आपल्या शिक्षणव्यवस्थेचे आपण पुढील स्तर मानतो : १) प्राथमिक २) माध्यमिक ३) उच्च माध्यमिक ४) महाविद्यालयीन ५) विद्यापीठीय या विविध स्तरांवरील मराठीच्या अभ्यासक्रमात समन्वय (coordination) असणं फार आवश्यक आहे. यातील प्रत्येक स्तराची वेगवेगळी मंडळं आहेत त्यांनी आपापले मराठी भाषेचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्या सर्वांत एक प्रकारची श्रेणीबद्धता असणं आवश्यक आहे. ती नसल्यानं परस्परांमध्ये कोणताच अनुबंध राहत नाही मग वरील स्तरावरील अध्यापक खालील स्तरांच्या मराठीच्या अध्यापकांना दोष देतात व त्याचा काहीच उपयोग होत नाही.
मराठी भाषेचा व वाङ्मयाचा अभ्यासक्रम व उद्दिष्ट निश्चित करताना या सर्व मंडळाच्या मराठी अभ्यास समित्यांना निन्मस्तरावरील अभ्यासक्रम व उद्दिष्ट लक्षात घेऊनच पुढील स्तरावरील अभ्यासक्रम निश्चित करणं आवश्यक आहे. असे न केल्यास दोन्ही अभ्यासक्रमात दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येक स्तरावरील उद्दिष्टांच्या बाबतीही हेच धोरण ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं त्या उभय अभ्यासक्रमात एकसूत्रता व श्रेणीबद्धता येईल. उणीव व पुनरावृत्ती राहणार नाही. मराठीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीनंही हे आवश्यक आहे. असं मला वाटतं.
या दृष्टीनं या सर्व स्तरांचं स्वरुप एखाद्या माळेसारखं असतं. तिचा प्रत्येक मणी देखणा असतो व त्या सर्व मण्यांनी मिळून तयार झालेली माळही सुंदर असते.
मराठी अभ्यास मंडळ
यासाठी विविध स्तरांवरील मराठी अभ्यास मंडळांनी फार काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. निवडून आलेल्या प्रतिनिधीनां या दायित्वाचं भान कस नसेल? ते अन्य तर अनुभवी असतातच पण त्याचबरोबर शिक्षकांना व प्राध्यापकांनाही या मंडळांना स्वानुभवानं काही सूचना अवश्य करता येतील. या सूचनांची प्रत संबंधित स्तराच्या कार्यालयातही पाठवाव्यात व आपल्या संघटानांच्या संमेलनांमध्ये व परिषदा मध्येही त्यावर चर्चा व्हाव्यात. दोष दाखविण्यापेक्षा अधिक सकारात्मक काय करता येईल, याचा विचार मराठी भाषा व साहित्य यांच्या अध्ययन अध्यापनासाठी गुणवत्ता, उपयुक्तता, व्यावहारिकता, उद्दिष्ट्यपूर्ती या सर्वच दृष्टीनं उपायकारक ठरेल. खरं तर ही मराठीच्या प्रत्येक अध्यापकाची जबाबदारी आहे. ती आपण होऊनच आपल्या विषयाच्या आवडीसाठी व सुरक्षेसाठी आपण स्वीकारायला हवी. त्यात मराठीच्या अध्यापकाला आपल्या अध्यापनामुळं अधिक समाधान असेल.
मराठीची सुरक्षा
वर `विषयाची सुरक्षा` हा शब्दप्रयोग मी हेतूत: केला आहे. भोवतालचं वातावरण जागतिकीकरणामुळं किती इंग्रजीमय होत चाललं आहे, हे आपण रोजच्या वृत्तपत्रांच्या शीर्षकावरुन देखील पाहात नाही का ? काही महत्त्वाच्या दैनिकांच्या स्तभांची शीर्षकंही इंग्रजीमय होत आहेत यात भाषा शुद्ध -अशुद्ध असण्याचा विचार मी करीत नसून मराठी भाषा सुरक्षित राहण्याचा विचार माझ्या मनात आहे. याचं कारण फार्सीच्या मराठीवरील प्रभावाचा अभ्यास व संशोधन करण्यात मी उभं आयुष्य वेचलं आहे. फार्सी दरबारी भाषा असल्यामुळं बहमनकाळात वाक्यात केवळ क्रियापद तेवढं मराठी व बाकी सारे शब्द अरबी-फार्सी अशी स्थिती निर्माण झाल्यचं एकनाथांनीच `अर्जदास्तां` सारख्या भारुडात दाखवून दिलं होत. नवीन संकल्पना येतात. त्यावेळी त्या दर्शविणारे शब्दही अन्य भाषांतून येतात, त्यामुळं आपली भाषा अधिक समृद्ध होत असते, या भाषावैज्ञानिक सिद्धान्ताचा स्वीकार करण्याची अनिर्णयता कुणालाही पटवून देण्याची आवश्यकता नाही. तथापि ज्या संकल्पना व तद्वाचक शब्द आपल्या भाषेतच असतील तर ते आपण वापरायला हवेत, हे शिवरायांनीच `राज्यव्यवहार कोशा` ची निर्मिती करायला सांगून प्रत्यक्ष कार्यवाहीच केली होतीच याचं स्मरण इथं व्हावं. आपल्या शासनानंही `शासनव्यवहारात मराठी` विविध परिभाषा कोशांची निर्मिती भाषा सल्लागार मंडळाच्या माध्यमातून करुन चांगले पायंडे पाडले आहेत. त्यांचा उपयोग व प्रभाव याविषयी मी वेगळं सांगायला नको. `पणन` `अभियंता`, `अभियांत्रिकी महाविद्यालय,` `प्रशाला` संचालनालय `निविदा` `अधिष्ठाता` `अध्यादेश` हे शब्द रुढ झालेच की नाही? असे शब्द आपण निग्रहांन वापरले तर आपली भाषा सुरक्षित राहील व नवीन संज्ञा अन्य भाषांतील उपयुक्त शब्दांनी आपली भाषा आपण समृद्धेसुद्धा करु. मग `कुरीयर` हा शब्द फ्रेंच किंवा `रिक्षा` हा जपानी शब्द म्हणून आपण त्याचा अव्हेर केला आहे का? तो आता आपलाच शब्द झाला.
आणखी एक नवी समस्या
आणखी एक नवी समस्या निर्माण झाली. ती आपलेच शब्द इंग्रजी वळणानं वापरण्याची पूर्वी असे `इंग्रजाळलेले` शब्द बदलून मूळ आपले शब्द अन्य देशांनीही घेतले आहेत. `सीलोन`चं `श्रीलंका`, `ब्रम्हदेशाचं` म्यानमार, `ऱ्होडेशिया`चं `झिम्बाब्बे` ही त्या त्या देशांची मूळ रुप देश विदेशातही रुढ झाली. आपणही `किर्की` ऐवजी `खडकी`, `मद्रास` ऐवजी चेन्नई, `बॉम्बे` ऐवजी `मुंबई` ही रुपं वापरू लागलो. पण आता `सूर्य` ऐवजी `सूर्या` (लॉज) `नारायण` (क्लासेस), `अशोक`, ऐवजी `अशोका` (हॉटेल), `राम` ऐवजी `रामा`(हॉटेल) ही नावं आपण का वापरायची ते मला कळतं नाही. रुढ झाली म्हणून ती (अपभ्रष्ट) रुपं आपण वापरायची का? असं म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतीक धोरणांच्या मसुद्यातील परिशिष्टात उपस्थित केलेला प्रश्न वाचून मला नवलं वाटलं. `तज्ज्ञ` शब्द रुढ झाला आहे म्हणून तो वापरावा का, असं म्हणून `च्यायला` ऐवजी `आरेच्या` ही शिवी वापरायची का अशीही सूचना केली आहे. मराठीच्या शिक्षकांनी यातून काय बोध घ्यावा? शिक्षक हस्तपुस्तिकेत आपण शिक्षकांना या संदर्भात नेमकेपणानं काय मार्गदर्शन करणार? विद्यार्थ्यांनी व समिती सदस्य शिक्षकांनी असे किती पर्याय लक्षात ठेवायचे?
