Monday, December 19, 2011
दुधी भोपळ्याचे पीक फायदयाचे
कोकणातील शेतकऱ्याचा आता विविध नाविन्यपूर्ण पिके घेण्यावर जास्त भर आहे. त्यामध्ये दुधी भोपळयाचेही पीक येते. दुधी भोपळ्यात फारशी पौष्टीक द्रव्ये नसली तरी कार्बोहायड्रन्टेस व खनिज द्रव्ये पुरेशा प्रमाणात असतात. यामध्ये सारक गुणधर्म असल्याने पचनास हलका असतो. दुधी भोपळ्यापासून दुधी हलवा करतात. त्यामुळे बाजारातही चांगली मागणी असते.
पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम किंवा भारी जमीन या पिकास पोषक ठरते किंवा हलक्या जमिनीतही भरपूर सेंद्रिय खताचा वापर केल्यास पीक चांगले मिळते. जमिनीचा सामू ६ ते ७ दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. मात्र, कडाक्याची थंडी या पिकास अपायकारक ठरते.
यामधील संकरित जाती पुसा नवीन, अर्का बहार, सम्राट, पुसा समर,प्रॉलिफिक लॉग, पुसा समर प्रालिफिक राऊंड, पंजाब कोमल अशा असून कोकणात लागवडीसह सम्राट जातीची शिफारस केली जाते. या जातीची फळे हिरवी व मध्यम आकाराची असून ती दंडगोलाकृती असतात व ही फळे दूरवर बाजारात पाठविल्यासही उत्कृष्ट राहतात तर हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल उत्पन्न मिळते.
लागवडीसाठी जमीन तयार करुन घेतल्यावर ३ मीटर अंतरावर ५० ते ६० सें.मी.रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस ३० से.मी.लांब,तेवढेच रुंद व खोल आकाराचे ९० सें.मी. अंतरावर खड्डे तयार करावेत. प्रत्येक आळ्यात एक ते सव्वा किलो शेणखत, १० ग्रॅम कार्बारील पावडर मातीत मिसळून घ्यावी. लागवडीपूर्वी हेक्टरी ३७ किलो नत्र, ५० किलो स्फूरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे सर्व आळ्यात सारख्या प्रमाणात विभागून द्यावे. प्रत्येक आळ्यात ३ ते ४ बिया टाकाव्यात. म्हणजे हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे पुरते. फक्त दोनच जोमदार रोपे ठेवावीत.
जास्त उत्पादनासाठी वेल मांडवावर चढवावेत. उन्हाळी हंगामात वेल जमिनीवर सोडले तरी चालतात. नत्र खताची ६० किलोची मात्रा ३० आणि ६० दिवसांनी घ्यावी. या पिकावर भुरी रोग,केवडा,कडा करपा,मावा,तांबडे भुंगेरे फळमाशी अशा रोगापासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी कॅराथोन,डायथेन एम-४५,डायथेन झेड-७८ या औषधांनी पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळे कोवळी असतानाच काढावीत. साधारणपणे फळांवर लव असताना व फळास नखाने हळूच दाबल्यास नखांचे व्रण दिसतात. अशा वेळी फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळे दर ५ ते ६ दिवसांच्या अंतराने काढावीत. हेक्टरी ३०० ते ४०० क्विंटल उत्पादन मिळते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment