कोल्हापूर शहर व परिसराला पुर्वीपासूनच उद्योगाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच कोल्हापुरातील उद्योजक आपल्या कल्पकतेच्या जोरावर उद्योगात नेहमीच आघाडी घेत आहेत. उद्योजक, औद्योगिक संघटना आणि राज्य शासनाचा उद्योगासाठी अनुकुल असलेला दृष्टीकोन यामुळे गेल्या काही वर्षात कोल्हापूर उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी अतिशय महत्वाचे शहर ठरले आहे. कोल्हापूरच्या या औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास महामंडळामार्फत कोल्हापूर शहरानजिक औद्यागिक वसाहती विकसित केल्या आहेत. त्यातील सर्वात महत्वाची आहे कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र. या औद्योगिक क्षेत्रात येत्या पाच वर्षात सुमारे 5800 कोटी इतकी गुंतवणुक होणार असून सुमारे 25,000 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरापासून 12 कि.मी अंतरावर पूणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारपासून साडेतीन किलोमीटरवर असणारी ही औद्योगिक वसाहत आता उद्योजक आणि गुंतवणुकदारांसाठी अतिशय टॉप डेस्टीनेशन ठरले आहे . या वसाहतीसाठी कागल, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील सात गावांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. या वसाहतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 130 हेक्टर क्षेत्रात रस्ते, पाणी, पुरवठा दिवाबत्ती इत्यादी सामूहिक सुविधांची पूर्तता केली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यामधील विकास काम प्रगतीपथावर आहेत.
या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात रेमंड झांबायटी टेक्स्टाईल्स लिमीटेड, किलॉस्कर आईल इंजिन कंपनी, वर्धमान पॉलिटेक्स, ओसवाल एफ. एम. हॅमर्ले टेक्स्टाईल्स, कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादन संघ, अन्शुल स्टील, मेनन अल्कोप प्रायव्हेट लिमीटेड, विल्सन्स रुफींग प्रॉडक्टस, ऍ़पल स्पॉन्ज आयर्न प्रायव्हेट लिमीटेड, इंडो काउंट इंडस्ट्रिज, धैर्यशिल माने हाय-टेक को-ऑप टेक्स्टाईल पार्क, मेट्रो हाय-टेक को-ऑप टेक्स्टाईल पार्क , मारुती कॉटेक्स लिमीटेड, लाहोटी ओव्हरसीज, नागरीका एक्सपोर्ट, घाटगे-पाटल इंडस्ट्रिज, आर. एम. मोहिते टेक्स्टाईल मिल्स या कंपन्या आल्या आहेत. या कंपन्यांच्या येथील गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. कोल्हापुर आणि परिसरातील कुशल आणि अकुशल युवकांच्या हाताला काम मिळाले आहे.
No comments:
Post a Comment