पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षकांसाठी शिक्षणक्रम
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने बदलणा-या आव्हानांचा पोलीस दलास नेटाने सामना करता यावा याकरिता, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारान्वये पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी बी. ए. (पोलीस प्रशासन) तर पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-यांसाठी एम.बी.ए (पब्लिक पॉलिसी अँड मॅनेजमेंट) हे शिक्षणक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरु करण्यात आले आहेत.
नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना या प्रक्रियेत पोलीस कर्मचारी कुठेही मागे राहू नये आणि दैनंदिन जीवनात सामोरे जाव्या लागणा-या सामाजिक, आर्थिक, औद्योगिकीकरण विषयांत त्यांचे ज्ञान वाढावे हा दृष्टीकोन समोर ठेवून अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. पोलीस शिपाई व सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा अनेकदा नोकरीमुळे शिक्षणात खंड पडतो. पुढील शिक्षण त्यांना पूर्ण करता यावे म्हणून प्रशिक्षण घेणा-या तसेच पदावर रूजू असलेल्या सेवकांसाठी मुक्त विद्यापीठात हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शिक्षणक्रमांना महाराष्ट्रातील पोलीस कर्मचा-यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावलेल्या कर्मचा-यांना यामुळे शिक्षणाची संधी तर उपलब्ध होणार आहेच, शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांची सांगड घालतानाच लोकाभिमुख सेवा देण्याकरिता उपयोगही होणार आहे. या अंतर्गत मानवी विनिमय, सामाजिक परिवर्तन व चळवळ, मानवी हक्क व मूलभूत संकल्पना, ग्राहक संरक्षण, भारतीय समाज, लोक प्रशासन आदी विषयांचा समावेश आहे. पोलिसांच्या कार्यनिपुणता आणि बुद्धिकौशल्यात वाढ करतानाच सकारात्मक बदल घडवून दल अधिकाधिक कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.
शिक्षणाची ही संधी कर्मचा-यांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी व त्यांना ज्ञानाची कवाडे मोकळी करून देण्याच्या उद्देशाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे पोलीस शिपाई ते अधिका-यांपर्यंत लोकाभिमुख पोलीस यंत्रणा निर्माण होऊन त्यांचा लोकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होईल. पोलीस कर्मचारी किमान पदवीधर होऊन दलाचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यास हे अभ्यासक्रम महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत.
शिक्षणक्रमाची वैशिष्ट्ये :
* कर्मचा-यांना सेवांतर्गत घ्यावे लागणारे प्रशिक्षण लक्षात घेऊन पाच अभ्यासक्रमांना श्रेयांतर्गत सूट मिळते.
* खास पोलीस कर्मचा-यांसाठी विकसित केलेला अभ्यासक्रम.
शिक्षणक्रम कोणासाठी :
* सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
* हवालदार
* पोलीस नायक
* पोलीस हवालदार
जिल्हा पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, बिनतारी संदेश अशा विविध विभागांत काम करणा-या कर्मचा-यांसाठी हा विशेष शिक्षणक्रम विकसित करण्यात आला असून या शिक्षणक्रमांसाठी विशेष सवलतही देण्यात आली आहे.
पात्रता : १२ वी उत्तीर्ण
प्रवेश शुल्क :
प्रथम वर्ष : रु. ३५०/- (नोंदणी ब श्रेयांकांतर)
द्वितीय वर्ष : रु. १,०५०/-
तृतीय वर्ष : रु. १,२५०/-
मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम सगळ्यांप्रमाणेच पोलिसांनाही खुले होतेच. पण, आता खास पोलिसांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊन मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्यात बारावी पास झालेल्या पोलीस कर्मचा-यांसाठी बी. ए. (पोलीस प्रशासन) आणि पदवीप्राप्त अधिका-यांसाठी एम. बी. ए. (पब्लिक पॉलिसी अँड मॅनेजमेंट) या शिक्षणक्रमांचा समावेश आहे. कॉन्स्टेबल अथवा पोलीस अधिकारी होताना सेवांतर्गत प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याबदल्यात या दोन्ही शिक्षणक्रमांमध्ये काही अभ्यासक्रमांमध्ये श्रेयांतर्गत सूट देण्यात येते.
