शेतक-यांनी माती परीक्षणाच्या माध्यमातुन शाश्वत व किफायतशीर शेतजमीनीच्या आरोग्य संवर्धनास प्राधान्य देऊन शेती विकासातील मुलाधार जोपासण्याकडे लक्ष केंद्रीत केल्यास शेतीमालाच्या उत्पादनात निश्चितच प्रगती करता येऊ शकते. शेती उत्पादनात माती हा एक महत्वपूर्ण नैसर्गिक घटक आहे. मातीतील नैसर्गिक घटकानुसार जमिनीची सुपीकता पीकांच्या वाढीस आणि चांगल्या उत्पादकतेसाठी उपयुक्त ठरते. यासाठी जमिनीच्या आरोग्य संवर्धनात माती व पाणी परीक्षणाला अत्यंत महत्व असल्याने याकडे शेतकऱ्याने जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातंर्गत राज्यातील 29 जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोग शाळा कार्यान्वित आहे. त्यातील एक औरंगाबाद येथे 1 जूलै 1998 पासून कार्यान्वित असल्याने शेतकऱ्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घेऊन शेती उत्पादनातील प्रगतीत आपले योगदान दिले पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या कार्यक्रमाची 2010-11 पासुन अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार सन 2010-11 ते 2014-15 या पाच वर्षाच्या कालावधीत गावातील वहीतीखालील क्षेत्राच्या दहा टक्के या प्रमाणात प्रातिनिधीक माती नमुने तपासून सुपीकता निर्देशांक तयार करणे हा महत्वाकांक्षी कार्यक्रम शेतक-यांसाठी राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार दरवर्षी 20 टक्के गावांची निवड करण्यात येऊन मृदातील मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करणे, गाववार सुपीकता निर्देशांक ठरविणे व शेतकऱ्यांना खताच्या शिफारशी करणे, नमुने तपासणी केलेल्या सर्व शेतक-यांना जमीनीची आरोग्य पत्रिका देण्यासाठी 2010-11 पासून सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमातंर्गत कृषी विभागातर्फे जिह्यातील 345 गावांतील सुमारे 11 हजार मृद नमुने तपासून सुपीकता निर्देशांक फलक तयार करण्यात येऊन 150 गावांत हे फलक लावण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील माती परीक्षण प्रयोग शाळेने गेल्या पाच वर्षात मातीचे सर्वसाधारण 16,384 तर विशेष 8,405 आणि सूक्ष्म मुलद्रव्ये 4,352 व पाण्याचे 7,823 नमुन्याची शेतक-यांना नाममात्र दरात तपासणी करुन देण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेच्या मुख्य उद्दिष्ठांमध्ये शेतक-यांचे मृद नमुने तपासुन त्या आधारे जमीनीची सुपीकता ठरविणे, विस्तार कार्यक्रमातंर्गत गाववार सुपिकता निर्देशांक ठरविणे, मृद सर्व्हेक्षणाचे काम आणि समतोल खत वापराच्या शिफारशी जमीनीच्या आरोग्य पत्रिकेव्दारे करणे यांचा समावेश होतो. या प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. भौतिक गुणधार्मात जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात पीएच (सामु), क्षारता, संद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालांश, युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना-तांबे-लोह-मंगल, जस्त यांचे प्रमाण तपासले जातात. औरंगाबाद जिल्हयातील जमीनीमध्ये प्रामुख्याने जस्त, लोह या सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता आढळून येते.
माती परीक्षणात प्रयोगशाळेत तपासण्यात येणा-या गुणधार्मात रासायनिक गुणधर्मात जमिनीचा कर्ब, सामु व साक्षरता, प्रमुख अन्नद्रव्यात केंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरंद व पालांश, दुय्यम अन्नद्रव्यात युक्त कॅल्शियम व मॅग्नेशिम, हानिकारक घटकात युक्त सोडियम व चुना, सुक्ष्म मुलद्रव्ये, उपलब्ध तांबे, जस्त, लोह, मंगल आणि भौतिक गुणधर्मात जमिनीचा पोत, जलधारणा शक्ती, ओलाव्याचे प्रमाण, आभासी घनता, कण घनता, सच्छिंद्रता, यांचा समावेश असतो तर पाणी तपासणीत सामु, खारता, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशिम, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट आदीचा समावेश असतो.
मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी (सेंद्रीय किंवा रासायनिक खते देण्यापूर्वी) व खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावी, मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पीकातील फरक, बागायत/जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे वेगवेगळे चार भाग पाडुन माती नमुना गोळा करावा. या व्यतिरिक्त गुरे बसण्याची व झाडाखालीची जागा, खते व कचरा टाकण्याची जागा, दलदल व घराजवळची जागा, पाण्याच्या पाटखालील जागा, बांधाजवळचे व झाडाझुडपाचे क्षेत्र येथील मातीचा नमुना माती परीक्षणासाठी घेण्यात येऊ नयेत. माती परीक्षण दर सर्वसाधारण मृद नमुन्यासाठी रु.15/-,विशेष मृद नमुन्यासाठी रु.250/-,सुक्ष्मद्रव्य नमुन्यासाठी रुपये 200/-आणि सिंचनाकरीता पाणी नमुन्यासाठी रु.100/- याप्रमाणे कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोग शाळेत आकारण्यात येतात. अधिक माहिती साठी संपर्क दुरध्वनी क्रमांक 0240-2331104 व ई-मेल soilabad@gmail.com
( माहिती केंद्र, औरंगाबाद)
No comments:
Post a Comment