Thursday, August 9, 2012

राजीव गांधी किशोरी सबलीकरण योजना

मुली व मुलांची संख्या समान असावी असा एक आदर्श दंडक आहे. आपल्या समाज व्यवस्थेमुळे हा आदर्श दंडक पाळला जात नाही. इतकेच नव्हे तर मुलींना शिक्षण, आरोग्य व परिपोषण या गरजांची पुर्तताही नीट होत नाही. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. स्त्रियांना मिळणारी असमान वागणूक, बाल विवाह, कमी वयात लादलेले बाळंतपण व त्याचा परिणाम म्हणून अल्पवयीन मातेच्या व होणाऱ्या बाळाच्या जीवास तसेच कुपोषण, बालमृत्यूचे धोके उद्भवतात. याचा परिणाम संपूर्ण समाज आणि देशाच्या सक्षम मनुष्यबळावरही होतो देशाच्या विकासावर होतो. यासाठीच राजीव गांधी किशोरी सबलीकरण योजना सुरु करण्यात आली आहे.

किशोरवयीन अवस्था ही निरोगी जीवनाकडे नेणारी वाट आहे. याकाळात पूर्वी निर्माण झालेल्या कुपोषण समस्या दूर करणे शक्य असते. व याच कालावधीत आरोग्यदायी आहार व जीवन पध्दती घडविता येते. कुपोषणामुळे होणारे रोग व पुढील पिढीची होणारी उपासमार यांना पायबंद बसू शकतो.

लोहयुक्त पदार्थांच्या अभावामुळे होणारा रक्त क्षयाचा आजार महिला व मुलींमध्ये मोठया प्रमाणावर आहे. यामुळे युवा अवस्थेतील मुलींची शिक्षणाची व काम करण्याची क्षमता कमी कमी होत जाते व त्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊन आर्थिक व सामाजिक विकासाला खीळ बसते. गर्भावस्थेच्या काळात होणाऱ्या रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रसूतीकाळात व प्रसूतीनंतर मातेच्या जीवाला धोका संभवतो व बाळ अत्यंत अशक्त निपजते. यासाठी किशोवयीन मुलींच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे ठरते. किशोरवयीन मुलगी एक सुदृढ व प्रजननक्षम अशी महिला बनावी व परंपरागत कुपोषणाच्या चक्रातून तिची सुटका व्हावी यासाठी राजीव गांधी किशोरी सबलीकरण योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात सुरु असलेली किशोरी शक्ती योजना व किशोरवयीन मुलींना पोषण आहार या दोन योजनां एकत्र समावेश करुन किशोरींच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राजीव गांधी किशोरी सबलीकरण योजना सुरु झाली. ही योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राद्वारे राबविण्यात येते.

उद्दिष्टे.

• किशोरींना स्वत:चा विकास व सबलीकरणासाठी समर्थ बनविणे.
• त्यांच्या आरोग्य व आहार स्थितीत सुधारणा करणे.
• आरोग्य , स्वच्छता, आहार, प्रजनन क्षमता कुटुंब/ बालकांची काळजी याबाबत जागृत करणे.
• घरगुती व्यवसाय व जीवनमानाची कौशल्य देवून उच्च व्यवसायिक कौशल्य येण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाशी सांगड घालणे.
• किशोरींना औपचारिक अनौपचारिक शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणणे.
• त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट, बँक, पोलिस स्टेशन इ. सेवांची माहिती व मार्गदर्शन करणे.

लाभार्थी कोण आहेत.

ही योजना राज्यातील ११ जिल्हयातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ११ ते १८ वयोगटातील किशोरींना लाभ दिला जातो. लाभार्थ्यांचे दोन गटात विभाजन, उदा. ११ ते १५ व १५ ते १८ वयोगटानुसार विभागनी केली जाते. या योजनेत शाळा बाह्य किशोरींवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे.
या योजनेत किशोरवयीन मुलींना दिल्या जाणाऱ्या सेवा पुढील प्रमाणे.
• पोषण आहार
• लोह व फॉलिक सिड गोळया
• नियमित आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा.
• पोषण व आरोग्य विषयक शिक्षण दिले जाते. त्याच बरोबर कुटुंब कल्याण, प्रजनन विषयक शिक्षण , बाल संगोपन गृह व्यवस्थापन याबाबत सल्ला/ मार्गदर्शन केले जाते.
• जीवन मुलांचे शिक्षण व सावर्जनिक सेवाविषयक माहिती बरोबरच राष्ट्रीय कौशल्य दिले जाते. १६ वर्ष व त्यावरील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते.
ही योजना राज्यात बीड, नांदेड, मुंबई, नाशिक, गडचिरोली, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या जिल्हयात राबविली जात आहे.

या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यंत्रणेमार्फत होते .


श्री.आकाश जगधने स.सं.वि.सं.क.मंत्रालय

No comments:

Post a Comment