टेलर-मेड अभ्यासक्रम :
पोलिसांच्या कामाबद्दल सर्व समाजाला मनातून खूप सहानुभूती आहे. त्यांचा कामाच्या वेळा अनिश्चित असतात, कधीही कामासाठी उपलब्ध राहावे लागते, सुट्या मिळत नाहीत हे सर्वानाच मान्य आहे. पण खास त्यांच्या वेळेच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कुणी काही पुढाकार घेतलेला दिसत नव्हता. खास पोलिसांच्या सोयीनुसार करता येईल असा टेलर-मेड कोर्स विकसित करून मुक्त विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.
अभ्यासक्रम :
बी. ए. पदवीच्या प्रथम, द्वितीय वर्षासाठी एक आणि तृतीय वर्षासाठी प्रत्येकी सहा विषय ठेवण्यात आले आहेत. मानवी विनिमय आणि समायोजन, सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी, विविधतेतील एकता, आपले हक्क आणि त्यांची परिपूर्ती, आपत्ती व्यवस्थापन, मानवी हक्क, ग्राहक संरक्षण हे विषय द्वितीय वर्षासाठी; तर मी आणि माझे वर्तन, सामाजिक वर्तन, भारतीय समाज, लोकप्रशासन, सॉफ्ट स्किल्स, आयसीटी स्किल्स हे विषय तृतीय वर्षासाठी ठेवण्यात आले आहेत.
राज्यभर अभ्यासकेंद्रे :
या अभ्यासक्रमांमुळे पोलिसांच्या दैनंदिन कामात व्यत्यय येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. प्रवेश, अभ्यास, परीक्षा या सर्व सुविधा पोलिसांना त्यांच्या मुख्यालयीच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय, पोलीस मुख्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक., राज्य राखीव दल, आणि बिनतारी प्रशिक्षण केंद्र, पुणे. अशा विविध ७१ ठिकाणी अभ्यासकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
समाजात झपाट्याने बदल होत आहे, अनेक नवनवीन 'स्पेशल फोर्स' तयार होत आहेत, गुन्हेगारीची पद्धतही 'हायटेक' होते आहे. म्हणूनच पोलीसांच्या रुढ पद्धतीतही त्या अनुषंगाने बदल करणं नितांत आवश्यक झालं आहे. हे अभ्यासक्रम त्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल ठरेल आणि पोलीसांच्या बुद्धी कौशल्यात आणि कार्यनिपुणतेत वाढ होऊन त्यांची समाजाशी असलेली वागणूक सकारात्मक होईल,यात शंका नाही.
प्रवेशासाठी संपर्क :
या शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु झाले असून बारावी पास झालेल्या पोलीस कर्मचा-यांसाठी बी. ए. (पोलीस प्रशासन) शिक्षणक्रमांसाठी अभ्यासकेंद्रांवर १५ सप्टेबर २०१२ पर्यंत प्रवेश घेता येतील. पोलीस आयुक्तालय अथवा मुख्यालयातील अभ्यासकेंद्रात अधिक माहिती मिळवू शकता. विद्यापीठात संपर्क साधायचा असल्यास mpa@ycmou.digitaluniversity.ac येथे मेलद्वारे संपर्क साधू शकता. तसेच ,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक येथे mpaycmou@yahoo.com मेलद्वारे संपर्क साधू शकता http//:ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरदेखील आपल्याला विद्यापीठाची तसेच विद्यापीठ राबवत असलेल्या विविध शिक्षणक्रमांची माहिती उपलब्ध होऊ शकेल.
थेट दुस-या वर्षात प्रवेश मिळावा म्हणून बी.ए. (पोलीस प्रशासन) करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती. त्याचा विचार करून विद्यापीठाने, इतर विद्यापीठातून बी.ए. / बी. कॉम/ बी.एस.सी प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या अथवा १२ वी नंतर डी.एड. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बी.ए. (पोलीस प्रशासन) या शिक्षणक्रमासाठी थेट दुस-या वर्षाला प्रवेश घेण्याची मुभा देण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना थेट दुस-या वर्षात प्रवेश घेताना शिक्षणक्रम शुल्क रू. १०५०/- ऐवजी रूपये १४००/- भरावे लागतील, असा निर्णय घेतला आहे.
संतोष साबळे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक
ssable917@ gmail.com
९४०३७७४६९४
No comments:
Post a Comment