ढासळती विद्यार्थ्यांची संख्या व गुणवत्ता
ढासळती विद्यार्थ्यांच्या व गुणवत्ता इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाची अपेक्षा करणं जागतिकीकरणामुळं अस्वाभाविक नव्हतं पण विषय व मातृभाषा म्हणून ती शाळा-महाविद्यालयं विद्यापीठं यात टिकणं आवश्यक आहे. मध्यप्रदेशात एकेकाळी जबलपूरात व इंदूरला माध्यमिक शाळांत तसंच महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. माध्यमिक अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव न केल्यानं आज तिथं मराठी विषय घेणाऱ्या महाविद्यालयीन /विद्यापीठातील विद्यार्थ्यांची वानवा आहे, हे मी अनुभवान्ती सांगत आहे. उस्मानिया विद्यापीठात मराठी विभागात एकेकाळी मराठी विषय घेणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती ती कमी कमी होत गेली, हे बृहन्महाराष्ट्रातलं चित्र तर महाराष्ट्रातलं काही विद्यापीठांच्या मराठी विभागात दहा-पंधरा विद्यार्थी मिळणंही दुष्कर झालं आहे, या विद्यापीठाना मी नामनिर्देशित करु इच्छितं नाही. नागपूरसारख्या विद्यापीठात २००९-१० या वर्षी मराठी विभागात केवळ एक प्राध्यापक व एक आधिव्याख्याता अशी स्थिती का निर्माण होते ? मुक्त विद्यापीठाच्या एम.फील. (मराठी) चीच नव्हे तर इतर विषयांचीही मान्यता रद्द होऊ लागली आहे. अन्य विद्यापीठांतील काही एम.फील. व पीएच.डी चे विषय हा चिंतेचा विषय होऊ शकेल. डॉ. व.वि. कुलकर्णी यांनी आता पीएच्.डी (मराठी) ची सूची (दूसरी आवृत्ती) प्रसिद्ध केल्यानं मराठी संशोधनावर नवा प्रकाश पडेल व कदाचित तो अंतर्मुखही करील, हे सर्व लिहितांना मनाला फार वेदना होतात. त्यामुळ मौलिक मराठी संशोधन करणाऱ्यांची उपेक्षा व्हायला नको.
अन्य विषय व मराठी
मराठीच्या अभ्यासक्रमाबरोबर जे अन्य विषय मराठीतून शिकविले जातात व ज्यांची पाठ्यपुस्तकं मराठीत आहेत, त्या समित्यातही मराठी भाषा तज्ज्ञ म्हणून किमान एका सदस्याचा अन्तर्भाव होणं आवश्यक आहे कारण त्या भाषिक त्रुटी या विषयांच्या पाठ्यपुस्तकांतही राहण्याची शक्यता आहे. याचा अनुभव मला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या मराठी भाषा समितीचा एक दीड दशक अध्यक्ष असताना तसंच या मंडळाच्या विद्रावस्थेचा सदस्य असताना आला आहे.प्रसारमाध्यमांमध्ये नियतकालिकातील मराठी प्रमाणेच दूरदर्शवरील मराठी भाषा हाही हळूहळू मराठी भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीनं चिंतेचा विषय व्हायला फारसा विलंब लागेलसे वाटत नाही. याचा प्रभाव व परिणाम लगोलग व तातडीनं होऊ लागला आहे व नवी पिढी तशा प्रकारची मराठी भाषा बोलू लागली आहे.
याउलट लोकसेवा आयोगानी प्रज्ञाशोध परीक्षांत मात्र मराठी माध्यमातून उत्तर लिहिणारी मुलं आघाडीवर असल्याचं सुखद चित्रही आपण पाहतो, तेव्हा निराशेचे मळभ दूर होऊ लागतं.
डी.एड, बी.एड, व एम्. फील्
मराठी भाषेविषयी बी.एड. व डी.एड. चे अभ्यासक्रम किती आस्था बाळगतात, हेही या आव्हानांपैकी एक आव्हान आहे. मराठीच्या एम.फील् च्या अभ्यासक्रमाचे १) संशोधन पद्धती व २) मराठी अध्यापन पद्धती असे दोन समान महत्त्वाचे भाग आहेत. मात्र दुसऱ्या भागाकडे फार दूर्लक्ष होत असल्याचं मला सातत्याने जाणवंत आहे. बी.एड. च्या मराठी विषय- ज्ञानाला फार कमी महत्त्व बहुधा ऐंशी गुणाइतकेच दिलं जात. या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जे अध्यापक/प्राध्यापक नियुक्त केले जातात. त्यासंबंधीशी काटेकोरपणा फार आवश्यक आहे. बी.एड् च्या काही विद्यापीठांच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आपल्या मराठीच्या अध्यापन प्रशिक्षणाचा दर्जा अधिक चांगल्या प्रकारे समाजावून सांगतील. बी. एड् /एम. एड् चे मराठी विषयासंबंधीचे संशोधन प्रकल्प या विषयाच्या अभ्यासक्रमाची /आध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीनं उपयोगी पडतात, हेही एकदा तपासून पहायला हवं
No comments:
Post a Comment