Saturday, August 4, 2012

महात्मा फुले कृषि विद्यापीठ

महाराष्ट्र राज्यात 1968 साली महाराष्ट्र कृषि विद्यापीठ या नावाने कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1969 साली थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या नावाने  हे कृषि विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी या नावाने उदयास आले. पश्चिम महाराष्ट्रातील 10 जिल्हयाचे कार्यक्षेत्र असलेल्या या कृषि विद्यापीठामध्ये कृषि शिक्षण,  संशोधन आणि विस्तार शिक्षण ही तीन प्रमुख उद्दिष्टे  समोर ठेवून  विद्यापीठाचे कामकाज चालते. या तीन क्षेत्रातील  कार्याची विशेष नोंद घेवून  या विद्यापीठास केंद्र शासनाने आपल्या 11 व्या  पंचवार्षिक  योजनेत 100 कोटी रुपयाचे विशेष अनुदान देवून सन 2008 मध्ये देशातील  सर्वोकृष्ट  विद्यापीठ असा यथार्थ गौरव केला आहे.

 " कृषि शिक्षण - नवी दिशा  "  

मानवाच्या सर्वांगिण  विकासात ज्याप्रमाणे शिक्षणाला अनन्यसाधारण  महत्व आहे. त्याचप्रमाणे कृषि विकास साधावयाचा असेल तर कृषि साक्षरता खूपच महत्वाची आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्याना कृषि व संलग्न महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. या विद्यापीठांतर्गत  आजमितीला एकूण 46  (शासकीय6, विनाअनुदानीत खाजगी  40 ) महाविद्यालये आहेत. त्यांचप्रमाणे  94 ( शासकीय 8 , विनाअनुदानीत खाजगी  85 ) कृषि तंत्र विद्यालयातून ग्रामीण भागासाठी निम्नस्तर कृषि शिक्षण विकासात महत्वाचे योगदान देत आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये  कृषि  उद्यानविद्या , कृषि  अभियांत्रिकी , अन्न तंत्रज्ञान, कृषि जैव तंत्रज्ञान आणि कृषि व्यवसाय व्यवस्थापन  या शाखांचा पदवी अभ्यासक्रम तसेच एम. एस्सी  (कृषि उद्यानविद्या , कृषि जैवतंत्रज्ञान ) एम. बी.ए  (कृषि) आणि एम टेक  (कृषि अभियांत्रिकी ) हे दोन वर्षाचे पदव्यूत्तर  अभयासक्रम व तीन वर्षाचा आचार्य पदवी अभयासक्रम राबविले जातात. या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.तुकाराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  नव्यानेच कृषि अभियांत्रिकी विषयात आचार्य  अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे ई गव्हर्नन्स  सुविधा निर्माण करण्यासाठी  निधी प्राप्त  झालेला असून त्या माध्यमातून  शेतकरी -शास्त्रज्ञ , शास्त्रज्ञ -विद्यार्थी , शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ  संवाद वाढीवर भर देण्यात येत आहे.

 " कृषि संशोधन  " 

कृषि संशोधनामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे योगदान मोलाचे असून विद्यापीठाने गेल्या   43 वर्षामध्ये अन्नधान्य , फळेफुले चारापिके यांचे 200 हून अधिक वाण विकसित केले असून मृद व जलसंधारण विविध पिके आणि पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन , आंतरमशागत , तण रोग आणि किडीचे एकात्मिक नियंत्रण , सुधारीत औजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रिया  आणि विपणन , दुग्धशास्त्र याविषयी  सखोल संशोधन करुन एक हजार हून अधिक महत्वपूर्ण शिफारशी दिल्या आहेत.


