बचतगट ही संज्ञा आता राज्यात सर्वतोमुखी झाली आहे. हा शब्द उच्चारताच शहराबरोबर ग्रामीण भागात हजारो महिला एकवटत असतात. या शब्दांनी महिलांना एवढे प्रभावित केले आहे. याचाच अर्थ आता ही एक चळवळ झाली असून त्याची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. मग सांगली कशी बरे याला अपवाद राहील.
सांगली जिल्ह्यात या महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. लोणची पापडासारख्या पारंपारिक व्यवसायाबरोबच सॅनिटरी नॅपकीन, बंटेक्स ज्वलरी, गारमेंटच्या व्यवसायात हे गट सहभागी झाले असून लाखो रुपयांचा व्यवहार या महिला करीत आहेत. बचतगट ग्रामीण भागातील महिलांना वरदानच ठरले आहे. त्याचबरोबर सांगली शहरातील महिलाही सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत जवळ जवळ साडेचार हजार महिलांना स्वयंरोजगार सांगली महापालिकेने मिळवून दिला आहे.
नागरी भागात, नागरी सुविधा देण्याचे कार्य महापालिका करत असली तरी नागरी भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारावे यासाठी कल्याणकारी राज्यात महापालिका प्रयत्नशील असतात. राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत महापालिकेने महिला बचत गट स्थापन करुन या महिलांना आत्मनिर्भर केले आहे.
या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम तर केले आहे. शिवाय सुमारे 500 तरुणींना स्व-संरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण दिले असून या महिला आता आपल्या गटामधील सहकारी भगिनींनाही हे प्रशिक्षण देत आहेत.
महापालिकेमार्फत महिलांना ब्युटी पार्लर, कॅटरिंग, फॅशन डिझायनींग तसेच संगणकाचेही प्रशिक्षण देत आली आहे. यापैकी 2,500 महिलांनी फॅशन डिझायनींग, 1500 महिलानी कॅटरिंग तर 500 महिलांनी ब्युटी पार्लर आणि संगणकाचेही प्रशिक्षण घेतले आहे. गेली 10 वर्षे महापालिका हे प्रशिक्षणाचं कार्य करीत आली आहे. याचा लाभ या साडेचार हजार महिलांनी घेतला आहे.
कॅटरिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी खानावळीचा व्यवसाय सुरु केला आहे. छोट्या मोठ्या समारंभाचे कंत्राट या महिला स्वीकारत असतात. महापालिकाही आपल्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्यावेळी उपहाराचे कंत्राट प्राधान्याने या महिला बचत गटानाच देत असते.
ब्युटीपार्लर तसेच फॅशन डिझायनींगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपले व्यवसाय घरबसल्या सुरु केले आहेत. या सर्व महिलांचे व्यवसाय आता स्थिर झाले आहेत. या प्रशिक्षणामुळेच आज आम्ही स्वत:चे संसार सावरु शकलो असे या महिला सांगत असून या महिलांचा सुधारलेला आर्थिकस्तर पाहून त्यांच्या परिसरातील इतर भगिनीही आता या प्रशिक्षणासाठी स्वत:हून पुढे येत आहेत.
महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रात आतापर्यत 597 महिला बचत गट स्थापन करण्यात येऊन या गटांना राज्य शासनामार्फत एकूण 45 लाख 91 हजाराचे अनुदान खेळते भांडवल म्हणून देण्यात आले आहे. या प्रत्येक गटात 10 महिलांचा समावेश असतो. बचतगटातील या महिलांनी या खेळत्या भांडवलावर आपले उद्योग सुरु केले आहेत.
लोणची/पापडासह कोल्हापूरी चप्पल, फिनेल तयार करणे, स्टेशनरी, साडी विक्री, हळदपुड, मसाले, गारमेंट, दुग्धव्यवसाय आदी उद्योगही या महिला करीत आहेत. यामुळे या झोपडपट्टीत रहाणाऱ्या भगिनी आता स्वयंसिध्दा झाल्या असून आपले बँक व्यवहारही त्या स्वत:च करत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या महिला आपली कर्ज फेडीची तारीख जवळ आली की, स्वत:हून बँकेत येऊन आपले हप्ते भरत असतात. शुभांगी पवार या तरुणीचे उद्गार या संदर्भात बोलके आहेत. साहेब, या गटाने आम्हाला झोपडीच्या अंधारातून बाहेर काढून जग दाखवलं. आमची मुलं शिकू लागली या परीस आणखी काय पाहिजे आम्हाला !
बचत गटामुळेच या महिला एकत्र येऊन सुसंवाद साधू लागल्या. परस्परामध्ये विचार विनिमय करु लागल्या. त्यांचा आर्थिक सामाजिक स्तर सुधारला याची जाणीव त्यांना आहे. आज या महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरु झाली आहे आणि हे या चळवळीचे यश आहे.
No comments:
Post a Comment