परभणीच्या जिल्हा माहिती कार्यालय व मराठी भाषा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमान परभणी येथील रघुनाथ सभागृहात 'ग्रंथोत्सव २०११' हा साहित्यविषयक उपक्रम यशस्वीपणं आयोजिण्यात आला.
१४ ते १६ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत दर्दी रसिकांची उपस्थिती हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. १४ डिसेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.शालीग्राम वानखेडे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.मित्रगोत्री यांच्या उपस्थितीत ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी वनीकरण विभागाचे उपसंचालक डॉ. देसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी, गणेश सार्वजनिक वाचनालयाचे संदिप पेडगावकर, डॉ. आनंद देशपांडे, महेश देशमुख, विजय देशमुख, एस.एस. पवार आदी उपस्थित होते. सायंकाळी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या कवितांवर आधारित 'रसयात्रा' हा कार्यक्रम झाला.
गायक श्रीकांत देशपांडे यांनी 'सर्वात्मका सर्वेश्वरा' हे शब्द आळवून सुरु केलेल्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यसागरात सर्व रसिक मनसोक्त डुंबत होते. सुमारे दीड तास चाललेली ही काव्यरसयात्रा संपूच नये, असं रसिकांना वाटत होतं.श्रीकांत उमरीकर यांचं बहारदार सूत्रसंचालन, इंद्रजीत भालेराव आणि रविशंकर झिंगरे यांचं नाट्य-पद्य-गद्यमय सादरीकरण यामुळं कवी कुसुमाग्रज आणि नाटककार वि.वा.शिरवाडकर या एकाच व्यक्तीचे विविधांगी पैलू रसिकांसमोर सोदाहरण उलगडण्यात आले.
१५ डिसेंबरला सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'गरज वाचनसंस्कृती जोपासण्याची' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी देशमुख प्रथम, नितीन चव्हाण द्वितीय तर पंजाब खानसोल तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. ऋतुराज कुलकर्णीला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला.
यावेळी संवादफेक, आवाजातील चढ-उतार, संवादानुरुप चेहर्यावरील भाव, आवश्यक त्या शारीरिक हालचाली यातून मधुकर उमरीकर यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वास्तुपाठच घालून दिला. त्यांनी 'श्यामची आई' या प्रयोगातील ' श्याम चोरी करतो' हा आणि शेवटचा प्रवेश सादर केला. त्यातील ह्रदयद्रावक प्रसंगानं उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, पण त्याच वेळी वक्तृत्व सादर करताना कोणत्या गुणांची आवश्यकता आहे, याचं थेट प्रात्यक्षिकच सर्वांना पहावयास मिळालं. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून डॉ. आनंद देशपांडे यांनी तर परीक्षक म्हणून श्रीमती अर्चना डावरे, हनुमंत एम. कुलकर्णी, विजय उत्तमराव देशमुख यांनी जबाबदारी पार पाडली.
सायंकाळी निमंत्रितांचं कविसंमेलन झालं. प्रेमभर्या कवितांनी प्रारंभ झालेल्या काव्यसंध्येत न पाहिलेल्या आईच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या तसंच शेतकर्यांची व्यथा-कथा मांडणा-या संवेदनशील कवितांनी परभणीकर मोहरुन गेले. 'काव्यसंध्या' या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रावसाहेब चोले हे होते. यावेळी केशव खटींग, रेणू पाचपोर, मोहन कुलकर्णी, केशव वसेकर, प्रा. संजय चिटणीस, संतोष नारायणकर, कमलताई कुलकर्णी, सरोजनी करजगीकर, आत्माराम कुटे, वसुधा देव, महेश कोरडे-पाटील, दादासाहेब सादोळकर, बालासाहेब गायकवाड, महेश देशमुख आदींनी आपल्या कविता सादर करुन श्रोत्यांची दाद मिळवली.
१६ डिसेंबरला सकाळी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली 'माध्यमांचे वाचक चळवळीवरील परिणाम' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डी. एन. शिंदे, हेमंत कौसडीकर, संदिप पेडगावकर आदी सहभागी झाले. समारोपप्रसंगी विनोद कापसीकर, नितीन धूत, गजानन निशानकर, दत्ता लाड, प्रसाद आर्वीकर, डॉ. धनाजी चव्हाण, मंचक खंदारे आदी उपस्थित होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं.
ग्रंथ हा माणसाचा खरा मित्र आहे. समाजाची बौद्धिक उंची वाढवण्यासाठी वाचन हा एक पर्याय मानला जातो. ग्रंथच माणसांना घडवितात, माणसांच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावण्याचं काम करतात. हे लक्षात घेऊन ग्रंथोत्सवातील सर्व कार्यक्रम त्याभोवती केंद्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रामदास डांगे, देविदासराव कुलकर्णी, इंद्रजीत भालेराव, श्रीकांत उमरीकर, आसाराम लोमटे, विनोद कापसीकर, अशोक कुटे, संतोष धारासूरकर, हेमंत कौसडीकर, नितीन धूत, सतीश जोशी, सूरज कदम, दत्ता लाड, सुरेश जंपनगीरे, प्रवीण चौधरी, धाराजी भुसारे, चंद्रकांत डहाळे, राजकुमार हट्टेकर, रामेश्वर पवार , संदिप पेडगावकर, डॉ. आनंद देशपांडे, महेश देशमुख, मधुकर उमरीकर, सुरेशचंद्र गुप्ता, प्रवीण देशपांडे, मल्हारीकांत देशमुख, त्र्यंबक वडजकर, आनंद पोहनेरकर, सुरेश मुळे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, गणेश पांडे, संजय भराडे, शरद काटकर, सुरेश मगरे, विजय दगडू तसंच परभणी आकाशवाणी केंद्राचे संचालक सतीश जोशी यांचं सहकार्य लाभलं. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचा कोणताही पूर्वानुभव नसताना जिल्हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रणचालक गोविंद कुलकर्णी, प्रवीण भानेगावकर, एकनाथ मुजमुले, चव्हाण, निरडे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं परभणीकरांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.
'सेलिब्रिटीज'ना पाचारण करुन हा ग्रंथोत्सव केवळ उत्सवी किंवा गर्दीचा न बनवल्यामुळं खर्या दर्दी परभणीकरांना विविध कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटता आला, अशी रसिकांनीच दिलेली पावती हेच या उपक्रमाचं यश मानावं लागेल.
- राजेंद्र सरग
No comments:
Post a Comment