गतवर्षी विद्यापीठाने सर्वाधिक  सहा वाण शेतक-यांसाठी प्रसारीत केले. याशिवाय  विद्यापीठाने संशोधन केलेली दोन कृषि यंत्रे  आणि 55 पीक उत्पादन  तंत्रज्ञान  विषयक शिफारशी प्रसारीत  केल्या आहेत. विद्यापीठाच्या नवीन वाणांमध्ये  गहू पिकाचा जिरायत क्षेत्रात अधिक उत्पादनक्षम नेत्रावती हा वाण प्रसारित केला तसेच नागलीः फुले नाचणी -1 भुईमुगः आरएचजी 6021, कपाशी - फुले अनमोल, वांगी - फुले अर्जून विशेषतः वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त असणारा कपाशी फुले धन्वंतरी  हा वाण प्रसारित करुन संशोधनात सर्वोच्च स्थान प्राप्त  केले आहे.

  ट्रॅक्टर चलित  कांदा रोपे लागवड यंत्र व ज्योती लसून घास कापणी यंत्र विकसित करुन शेतीमध्ये यांत्रिकी करणाचा वापर करण्यासाठी  विद्यापीठ प्रयत्नशील  आहे.आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर होत असलेल्या  कृषि संशोधनाचा आढावा घेण्यासाठी विविध उपक्रम औषधी व सुगंधी वनस्पती  लागवड व व्यवस्थापन कार्यशाळा , राष्ट्रीय  बियाणे परिषद ,कृषि संशोधन परिषद ,गोडया पाण्यातील मत्स्यशेती  सुधारण कार्यशाळा इत्यादी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

संशोधनासाठी विविध प्रकल्प  मंजूर करण्यात आले आहेत.  यामध्ये प्रामुख्याने  राष्ट्रीय संवेदनक्षम  कृषि हवामान बदल आधारित प्रकल्प. सोलापूर  (रुपये 30.25 लक्ष ) टॉमेटो तूर व भुईमुग पिकावर येणा-या किडीचे व रोगाचे संरक्षण प्रकल्प  (रुपये 15 लक्ष ) पीक पध्दती  व सुक्ष्म सिंचन कार्यक्षमता प्रकल्प (रुपये 21.25 लक्ष ) चारापीके गुणवत्तापूर्ण  बीजोत्पादन व प्रात्यक्षिके  (रुपये 22.23 लक्ष),  गोड ज्वारी पासून इथॅनाल उत्पादन अभ्यास (रुपये 39.23 लक्ष), कृषि औजारे चाचणी  (रु. 15.50 लक्ष ) काटेकोर शेती विकास केंद्र (रुपये 48.80 लक्ष ) तसेच राष्ट्रीय कृषि  विकास योजनेअंतर्गत सुधारित  वाणांचे बीजोत्पादन (रुपये 8.61 कोटी ) जैविक किडनाशके निर्मिती (रुपये 2 कोटी) जैविक खते निर्मिती (रुपये 1 कोटी) व कृषि औजारे व चाचणी  प्रशिक्षण केंद्र इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे.

विद्यापीठांतर्गत प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, मका, भात, भुईमुग, सुर्यफुल विविध  कडधान्य  पिके,  कांदा टोमॅटो, मिरची इत्यादी पिकांचे बीजोत्पादन केले जाते. गतवर्षात विविध पिकांचे एकूण 4500 क्विटंलहून अधिक मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे 2213 क्विंटल, सत्यप्रत बियाणे 6085 क्विटंल  बियाणे निर्मिती करुन त्याचा प्रसार केला. चारापिकांचे 8.30 लाख ठोंब  7.26 लाख रोपे, कलमे इत्यादी 58.42  क्विटंल जैविक किडनाशके व 56.96 मे.टन जैविक खते आदीची निर्मिती करण्यात आली. विद्यापीठातील संशोधनास गती देण्यासाठी अनेक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विद्यापीठात आगामी काळात अनेक नवनवीन संशोधन प्रकल्प कुलगुरु डॉ.तुकाराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात येणार आहेत.


 " लोकाभिमूख विस्तार शिक्षण  " 


कृषि विद्यापीठामध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान शेतक-यापर्यन्त परिणामकारकरित्या पोहचविण्यासाठी  विस्तार शिक्षण संचालनालय प्रयतनशील आहे. गतवर्षात विद्यापीठांतर्गत शेतकरी , अधिकारी , महिला शेतकरी आदिंसाठी विविध प्रशिक्षण वर्ग , शेतकरी मेळावे, आद्यरेखा प्रात्यक्षिके , परिणाम प्रात्यक्षिके  इत्यादी विस्तार शिक्षण उपक्रमांचे आयेाजन करण्यात आले.


