अलिबाग हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरात चांगले साहित्यिक होऊन गेले. वाचकांची वाचनाची भूक भागविली जावी यासाठी शहरात तीन तर संपूर्ण तालुक्यात शासनमान्य वाचनालये दहा आहेत. ही वाचनालये वाचकांसाठी चांगली सेवा देत आहेत, त्यांनी चांगली सेवा द्यावी म्हणून अनुदानाच्या रुपाने त्यांना शासन मदत करीत असते. या वाचनालयांसाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे आणि वाचन संस्कृती वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथ प्रदर्शन ग्रंथोत्सवाचे आयोजन केले होते.
त्यातीलच एक ग्रंथोत्सव माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने, रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. अलिबागच्या ग्रंथोत्सव २०११ साठी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व सेवकवर्गाने चांगली मेहनत घेऊन तो यशस्वी केला.
अलिबाग शहरात पुस्तकांची दुकाने आहेत परंतु वाचक या ठिकाणी पुस्तक खरेदी करण्यास जातोच असे नाही. दुकानात जरी पुस्तके असली तरी ती स्वत:ला चाळता येत नाहीत, पाहता येत नाही, परंतु ग्रंथ प्रदर्शनातून, ग्रंथोत्सवातील लावलेल्या पुस्तक प्रदर्शन वा स्टॉलमधून वाचकाला स्वत:ला पुस्तके पाहण्याचा, चाळण्याचा अधिकार असतो, स्वातंत्र्य असते, यातून तो आवडलेली पुस्तके खरेदी करतो. ही पुस्तके खरेदी करण्याचा त्याला मोह होतोच. एरव्ही बाजारपेठेतील दुकानातून आपण आपल्याला लागणारी वस्तू खरेदी करतो. गावात जत्रा व आठवडा बाजार असेल तर यातून या वस्तू माफक दरात मिळत असल्यामुळे त्या आपण आवर्जून खरेदी करतो. हीच गोष्ट खरेदीबाबतची ‘ग्रंथोत्सवा ’ ची आहे. असे ग्रंथोत्सव पुस्तक प्रदर्शने जिल्हा पातळीबरोबरच तालुका पातळीवर वारंवार भरवली तर पुस्तकांची खरेदी वाचक चोखंदळपणे करतील असे मनमुराद विचार अनेक वाचकांनी ग्रंथोत्सवप्रसंगी बोलून दाखविले. अशा प्रदर्शनातून पुस्तकांची खरेदी होऊन वाचन चळवळ अधिक वृद्धींगत होईल यात शंका नाही.
अलिबाग येथे दिनांक १८,१९, २० डिसेंबर रोजी ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ग्रंथोत्सवाची सुरुवात शहरातील जोगळेकर नाक्यावरील विठ्ठल रखुमाईचे पूजन व ग्रंथाचे पूजन करुन ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली.
प्रथम चौकात असलेल्या छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येऊन दिंडी बाजारपेठेतून फिरुन ग्रंथोत्सवस्थळी आली. सुंदर वाद्यसंगीत व अभंगवाणीच्या निनादात निघालेल्या या ग्रंथदिंडीत जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी, प्रमुख कार्यवाह संजय भायदे, सहकार्यवाह वसंत भाऊ चौलकर, राज्य ग्रंथालय संघाचे कार्योपाध्यक्ष उदय सबनीस, शहाबाज वाचनालयाचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील व संचालक मंडळ, पत्रकार मुश्ताक घट्टे, साहित्यिक गे.ना.परदेशी, पी.एन.पी. महाविद्यालयाच्या प्रा.श्रीमती बोराडे, विद्यार्थी वर्ग, तालुक्यातील, जिल्ह्यातील ग्रंथालयांचे पदाधिकारी, सेवकवर्ग व नागरिक सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात ही ग्रंथदिंडी संपन्न झाली.
ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले. यावेळी मराठी भाषा आणि वाचन संस्कृती या विषयांवर परिसंवाद झाले. या परिसंवादात कृषीवलचे मुख्य संपादक संजय आवटे, नितीन केळकर, प्रा. शंकर सखाराम, सतीश काळसेकर, अनुराधा औरंगाबादकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याचे सूत्रसंचालन जयंत धुळप यांनी केले.
बालकाव्य वाचन, महिला काव्यसंमेलन, काव्यसंध्या, दिवाळी अंक स्पर्धा, बदलत्या काळातील वाचन संस्कृती या विषयांवर चर्चासत्र झाले. यात हरी नरके, अभिनंदन थोरात, जयंत धुळप, प्रफुल्ल फडके आदींना चर्चासत्रात भाग घेऊन मार्गदर्शन केले व ग्रंथालय, वाचन चळवळ वाढली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
तीन दिवस चाललेल्या या ग्रंथोत्सवासाठी अनेक मान्यवरांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, वाचकवर्गांनी उपस्थित राहून ग्रंथ, पुस्तके खरेदी केलीय. ग्रंथोत्सवाचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे व रायगड जिल्हाधिकारी एच.के.जावळे यांच्या उपस्थितीत झाला.
रंगसेवा संस्थेने सादर केलेल्या ‘स्मारकाच्या गावा’ हा प्रभावी नाट्यप्रयोग होऊन ग्रंथोत्सवचा समारोप झाला. अगदी चांगला प्रतिसाद लाभलेला हा ग्रंथोत्सव सतत व्हावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment