Wednesday, August 8, 2012

वनांचे स्वामित्व

चंद्रपूर जिल्हा हा वनाच्छादित आहे. येथील विस्तिर्ण घनदाट जंगल जिल्हयाच्या वैभवात भर घालणारे आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तर देश विदेशातील पर्यटकांना भूरळच घालते. जंगलाचा राजा असलेल्या वाघाचे दर्शन व्हावे यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी येतात. या जंगलापासून स्थानिकांना बराच रोजगार मिळतो. परंतू अतिशय घनदाट असलेल्या जंगलात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जंगलाचे व्यवस्थापन करावे व वनोपजापासून आपला चरितार्थ भागवावा यासाठी वनविभागाने अतिशय उपयुक्त अशी योजना राबविली आहे. 

राष्ट्रीय वननितीनुसार जनतेचा सक्रिय सहभाग वनांच्या संरक्षण व संवर्धनात असल्या शिवाय वने सुरक्षित राहणे शक्य नाही ही बाब ओळखून आपल्या राज्यात ग्रामिणांच्या सहभागातून संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन झालेल्या आहेत.या समित्यांना कार्यक्षम करणे, बळकट करणे यासाठी वनहक्क दावा हस्तांतरण अशी ही योजना आहे. त्या अंतर्गत जिल्हयातील गोंडपिंपरी तालुक्यातील पाचगावला जिल्हयातील पहिला सामुहिक वनहक्क दावा नुकताच हस्तांतरण करण्यात आला.

गोंडपिंपरी तालुक्यातील छोटेसे गाव असलेले पाचगाव हे चंद्रपूर वनवृत्त, मध्य चांदा वनविभागात वसलेले आहे.२१४ लोकसंख्या असलेल्या या गावात ५४ कुटुंबे वास्तव्यास आहेत. आदिवासी बहुल असलेले हे गाव या जंगलाचे मालक झाले आहे. जंगलातील 33 वनौपजाची मालकी व व्यवस्थापन आता गावकरी करणार आहेत. बांबू, मोहफुले, तेंदूपत्ता, खिरणी, डिंक व गवत यावर गावाचा हक्क असणार आहे. वरवर पाहता हे सगळ अगदी किरकोळ वाटत असले तरी गावक-यांसाठी खूप मोठे अर्थार्जनाचे साधन ठरणार आहे. गडचिरोली जिल्हयातील लेखा मेंढा हे गाव राज्यातील पहिले वनहक्क प्राप्त करणारे गाव आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी वनहक्क प्राप्त होताच बांबूपासून निर्मित वस्तूंची विक्री करुन लाखो रुपयांची उलाढाल केली आहे. त्यासोबतच गावक-यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यात येथील वनौपज अतिशय उपयुक्त ठरले आहे. 

पाचगाव वासियांच्या जीवनातही सामुहिक वनहक्क हस्तांतरणाची घटना आर्थिक परिवर्तन करणारी ठरणार आहे. हे वनहक्क येथील ग्राम पंचायतला हस्तांतरित करण्यात आल्याने गावाचा विकासही यात अंर्तभूत आहेच. आम्हीच वनाचे मालक ही संकल्पना यामागे आहे. कारण पारंपारिक आदिवासी समाज वनापासून मिळणा-या उपजाच्या भरवशावरच आपली उपजिविका चालवित असतो. या पूर्वी त्यांचा यावर हक्क नव्हता आता मात्र कायदेशीर हक्क त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यासोबत गौण खनिज सुध्दा गावक-यांचे मालकीचे झाले आहे. मात्र या बदल्यात गावक-यांना वनाचे संरक्षण करावे लागणार आहे. वनाचे संरक्षण, वन्यप्राण्यांचे संरक्षण व वनाचे व्यवस्थापन केले तर त्यांना वनौपज व गौण खनिज मोठया प्रमाणात प्राप्त होणार आहे.

वनौपज व गौण खनिज याचा उपयोग कसा करायचा यासाठी वनविभाग येथील नागरिकांना व युवकांना प्रशिक्षणही देणार आहे. यात बांबूपासून विविध वस्तू तयार करणे, डिंक, फळे, मोहफुल, आदिवर प्रक्रिया करणे व ते बाजारात विक्रीयोग्य बनविणे व त्याचे मार्केटिंग करणे आदिचा समावेश आहे. या वनहक्क हस्तांतरण घटनेने गावकरी खूप आनंदी आहेत. यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला आहे. अथक परिश्रमानंतर प्राप्त झालेल्या स्वामित्वानंतर आमच्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच परिवर्तन होईल असा गावक-यांना विश्वास आहे. शिवाय आमच्या वनाचे आम्हीच रक्षण करणार असा निर्धारही त्यांना बोलून दाखविला. वनहक्क मिळण्याची घटना जरी लहान वाटत असली तरी खूप मोठे परिवर्तन यात असल्याचे नागरिकांच्या उत्साहावरुन स्पष्ट दिसत होते.

रवि गिते, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

No comments:

Post a Comment