धुळे तालुक्यातील 15 कि. मी. अंतरावर वसलेले नावरा हे छोटेसे गाव. गावात साधारण तीन हजाराची संमिश्र वस्ती गुण्या गोविंदाने राहत आहेत. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी. गावांत चौथी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था. पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना जवळच्या नवलनगर या गावी जावे लागते.
सगळीकडे महिला बचत गटाचा बोलबाला असल्यामुळे व बचत गटांमुळे काही कुटुंब सन्मानाने जगत असल्याचे गावातील महिलांना एकमेकींच्या बोलण्यातून कळले. आपणही गावात बचत गटांची स्थापना करावी. बचत गटाची स्थापना अगोदर गावातील महिलांना बचत गट स्थापना करण्याबाबत व बँकेत खाते उघडण्याबाबत मार्गदर्शन व्हावे, यासाठी महिलांना माविमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. दारिद्रय रेषेखालील 11 महिलांनी एकत्र येऊन भीमगर्जना नावाच्या महिला बचत गटाची स्थापना केली.
भीमगर्जना बचत गटाच्या महिला सभासदांनी अंतर्गत कर्ज व्यवहारातून आपल्या गरजा भागविल्या. बचतगटात अंतर्गत कर्ज व्यवहार व परतफेड नियमित असल्यामुळे सभासदांनी नवलनगर येथील स्टेट बँकेकडे प्रथम कर्जाची मागणी केली. गटातील सदस्य दारिद्रय रेषेखालील असल्यामुळे बचतगटाला स्वर्णजयंती स्वयंरोजगार अंतर्गत 2 लाख 75 हजाराचे स्टेट बँक, नवलनगरने मंजूर केल्यामुळे बचतगटातील महिलांना हुरूप आला.
या कर्जाच्या पैशातून महिलांनी पाच दुभत्या म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु केला. पुढे हाच व्यवसाय वाढविण्याचा बचत गटातील महिलांचा मानस असून पाच म्हशीचे एकूण 20 ते 25 लिटर दूध मिळते. दूध विक्रीतून महिलांना 6 ते 7 रुपये नफा मिळतो. यातून बँकेचे कर्जाची नियमित फेड केली जाते. दुग्ध व्यवसायाच्या जोडीला पशुखाद्य ढेप विक्री व्यवसाय भविष्यात सुरु करण्याचा महिलांचा विचार आहे. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो व आम्हाला व्यवसाय करण्याचे धाडस आले. आता आम्ही सामुहिकरित्या व्यवसाय स्वावलंबी होणार असे भीमगर्जना बचत गटाच्या सभासद अभिमानाने सांगतात.
जि. मा. का. धुळे
No comments:
Post a Comment