Thursday, December 1, 2011

सेवाव्रती भगिनी !

नवी मुंबईतील पत्रकार, स्तंभलेखक, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र घरत १५ जुलै रोजी कार्यालयात आले आणि त्यांनी १५ ऑक्टोबर या जागतिक अंधदिनी रत्नागिरी जिल्ह्यातील घराडी येथील अंधशाळेत कार्यक्रमासाठी जाण्याचे आमंत्रण दिले. श्री.घरत हे स्वभावत:च वक्तशीर आणि काटेकोरपणे कामकाज करणारे असल्यामुळे कार्यक्रमाचे निमंत्रणही त्यांनी बरोबर तीन महिने आधी दिले. शिवाय विस्मरण होऊ नये म्हणून ते अधून मधून आठवणही करुन देत राहिले. त्यामुळे मलाही घराडीची अंधशाळा बघण्याची ओढ लागली.

मुळातच मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अंधांसाठी शाळा असणे ही काही आता फार अप्रुपाची गोष्ट राहिलेली नाही. परंतु घराडीसारख्या एका दुर्गम ठिकाणी अंधांसाठी निवासी शाळा चालविली जाते, ही खरोखरच अपूर्वाईची बाब म्हटली पाहिजे आणि अशा ठिकाणी चालणारी शाळा, तिचे कामकाज पाहणं, तिथल्या मुलांना भेटणं, मला माझं कर्तव्यच वाटू लागलं. शेवटी कुठल्याही प्रकारची अडचण न येता, ऐनवेळेला अन्य महत्वाचे कार्यक्रम न आल्याने मी राजेंद्र घरत, ॲड.योगेश मोरे आदी मंडळी घराडीला पोहोचलो. 

आम्ही आल्याची वर्दी मिळताच शाळेच्या मुख्य शिक्षिका सौ. प्रतिभा सेनगुप्ता यांनी आमचं अत्यंत उत्साहाने स्वागत केलं. आत गेल्यावर त्यांच्या थोरल्या भगिनी तथा शाळेच्या अध्यक्षा आशाताई कामत यांची भेट झाली. एकंदरीतच दोघींचं व्यक्तीमत्व, अगत्याची भावना, शाळेत कार्यक्रमांमुळे निर्माण झालेली आनंदाची लहर, मुलांमधला उत्साह अशा सर्व भारलेल्या वातावरणात प्रवेश करताच इतक्या दूर आल्याचं सार्थक झाल्याचं वाटलं. पुढे दिवसभर मुलांचे संगीताचे कार्यक्रम, नकला, पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमातून दिवस कसा संपला हे लक्षातच आले नाही. याबरोबरच प्रतिभाताई आणि आशाताई या भगिनींचे अकृत्रिम व्यक्तिमत्व मनावर कायमचं ठसलं.

वस्तुत: आशाताईचे पती हे भारतीय लष्करातून कर्नल म्हणून निवृत्त झाले तर चिरंजीव सध्या भारतीय वायुदलात विंग कमांडर म्हणून कार्यरत आहेत. कन्या अमेरिकेत स्थायिक आहे तर प्रतिभाताईंचे कुटुंबीय पुण्यात स्थिरस्थावर आहेत. पुण्याच्याच अंधशाळेतून प्रतिभाताई निवृत्त झाल्या आहेत. एकीकडे प्रतिभाताईंची निवृत्ती आणि आशाताईंची सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यामुळे आता उर्वरित आयुष्य समाजासाठी वेचण्याची भावना यातून आपल्या जन्मघरी कोकणातील अंध मुलांसाठी निवासी शाळा सुरु करण्याची कल्पना पुढे आली. या कल्पनेतूनच यश स्नेहा ट्रस्ट, घराडी या ट्रस्टची स्थापना करण्यात येऊन मार्च २००३ पासून ट्रस्टतर्फे स्नेहज्योती अंध विद्यालय (निवासी) घराडी सुरु करण्यात आले. 

गेल्या आठ वर्षात शाळेची यशाची कमान सतत वाढतच असून आज या शाळेत ५ ते १७ वयोगटातील ३० मुलं व मुली इयत्ता ७ वीपर्यंत शिकत आहेत. शाळेत ४ शिक्षक, १ संगीत शिक्षक, १ सहाय्यक शिक्षिका, मुलींच्या वसतिगृहासाठी ४ महिला कर्मचारी, कार्यालयीन कामासाठी अन्य कर्मचारी नेमण्यात आलेले आहे. शाळेला आतापर्यंत स्व.वैभव फळणीकर फाउंडेशन, पुणे तर्फे सन २००७ चा वैभव स्मृती पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद, दापोली- चिपळूण व फ्युचर इंडिया दाभोळ तर्फे सन २००९ चे सन्मानचिन्ह व त्याच वर्षी आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित पुलोत्सवमध्ये कृतज्ञता सन्मान व रु.११०००/- चे रोख बक्षिस, श्री.सिध्दीविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, प्रभादेवी , मुंबई चा पुरस्कार (२०१०) , लोकमान्य सेवा संघ मंदिर, विलेपार्ले, मुंबईतर्फे देण्यात येणारा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (२०११) असे असंख्य पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. तर दोघी भगिनींना मिळून महालक्ष्मी महिला सेवा संस्था, कल्याण तर्फे देण्यात येणारा लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार, के.बी. उर्फ अण्णा तळवळकर मेमोरियल पुणेतर्फे देण्यात येणारा सेवाव्रती पुरस्कार, २०१०, ओम साई प्रतिष्ठानतर्फे समाज सेवेसाठीचा पुरस्कार ‍िमळालेले आहेत.

पालकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांची सेवाभावी वृत्ती, दानशूर व्यक्ती व संस्थांचा मदतीचा हात आणि कुटूंबियांचा पाठिंबा यामुळेच ही शाळा उभी राहिली आहे, अशी कृतज्ञतेची भावना आशाताईंनी बोलताना व्यक्त केली. मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता जगातील चालू घटना, घडामोडी कळाव्यात म्हणून प्रतिभाताईंनी आजपर्यंत ५० पुस्तकं ब्रेल लिपीतून तयार केली आहेत.

ज्यांनी आयुष्यात कधी प्रकाशच पाहिला नाही, त्यांच्या जीवनात आनंदानं सहभागी होऊन त्यांना एक चांगला माणूस घडवुया” हे ब्रीद या भगिनींनी मनोमन जपलेलं आहे. शाळेची देखणी वास्तू, त्यातील हवेशीर वर्ग, संगीत जागा, समर्पित शिक्षक, व्यावसायिक शिक्षण, सकस अन्न, वैद्यकीय सुविधा, विविध कलांचे शिक्षण आणि मुख्य म्हणजे या बालकांना अकृत्रिम प्रेम मिळावे यासाठी या दोघी भगिनींनी आपलं आयुष्य झोकून दिलेलं आहे. 

मी, माझं घर, माझा संसार या सर्वसाधारण मानसिकतेतून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवून अखंडपणे, असंख्य अडीअडचणींना तोंड देत या दोघी भगिनींनी चालविलेलं सेवाव्रत हे समाजासाठी एक दीपस्तंभच होय. अधिक माहितीसाठी पहा www.sjvidyalaya.org

  • देवेंद्र भुजबळ

  • No comments:

    Post a Comment