महात्मा फुले कृषि विद्यापीठाने  10 जिल्हयात 41 शेतकरी शास्त्रज्ञ  मंचाची स्थापना केली आहे. यामध्ये एकूण 1550 शेतक-यांना सदस्यत्व देण्यात आलेले आहे. विद्यापीठाने विकसित केलेले नवीन वाण, शिफारशी व कृषि तंत्रज्ञान हे शेतक-यांपर्यन्त पोहचविण्याचे  कार्य  या मंचामार्फत  चालते. गतवर्षी  शेतकरी शास्त्रज्ञ  मंच सदस्यांना विविध  पुरस्कारांनी गौरविण्यात आले हे निश्चितच अभिनंदनीय आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात गतीमान विस्तार  कार्यासाठी चार विभागीय विस्तार केंद्रे व चार जिल्हा विस्तार केंद्रे सुरु आहेत. तसेच आगामी  काळात इगतपुरी येथे जिल्हा विस्तार  केंद्र  सुरु करण्यात येणार आहे.  या केंद्राच्या माध्यमातून फिरते पीक चिकित्सालय  सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख  करण्यात येणार आहे.  शेतक-याला  एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी यासाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र विद्यापीठस्तरावर कार्यरत आहे. याच धर्तीवर विद्यापीठांतर्गत सर्व जिल्हयांमध्ये  कृषि  तंत्रज्ञान  माहिती केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

विद्यापीठातील प्रसारण केंद्रामार्फत कृषिदर्शनी, श्रीसुगी नियतकालिका, मफुकृवि वार्ता ( मराठी, इंग्रजी ) तसेच विविध पुस्तिका , पोस्टर्सची निर्मिती  करुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विस्तार  संचालनालयांतर्गत  राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या  माध्यमातून एकात्मिक पीक तंत्रज्ञान  प्रसार प्रकल्प  (रुपये 7.31 कोटी ) राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतक-यांच्या  शेतावर पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन  प्रशिक्षण  कार्यक्रम इत्यादी  माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करण्यात येणार आहे. विस्तार  संचालनालयांतर्गत  गतवर्षी मागे वळून पाहताना विभागीय कृषि संशोधन  व विस्तार सल्लागार समिती बैठक , विस्तार शिक्षण परिषद, कृषि अधिका-यांसाठी हंगामपूर्व  प्रशिक्षण वर्ग, कृषि विज्ञान केंद्रातील अधिका-यांसाठी  प्रशिक्षण  कृती  कार्यशाळा, भारत सरकार प्रायोजित मॉडेल टेंनिंग इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

गतवर्षी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प व संशोधन यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये ज्वारी संशोधन संचालनालय, हैद्राबाद यांनी अखिल भारतीय  ज्वारी सुधार प्रकल्पाचा " सर्वोत्कृष्ट केंद्र " म्हणून गौरव केला. तसेच आय. सी .ए .इ. आर,  नवी दिल्ली  यांनी अखिल भारतीय करडई सुधार प्रकल्पास राष्ट्रीयस्तरावरील सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार प्रदान केला. पुणे येथील कृषि व्यवस्थापन  शास्त्र  महाविद्यालयास आयएसओ 9001 मानांकन प्राप्त झाले. बियाणे संशोधन विभागास सर्वोत्कृष्ट  केंद्राचा पुरस्कार प्राप्त झाला. कृषि रसायन व मृद शास्त्र  विभागास आय.पी.आय.एफ.ए.आय. 2011 पूरस्काराने गौरविण्यात आले. अशा कृषि विद्यापीठाने कृषि क्षेत्रात नेत्रदिपक प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

               
दिलीप गवळी   माहिती अधिकारी,अहमदनगर

No comments:

Post a Comment