एखाद्या गावात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यावर त्या गावातील शेतकऱ्यांची कशी प्रगती होते याचे अतिशय बोलके उदाहरण पहायला मिळते ते भंडारा जिल्हयातील सामेवाडा या गावात. भेंडी उत्पादनासाठी हे गाव जिल्हयातच नव्हे तर जिल्हयाबाहेर सुध्दा प्रसिध्द आहे. या गावातून रोज दिडशे क्विंटल भेंडी उपराजधानीच्या भाजी मंडईत पाठवली जाते. गावात 70 टक्के शेतकरी धान पिकानंतर भेंडीच्या उत्पादनाला प्राधान्य देतात हे विशेष.
भंडारा जिल्हयाच्या पूर्वेला असलेल्या लाखनी तहसिल ठिकाणापासून केवळ 8 किलोमीटर अंतरावर असणारं; जेमतेम दिडशे उंबरठयाच सामेवाडा गाव. गावाला भेट दिल्यावर गावाची सधनता नरजेत भरते ती तिथल्या हिरव्यागार शेतामुळे , पक्क्या घरामुळे आणि घरासमोर उभ्याा असणाऱ्या टेम्पो किंवा ट्रॅक्टरमुळे.
15 वर्षापूर्वी या गावाची परिस्थिती सुध्दा पावसावर आधारित शेती करणाऱ्या इतर गावांसारखीच होती. धान हे इथले मुख्य पीक. हे पीक येण्यासाठी साधारणत: पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. 15 वर्षापूर्वी डिसेंबर - जानेवारी मध्ये धानाचे पीक घरात आल्यावर ना शेतक-यांना काम रहायचे ना मजुरांना. शिवाय धानाला योग्य भावही मिळत नव्हता. वर्षातून एकच पीक घेता येत असल्यामुळे इथला शेतकरी कायम कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला तर डिसेंबर नंतर मजूर रोजगारासाठी स्थलांतर करायचे.
संपूर्ण गावाचीच परिस्थिती अतिशय हलाखीची. पण या गावाचे नशीब पालटायला कारणीभूत ठरले ते याच गावातील नरेश बाळणे हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे केवळ दीड एकर कोरडवाहू शेती होती. 3 भावांचा एकत्र कुटूंबाचा उदरनिर्वाह या अल्प शेतीवर चालायचा. त्यामुळे कायम आर्थिक चणचण आणि कर्जाचे जोखड मानगुटीवर असायचे. यातून मार्ग काढण्यासाठी नरेश बोळणे यांनी स्व:कष्टाने शेतात विहिर बांधली.
विहीरीला भरपूर पाणी लागले आणि नरेशरावांना आशेचा किरण दिसू लागला. एकदा नागपूरला ते शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले. त्या कार्यशाळेत त्यांना भेंडी लागवडीचे मार्गदर्शन मिळाले. याचा फायदा घेत त्यांनी उन्हाळयात शेतात भेंडी लावण्याचा प्रयोग करुन बघितला. शेताच्या अगदी थोडया भागात त्यांनी निर्मल
जातीची भेंडी लावली. विहिरीमुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध होतीच. त्यांनी लावलेल्या भेंडीच्या झाडांना चांगली निकोप भेंडी लागली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि दुस-या वर्षी धान पिकानंतर उन्हाळी पीक म्हणून त्यांनी भेंडीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली.
केवळ 60 दिवसांत भेंडी बाजारात विकायला तयार झाली. त्यावेळी केवळ 1 एकरात त्यांना 50 हजाराचे उत्पादन मिळाले. त्यामुळे गावातील इतर शेतक-यांनाही त्यांनी सिंचन विहिर खोदण्यासाठी व भेंडी लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांनाही त्याचे म्हणणे पटायला लागले. हळूहळू एक-एक करुन गावातील शेतक-यांनी शेतात शेततळे, जवाहर विहीर, सिंचन विहीरीच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था करुन घेतली. यासाठी त्यांना शासनाच्या योजनांची मदतही मिळाली. सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी भेंडी लागवडीकडे वळायला लागले आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीतही बदल व्हायला लागला. भेंडी लागवडीचे मार्गदर्शन करायला अर्थातच नरेश बोळणे होतेच. याशिवाय तत्कालीन तालुका कृषी अधिकारी बुरडे यांचेही कोणत्या जातीचे वाण , जैविक खते वापरायची याबद्दल मार्गदर्शन मिळाले.
आज या गावातील सुमारे 70 टक्के शेतकरी भेंडीचे उत्पादन घेतात. याच गावातील प्रगतीशील शेतकरी निळकंठ वंजारी सांगतात की,जानेवारी महिन्यात भेंडीची लागवड केली की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात भेंडी बाजारात विकण्यासाठी तयार असते. त्यानंतर 6 महिने भेंडीचे पीक येत राहते. एक एकरात एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये 30 हजार रुपये खर्च वजा जाऊन 90 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. त्यामुळे गावातील शेतकरी उन्हाळी पीक म्हणून भेंडीला प्राधान्य देताहेत.
आज आमच्या गावातून रोज दीडशे क्विंटल भेंडी नागपूरच्या भाजी मंडईत जाते. पूर्वी दलाल गावात येवून आमचा माल घेवून जायचा व तिसऱ्या दिवशी आम्हाला रोख पैसे आणून देत असे. पण आता आम्हाला "मार्केट " माहित झाल्यामुळे गावातील शेतकरीच सर्व माल एकत्रित करुन गावातील टेम्पोमध्ये भरतात व नागपूरच्या मंडईत पाठवतात. त्यामुळे मधली दलाली सुध्दा आम्हाला द्यावी लागत नाही. "
मागील 15 वर्षापासून या गावात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. भेंडी उत्पादनामुळे या गावाला सुबत्ता आली आहे. येथील शेतकऱ्यांच्या हाती पैसे खेळायला लागले आहेत. शिवाय उन्हाळयात गावातील शेतातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे मजुरांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबले आहे. एकंदरीत सिंचन सुविधा निर्माण झाल्याने आणि भेंडीच्या उत्पादनाने या गावात सधनता व समृद्धी आणली आहे एवढे मात्र निश्चित म्हणता येईल.
मनीषा सावळे, जि. मा. अ. भंडारा
No comments:
Post a Comment