अपंग या विषयाला अनेक कंगोरे आहेत. त्यापैकी कोणत्याही एका मुद्दयाबाबत लिहावयाचे म्हटले तरी त्यावर एक ग्रंथ होऊ शकतो इतकी अपंग या विषयाची व्याप्ती आहे, खोली आहे. कोणत्या प्रकारचा अपंग शासनाची कोणत्या प्रकारची नोकरी करु शकतो ही पदे सुनिश्चित करुन अलीकडे महाराष्ट्र शासनाने सुमारे १० हजार अपंगाना नोकऱ्या दिलेल्या आहेत. अपंगांच्या शाळा, अपंगाच्या स्वयंसेवी संस्था, अपंगांना राष्ट्रीय स्तरीय पारितोषिके, अपंग आयुक्तालय, अपंगाचे वित्तीय महामंडळ, अपंगाच्या राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदा या प्रत्येक विषयावर भरभरुन लिहण्यासारखे आहे. यापूर्वी यातील काही विषयांवर थोडेफार लिहिलेही गेले आहे. म्हणूनच “ अपंगाचा युरोप अभ्यास दौरा” या वेगळया विषयावर मुद्दाम दोन शब्द लिहित आहे.
मंत्रालयात विविध पदांवर काम करताना आणि विशेषत: महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचा पहिला व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असताना राज्यभरातील हजारो अपंग सतत माझ्याशी वेगवेगळया विषयावर चर्चा करीत असत. त्यामध्ये जगातील इतर देशात अपंगांसाठी असणारे कायदे व इतर सुविधा यावर विशेष भर असायचा. आर्थिक सुस्थितीत असलेल्या अनेक अपंग व्यक्तींनी परदेश पाहिला नसल्याची तसेच त्यांना विमानात बसण्याची कधी संधी मिळाली नसल्याची वेदना खूपदा बोलून दाखविली होती.
सुदैवाने मला अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा योग आला होता. शेवटी कोणत्याही परिस्थितीत त्यांचे हे स्वप्न पूर्ण करावयाचे ठरवून या आगळया वेगळया प्रकल्पाचा सर्व बाजूंनी अंदाज घेतला व अन्य विकसित देशातील अपंगाचे जीवन प्रत्यक्ष व जवळून पाहण्यासाठी अभ्यास दौरा करण्याचा माझा निश्चय पक्का झाला. हा या देशातील, कदाचित आशिया खंडातील पहिलाच प्रयोग असावा. या निमित्ताने देशाबाहेरच जायचे आहे तर अपंगाची संख्या अधिक असलेल्या, अभ्यासाची संधी असलेल्या युरोपमधील ११ देशांचा २० दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. स्वत: अपंग असलेल्या सचिन ट्रॅव्हेलच्या श्री. सचिन जकातदार यांनी या अभिनव कल्पनेला मन:पूर्वक साथ देवून ‘भरारी ’ नावाने २५ अपंग व त्यांचे मदतनीस तसेच संस्था चालकांचा अभ्यास गट युरोप दौऱ्यावर नेण्याचे धाडस केले.
जगातील सुंदर शहर असलेल्या पॅरीसहून दौऱ्याला सुरुवात करुन इटली, रोम मार्गे समुद्रातील तरंगते शहर व्हीनस सह पृथ्वीवरील नंदनवन स्विझर्लंडहून लंडनपर्यंतचा २० दिवसाचा दौरा केला.
या पहिल्या वहिल्या नाविन्यपूर्ण दौऱ्यामध्ये अनुभव, अडचणी व प्रसंगही नाविन्यपुर्णच होते. या दौऱ्यात फ्रान्समधले भारताचे राजदूत श्री. रंजन मथाई यांच्या समवेत पहिली बैठक झाली. तर लंडनमधील राजदूत स्वाती कुलकर्णी यांच्या लंडन निवासी खास स्नेह भोजनाने दौऱ्याची सांगता झाली. अकरा देश, तीन शासकीय पातळीवरील बैठका, तीन स्वयंसेवी संस्थांसोबत चर्चासत्रे़, अनेक अपंग संस्थांना भेटी, अपंगांकरिता खास लिफ्ट असलेल्या आयफेल टॉवर पासून पिसाच्या जग प्रसिध्द झुलत्या मनोऱ्यापर्यंतच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी अपंगासाठी राखीव व सोयीस्कर कार पार्कीग, स्त्री/ पुरुषांप्रमाणे प्रत्येक जागी अपंगाचे स्वतंत्र टॉयलेट अडथळा विरहीत मुक्त संचारासाठी रस्ते, दया नव्हे तर सुखसोयीने युक्त इंडीपेन्डट सेंटर्स (हॉस्टेल) अशा अनेक बाबी बरोबरच बहुतांश देशात अपंग भत्ता देण्यात येतो. अनेक देशात अपंग भत्ता या साऱ्या गोष्टी अंचंबित करणाऱ्या होत्या. थोडक्यात अपंगासाठी हा एक अनपेक्षित, ऐतिहासिक, अविस्मरणीय अभ्यास दौरा ठरला.
No comments:
Post a Comment