Thursday, December 1, 2011
बचतगट करीत आहे शेतीमध्ये नवीन प्रयोग
अमरावती जिल्हयातील बोरगाव ता. मालेगाव येथे वसंता अश्रुजी लांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला वैभव शेतकरी बचत गट आपल्या गट शेतीत विविध प्रयोग करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आठ एकर शेत जमिनीला केवळ एका तासात एकाच वेळी खत आणि पाणी देण्याचा प्रयोग या शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. परिणामी त्यांचे कष्ट, पैसा आणि वेळ यांची बचत होवून उत्पन्नात सातत्याने भर पडत आहे.
विदर्भात सिंचनाचा अनुशेष आहे. शेतकरी पावसावर आधारित कोरडवाहू शेतीत अत्यंत परिश्रम करावे लागतात. परंतु यावर कल्पकतेने मात करता येते, याची प्रचिती बोरगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून दिली आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केल्यास कमी श्रमात आणि कमी खर्चात उत्तम शेती करता येते,
हा आदर्श बोरगाव पॅटर्नने निर्माण केला आहे. शेतीला पाणी देणे हे कष्टाचे काम आहे. यापेक्षाही कष्टाचे काम म्हणजे पिकांना खत देणे आहे. त्यासाठी मजूर मिळत नाहीत, ही मोठीच अडचण पारंपरिक पध्दतीने कपाशी पिकाला खत देण्यासाठी शेतकऱ्याला खाद्यांवर फावडे आणि कमरेला ओटी बांधावी लागते, तर सोयाबीन पिकाला मोघ्याव्दारे प्रत्येक ओळीत फिरुन प्रत्येक झाडाच्या मुळापाशी खत द्यावे लागते. ही बाब खूप कष्टाची आहे. यासाठी वेळ आणि प्रचंड मेहनत लागते. पण लांडकर यांनी आपल्या सर्जनशीलतेतून यावर मात केली आहे. कपाशी पिकाला खत देण्यासाठी त्यांनी पोटाला ओटी बांधण्याची गरज ठेवली नाही. त्यासाठी प्रथम खताचे पाणी करायचे व त्या पाण्यावर टिल्लू मोटारपंप बसवून तो ठिबक सिंचनाच्या नळीला जोडायचा. यामुळे थेट झाडाच्या मुळांना, बुंध्यांना एकाचवेळी पाण्यासह खताची आवश्यकते नुसार मात्रा मिळते. यामध्ये खताचा अपव्यय सुध्दा होत नाही.
गतवर्षी पाणीटंचाई असताना त्यांनी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करुन अत्यंत कमी पाण्यावर गहू, हरभरा यांचे भरघोस उत्पन्न घेतले. तसेच त्यांनी मान्सूनपूर्व बीटी कापसाची लागवड केली होती. एक बाय चार फुटावर टोकन पध्दतीने कापूस लागवड करुन ठिबक सिंचनाव्दारे पाणी व खत दिले. परिणामी, २४ तासात एकच लांब आकाराचा अंकुर येऊन पाचव्या दिवशी पूर्ण कापूस उगवला. केवळ दोन ते तीन वेळा पाणी देऊन उत्पन्न घेतले. मात्र, कपाशीच्या मशागतीसाठी जास्त खर्च येतो म्हणून या पिकात सोयाबीनचे आंतरपीक घेतले. परिणामी, कपाशीच्या पिकांवर झालेला पुर्ण खर्च निघून कपाशीचे पीक निव्वळ नफयात राहिले. दरम्यान, त्यांनी आपल्या गटशेतीत उन्हाळी मूग पेरुन समाधानकारक उत्पन्न घेतले. लांडकर यांच्या मतानुसार, अभ्यासपूर्ण सिंचनातून समृध्दी आणणे शक्य आहे. सर्वच व्यवसायांमध्ये मोजमापाचा वापर केला जातो. शेती व्यवसायातसुध्दा अशाच अचूक मोजमापाचीची गरज आहे. पाणी मोजून देणे गरजेचे आहे. पिकाच्या मुळया जर पाच से.मी. खोल असतील, तर अडीच से.मी. खोलीपर्यंत पाणी पिकालाद्यावे. असे पाणी दिल्यास ओलावा पाच से.मी. पर्यंत हमखास जाते. त्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर बोरगावच्या गट शेतीत केला जात आहे. हा पर्जन्यमापक तुषार सिंचनाखाली ठेवला जातो. त्याचवेळी एखादे रोपटे उपटून मुळे किती खोल आहेत, हे बघायचे, मुळयांच्या लांबीच्या निम्मे पाणी पर्जन्यमापकात जमा झाले की तुषार सिंचन संच बंद करायचा. पिकाला दिलेल्या पाण्यापैकी ९० टक्के पाणी जमिनीत मुरते किंवा बाष्पीभवनाव्दारे वाया जाते.
उर्वरित केवळ दहाच टक्के पाणी पिकाच्या उपयोगाकरिता येते, त्यामुळे अभ्यासपूर्ण सिंचन करणे गरजेचे
आहे. तसेच केल्यास निश्चितच कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही, हे लांडकर यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment