कथ्थक आणि लावणी हे दोन्ही नृत्यप्रकार म्हणजे साक्षात जुळय़ा बहिणी. कारण कथ्थक आणि लावणीच्या पदन्यासात खूपच साम्य आहे. केवळ पदन्यासात साम्य आहे असे नव्हे, तर अदाकारीमध्येदेखील साम्य आहे. कथ्थकमध्ये गणे'शवंदना असते. ती अशी -
गणेश लंबोदर तोहे
भुजा चार एकदंत
चंद्रमा ललाट राजे
ब्रम्हा, विष्णू, महेश
ताल दे धुवपद गावे
अतिविचित्र गणनाथ आज
मिरदंग बजावे
लावणीची सुरुवात देखील गणाने होते. कथ्थकमध्ये सरस्वती वंदना असते तर लावणीत मुजरा असतो. मुजरा सादर करताना कलावती पदराचे जरतारी मोर नाचवत मुजरा सादर करते. सरस्वतीचे वाहन मोर. त्यामुळे मुजरा सादर करते. सरस्वतीचे वाहन मोर. त्यामुळे मुजर्यात सरस्वती वंदना असते हे वेगळे सांगावयास नको. गोपी आणि कृष्णाच्या छेडाछेडीवरच्या अनेक ठुमर्या कथ्थकमध्ये असतात. यमुनेच्या तीरावर निघालेल्या गवळणींची पनीहारी गत कथ्थकमध्ये असते. माखनचोरी गत कथ्थकमध्ये असते. लावणीदर्शनाच्या कार्यक्रमातील गवळणींमध्ये यमुनेचा तीर आणि कृष्णाची छेडाछेडी यांचे उल्लेख ठायीठायी असतात. 'यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी` सारखी लोकप्रिय गवळण असू दे, किंवा 'दे रे कान्हा चोळी लुगडी` सारखी चित्रपटातील गवळण असू दे, अथवा 'तू गं ऐक नंदाचे नारी` सारखी पठ्ठे बापूरावांची पारंपरिक गवळण असू दे कृष्ण आणि गवळणींची मोहिनी जशी कथ्थकला तशी लावणीलाही !
तू गं ऐक नंदाचे नारी। काल दुपारी
यमुनेच्या तिरी गं जी जी गं जी
धुणं धूत होतो आम्ही। गवळय़ाच्या नारी गं जी जी गं जी
टाला वाजवीत बासरी । वस्त्रे आमची सारी
घेऊन गेला बाई कळंबा वरी
किती थट्टा सोसावी याची मस्करी। गेंद कुस्करी
थट्टा याची भारी
घाली बाई धिंगाना रोज इळसारी
पठ्ठे बापूराव कवी करी । कलगी डफावरी
डंका राजद्वारी। कृष्ण खेळला आठव्या अवतारी
कथ्थकमध्ये जसे अष्टनायिकांचे दर्शन होते, तशाच लावणीतही अष्टनायिका शृंगार रसाच्या विविध रूपांचे दर्शन घडवितात. 'अबोला का हो धरिता` सारखी विरहाची लावणी, 'शेज बाज केली` सारखी मिलनपूर्तीची लावणी, 'पाहुनिया चंद्र वदन मला साहेना मदन मदन ` या सारखी विप्रलंभ शृंगाराची लावणी आणि 'सैया गये परदेस` सारखी कथ्थकची ठुमरी हे पाहिल्यावर शंभर टक्के म्हणवेसे वाटते की कथ्थक आणि लावणी या जुळय़ा बहिणी आहेत. दोन सख्ख्या बहिणी एकमेकींच्या कपडय़ांची अदलाबदल जितक्या लीलया करतात तितक्याच लालित्यपूर्ण पद्धतीने लावणी आणि कथ्थकचे पदभाव आणि गतभाव एकमेकींच्या रूपांतरित होतात. खरे म्हणजे लावणी कथ्थक जुगलबंदी नसून तो एक भगिनी संवादच आहे.
कथ्थक लावणी जुगलबंदीचे किंवा कथ्थक लावणी जुगलबंदीचे प्रयोग अलीकडच्या काळात अनेक मान्यवर कलावंतांनी केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सप्तरंग महोत्सवात संध्या पुरेचा, झेलम परांजपे, प्राची शहा यांनी अनुक्रमे भरतनाट्यम् ओडिसी आणि कथ्थक सोबत लावणीचे प्रयोग केले. या प्रयोगांत लावणीदर्शन छाया खुटेगावकर व रेश्मा परितेकर यांनी घडविले होते. नऊ पिढयांची कथ्थक परंपरा असणार्या आचार्य गणेश हिरालाल हसल यांनी अशा स्वरूपाच्या प्रयोगाचा निर्धार केला आहे. मुंबईत कथ्थक केंद्राच्या रूपाने इंडिअन नॅशनल थिएटरमध्ये कथ्थकचे प्रशिक्षण आचार्य गणेश हिरालाल हसल देत असतात. त्यांच्या घरी नवव्या पिढीतही कथ्थकची परंपरा आहे. या नवव्या पिढीतील गणगौर शर्मा आणि शुभदा शर्मा या डॉ. पुर्णिमा शर्मा यांच्या सुकन्या. या दोघींनीही वयाच्या पाचव्या वर्षापासून आपले आजोबा आचार्य गणेश हिरालाल हसन यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले व कथ्थकमधील विशारद ही पदवी प्राप्त केली. गणगौर आणि शुभदा या दोघींनीही माघी उत्सव, किंकणी उत्सव, महाराष्ट्र उत्सव, भक्तीकला क्षेत्र, रथयात्रा महोत्सव, चॅरिटेबल संस्था यांमध्ये आपल्या नृत्यकलेने बहार आणली. राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपल्या नृत्याचा आविष्कार घडविला. आणि प्रत्येक वेळेस त्यांना प्रेक्षकांकडून उर्त्स्फूत दाद मिळाली.
No comments:
Post a Comment