सांगली जिल्ह्यातील कायम स्वरुपी दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा खानापूर तालुक्याचे रुप आता पालटत आहे. या तालुक्यातील प्रत्येक गावाची माहिती आता इंटरनेटच्या माध्यमातून मिळणार आहे. महसूल विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा विशेष आराखडा तयार केला आहे. पुणे महसूल विभागातील सांगली जिल्ह्यात हा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी गावपातळीवरील महसूल विभागामार्फत माहिती संकलन करण्यात येऊन ही वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हे शतक संगणकीय शतक म्हणून ओळखले जात असून इंटरनेटच्या या माध्यमातून आपल्याला घरबसल्या विविध प्रकारची माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण महाराष्ट्राची माहिती मिळविण्यात अनेक अडचणी येत असतात. प्रत्यक्षात त्या परिसरात गेल्याशिवाय आपणास माहिती मिळत नाही. शासकीय कामकाजासाठी जर माहिती हवी असेल तर याची जबाबदारी मग कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यावर सोपविली जाते. तो कर्मचारी त्या भागात जाऊन संबंधित माहिती विविध ठिकाणी फिरुन एकत्रित करीत असतो. यासाठी बराच कालावधी लागतो. आता गावखेड्यातील ही माहिती संकलित करुन वेबसाईटवर उपलब्ध केल्यामुळे हा कालावधी तर वाचणार असून आर्थिक बचतही यामुळे होणार आहे. महसूल विभाग राबवित असलेल्या या उपक्रमामुळे ज्या कुणास माहिती हवी असेल ती माहिती उपलब्ध होईलच शिवाय वेळेचीही बचत होईल.
या पथदर्शी प्रकल्पामुळे प्रत्येक गावाची संपूर्ण माहिती त्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक गावाचे भौगोलिक क्षेत्र, सिंचन व शेताखालील क्षेत्र, वनाखाली आलेले क्षेत्र, पडिक क्षेत्र, गावचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, आरोग्य, गावात घेतली जाणारी पिके, गावात असणारी सर्व प्रकारची वाहने, पशुधन, गावातील व्यावसायिक अंतर्गत रस्ते व वाहतुकीची साधने, गावातील घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, विहिरीच्या योजना, स्मशानभूमी यासह समाज केंद्र आदी माहिती मिळणार आहे.
शिवाय गावातील दुग्धव्यवसाय, गावात असणारी स्वस्त धान्यदुकाने, जर गावामध्ये पेट्रोल पंप असेल तर त्याची माहिती, विद्युत व्यवस्था आणि कर्मचारी, दुचाकी चारचाकी वाहने, गावातील वाहन चालक तसेच वेल्डर, सुतार सारखे अन्य व्यावसायिक आपत्तीच्यावेळी सहाय्यभूत होऊ शकणाऱ्या, पोहचूशकनाऱ्या व्यक्ती, माजी सैनिक, गावच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संख्या, लोकसंख्या, अंध, अपंग व्यक्ती, ० ते ६ तसेच ६५ वर्षावरील व्यक्तींची माहिती, पुरुष व महिलांचे साक्षरतेचे प्रमाण, महिला लोकसंख्या, अनुसूचित जाती, जमातीची कुटुंब संख्या, गावच्या लोकांचे मोबाईल नंबर, बारा बलुतेदार, घरासंबंधीची माहिती, बंधारे, तलाव, कूपनलिकांची संख्या आदीही माहिती उपलब्ध असेल.
या पथदर्शी प्रकल्पांतर्गंत आपत्तीच्या काळात मदत करण्यासाठी काही विशेष असे ग्रुप तयार केले जाणार आहेत. याबाबतची माहिती यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे एक परिपूर्ण असा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार होऊ शकेल.
No comments:
Post a Comment