माझं आतापर्यंतच बहुतेक काम व त्यातून होणारी निर्मिती बहुतांशी पारंपरिक पद्धतीनेच झाली. आपल्या देशात शिल्पकला ही अजूनही पारंपरिक शैलीच्या बाहेर पडलेली नाही. नवकलेच्या सृजनशील निर्मितीचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर सुरू झाले असले तरी त्याला खर्या अर्थाने लोकमान्यता व लोकाश्रय मिळत नाही. समकालीन (contemporary) विशुद्ध वा अमूर्त शिल्पकलेला अत्यंत मर्यादित आश्रय मिळतो. कलादालन, कलाप्रदर्शन यामध्येच ती मांडलेली दिसतात. पण शिल्पाची खरी जागा असते उघडय़ावर, नैसर्गिक छायाप्रकाशात, त्याच्या भव्य आकारात, त्याचं चिरकालीनत्व सामावलेल असतं.
गेली पन्नास वर्षे कलानिर्मिती करीत असताना एक कलाकार म्हणून मला खूप आनंद व समाधान लाभलं. अनेक व्यावहारिक व तांत्रिक अडचणींना आणि आव्हानांना तोंड देऊन मी ती कामे यशस्वीरीतीने पूर्ण केली. अडचणींचे दु:ख कधीच वाटले नाही. उलट त्यांच्यावर मात करतांना एका विलक्षण धुंदीचा अनुभव मी घेतला.
तरीसुद्धा, आज मागे वळून बघतांना त्रयस्थपणे शिल्पकलेच्या सामाजिक संदर्भात विचार करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, शिल्पकलेची जाण आमच्या समाजात अभावानेच दिसते. शिल्पकला ही इतर नृत्य, संगीत, वाङ्मय, चित्र कलांइतकीच प्रतिष्ठित आहे, याचा कुणी गांभीर्याने विचार करीत नाही. सर्वसाधारण माणसांपर्यंत शिल्पकलेची महती पोहोचली पाहिजे. यासाठी जुन्या नव्या शिल्पकृतींचा आस्थेने सांभाळ केला पाहिजे.
शिल्पालय हे म्युझियम कल्याणमध्ये गांधी चौकात आहे. कलाप्रेमी लोकांना एकत्र आणणे आणि सर्व सामान्य लोकांना एकत्र आणून त्यांच्या कलेविषयी आवड निर्माण करणे हा म्युझियम निर्मितीचा मुख्य हेतू आहे. मी आत्तापर्यंत निर्माण केलेल्या जवळजवळ १५० कलाकृती इथे जतन करून ठेवल्या आहेत. या शिल्पालयाच्या इमारतीत एक छोटेसा व्याख्यान हॉल असून तिथेच फिल्म दाखविण्याची ही सोय आहे. विद्यार्थी आणि कलाप्रेमींना दृकश्राव्य माध्यमातून कलेचा आस्वाद घेता येईल अशी ही व्यवस्था आहे. ह्या शिल्पालयाची माहिती आपल्याला shilpalay.org या वेबसाईटवर पहाता येईल.
शिल्पकलेविषयी म्हणावे वाटते की, आजच्या महापुरूषांची स्मारके करताना नुसते पुतळे न उभारता ज्या कारणासाठी ही थोर मंडळी झटली ते विषय घेऊन ती बनवावीत. असे विषय, अशी आव्हाने आपण शिल्पकारापुढे उभी करून पहा, नव्या दमाचे प्रतिभावान कलावंत पुढे येतील. नवनव्या संकल्पना आकार घेतील व प्रतिभाशून्य डबक्यात अडकून पडलेल्या या कलेला मोकळी वाट मिळेल. आपल्या पायांनी नव्या वाटा शोधीत ही कला प्रवाहित होईल. वेरूळ ही लेणी नुसती संख्येने मोठी नाहीत तर आशयाच्या दृष्टीने त्या पेक्षाही मोठी आहेत. शतकामागून शतके कलावंत दगडाला आकार देत होते, पण त्यांचे विषय संपले नाहीत. प्रतिभा खुंठली नाही. सामाजिक संस्कृतीबरोबर कलेची अभिव्यक्ति प्रवाहित व प्रगत होत गेली.
खरे म्हणजे ही आमची कला परंपरा, ही आमची संस्कृती! या परंपरेत आमची आजची शिल्पकला कोठेतरी जवळपास उभी राहू शकते का? कुठले तरी नाते आम्हाला घारापुरीच्या परंपरेशी जोडता येईल का? हा खरा आजचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
No comments:
Post a Comment