड हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते. दापोलीला हर्णे मार्गे न जाता वरच्या डोंगराच्या बाजूने गेल्यास आंजर्ले समुद्रतटाचे नयनरम्य दृष्य प्रत्येक वळणावर समोर दिसते. समुद्रात दिमाखाने उभा असलेला सुवर्णदुर्गदेखील दूरूनच नजरेस पडतो. दोन्ही बाजूला असणाऱ्या सुरुच्या झाडीतून पुढे जात आपण मुरुडला जावून पोहचतो. समुद्र शांत असला तर याठिकाणी लहान तराफ्यातून जावून डॉल्फीनची जलक्रीडा पाहता येते. सकाळच्या वेळी या भागात 'सी गल' पक्षांचे थवे कॅमेऱ्यात कैद करता येतात. सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरून उंच झेपावणाऱ्या पक्षांचे मनोहारी दृष्य पाहायला मिळते. मुरुड गावाकडे जातांना पाणकोंबड्यांचे थवे खाडीवरून उडतांना दिसले. तर इतरही विविधरंगी पक्षांचे दर्शन या भागात घडले.

    मुरुड हे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे गाव. गावात त्यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंचच उंच नारळ-पोफळीच्या झाडीतून बीचकडे जाताना मज्जा वाटते. रस्त्याला लागूनच दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला पर्यटकांना आवडते. किनाऱ्यावरील स्टॉलवर क्रीडा साहित्य भाड्याने देण्याची व्यवस्था आहे. या परिसरात आने बीच रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सोबतच निवास-न्याहरी योजने अंतर्गत घरगुती राहण्याची व्यवस्थाही बऱ्याच ठिकाणी आहे. 

    मुरुडला मुक्काम करून सकाळी लवकर हर्णे बंदरावर गेल्यास इथला मासेबाजार पाहता येतो. सकाळी किनाऱ्याला लागलेल्या नौकामधून ताजे मासे उतरविले जातात. विविध रंग आणि आकाराचे मासे पाहणे ही खास पर्वणी असते. ताज्या कोळंबीच्या भरलेल्या टोपल्या बघून मांसाहार करणाऱ्या पर्यटकांच्या तोंडात पाणी न आले तरच नवल. पारंपरिक वेशातल्या कोळ्यांचे जीवनही इथे जवळून पाहता येते. रस्त्याने जाताना कोळ्यांची जाळी कशी विणली जातात तेदेखील पाहायला मिळते. हर्णे बंदराच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक 'सुवर्णदुर्ग'ला लहान होड्यातून भेट देता येते. फतेहगड, कनकदुर्ग आणि गोवा किल्ल्याचे दर्शनही रस्त्याच्या बाजूला घडते. कनकदुर्गला असणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर दीपगृह पाहायला मिळते. हर्णे गावात तोरणासारखी वाळायला घातलेली मासोळी ठिकठिकाणी दिसतात. काळ्या कातळावर वाळत घातलेल्या चमकणाऱ्या मासोळ्यांचे सौंदर्यही वेगळेच असते.

    हा फेरफटका करून प्रवासाचा थकवा घालविण्यासाठी मुरुडपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या आसूदगावाला आर्वजून भेट द्यावी. गावातील जोशी बागेजवळ व्याघ्रेश्वराचे प्राचिन मंदिर आहे. सुमारे ८०० वर्षापूर्वीचे हे शंकराचे स्थान अनेकांचे कुलदैवत आहे. मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या भातखंडी नदीचा नयनरम्य परिसर भाविकांचा थकवा दूर करतो. मंदिराच्या समोरच्या बाजूस कोरीवकामाचा अप्रतिम अविष्कार पाहायला मिळतो. प्रवेशभागाजवळ दीपमाळ आहे. मंदिरा शेजारीच ग्रामदैवत झोलाईदेवीचे मंदिर आहे. इथून पाचच मिनिटात आपण आसूदबागजवळ पोहचतो. नारळ-पोफळीच्या दाट बागा, वाळत खातलेल्या सुपाऱ्या, आणि पारंपरिक पद्धतीची कोकणी टूमदार घरे असे सौंदर्य इथे पाहायला मिळते.

    आसूदबागला दाबकेवाड्यापासून खालच्या बाजूस पायवाट जाते. गाडी येथेच पार्क करून खालच्या बाजूस पायी जावे लागते. काही सेकंद पायी चालल्यावर स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होईल, असा हिरवागार निसर्ग आपल्या सभोवती असतो. झुळझुळ वाहणारे पाणी, पोफळीची सरळ उभी असलेली झाडे, रस्त्यावर पडलेला गुलाबीशार जामच्या फुलांचा सडा, हवेतला गारवा...या सर्व वातावरणात बाहेरच्या विश्वापासून आपण अलगद वेगळे होतो. सोबत असतो तो केवळ आनंद आणि हिरवागार निसर्ग. या वाटेवरून उतरल्यावर कोटजई नदीचे खळखळ वाहणारे पात्र समोर असते. 

    नदीवरील साकव ओलांडून गेल्यावर श्री केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी सव्वादोनशे पायऱ्या चढून जाव्या लागतात. दहा मिनिटे चालून आल्यावर हा आकडा ऐकून चढावे की नाही, असा विचार मनात येतो. मात्र एकदा हिमतीने चढून वर गेल्यावर थकव्याचा स्पर्शसुद्धा शरीराला जाणवत नाही. दाट झाडीने वेढलेल्या या मंदिराच्या परिसरात चैतन्याचा अनुभव येतो. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोमुखातून थंड आणि शुद्ध पाणी चोवीस तास वाहत असते. उंच डोंगरावरून येणारे हे पाणी हातात घेतल्यावर 'बाजारात मिळणाऱ्या बाटल्यांपेक्षा स्वच्छ' अशी आमची प्रतिक्रीया होती.

    दगडाच्या चिंचोळ्या नालीतून हे पाणी खाली आणले गेले आहे. केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतरही परिसरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. परतीच्या वाटेवर निसर्गाच्या सान्निध्यात नि:शब्द होऊन शक्य तितका आनंद हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त करावासा वाटतो. वाटेवर गुलाबी फुले हातात घेऊन त्यांचे रुप न्याहाळत काही क्षण घालविण्याचा मोहदेखील आवरत नाही. कडेला असलेल्या घराच्या परसात बसून परिसर न्याहाळताना घेतलेल्या कोकम सरबताची चवही काही औरच लागते. दुरुन दिसणारे सुपारीचे पेंड झाडावर चढून हातात घ्यावेसे वाटतात. खरोखर स्वर्गलोकातली भटकंती यापेक्षा निराळी नसावी, असेच याठिकाणी वाटते. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार एकदातरी अनुभवायला हवा.