लेखनाच्या क्षेत्रात स्त्री आणि पुरुष असा भेद करणं कुणाकुणाला आवडत नाही. कलाकृती किंवा साहित्यकृती ही कर्त्याच्या स्त्री किंवा पुरुषपणावर जोखली जाऊ नये, अशी त्यांची भूमिका असते. पण श्रेष्ठ-कनिष्ठत्व किंवा संकुचितपण हीच दृष्टी इथं अभिप्रेत नसते, तर स्त्रीच्या लिखाणात प्रगटणाऱ्या जाणीवांचा दर्शन निराळ्याच प्रेरणांतून होत असतं का, याचा शोध यातून घ्यायचा असतो. या नजरेनं पाहिलं तर मात्र स्त्रीलेखनाचा वेगळा विचार हा आवश्यकच नाही तर अपरिहार्य बनतो. ‘द स्ट्रीम विदिन’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचताना स्त्रीच्या अंतःप्रवाहाचं जे उत्कट दर्शन घडतं ते थक्क करून सोडणारं आहे. मीना वैशंपायन यांनी पुस्तकाचा अनुवाद केला असून, मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी ते प्रकाशित केलं आहे.
या कथासंग्रहात गेल्या अर्धशतकात लिहिल्या गेलेल्या बंगाली कथांचा समावेश आहे. यात काही बांगलादेशी लेखिकांच्या कथाही समाविष्ट आहेत. मूळ बंगाली पुस्तकाचं शीर्षक आहे ‘अंतःसलिला’, म्हणजेच अंतःकरणात ओलावा असणाऱ्या स्त्रिया. आशापूर्णादेवी, महाश्वेतादेवी, नवनीता देवेन अशा नामवंत लेखिकांपासून नसरीन जहाँसारख्या तरुण बांगलादेशी लेखिकेपर्यंत एकूण तेरा लेखिकांच्या कथा यात आहेत.
बंगाल असो की महाराष्ट किंवा कर्नाटक – भारतीय स्त्रीचं भावविश्व आणि मानसिकता बरीचशी मिळतीजुळती आहे. म्हणूनच आपल्या वंगभगिनींच्या मनात डोकावताना आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंबही कुठे कुठे दिसतं. या कथांमधून उघड होणाऱ्या अंतःप्रवाहांची झुळझुळ वाहणारी धारा तशी प्रत्येकच भारतीय स्त्रीला ओळखीची असलेली. आशापूर्णादेवींची ‘पदातिक’ कथा नोकरी करणाऱ्या जयंतीला आईच्या आजारपणात एक नवी दृष्टी देऊन जाते आणि युनियनमध्ये पददलितांसाठी भांडणाऱ्या आपण, घरात आईच्या कष्टांची पर्वा न करता तिची उपेक्षा करत होतो, ही जाणीव तिला होते. महाश्वेतादेवींच्या ‘सॉल्ट’ या कथेतून आदिवासी मिठासाठी करत असलेली धडपड दिसते. खडकांवरचं मीठ चाटायला येणाऱ्या हत्तींच्या मागावर राहणाऱ्या आदिवासींचं धोकादायक आणि अळणी आयुष्य यात आहे. तर सावित्री रॉय यांच्या ‘अंतःसलिला’ कथेत संसारात तारेवरची कसरत करून स्वतःच्या जाणीवांचा प्रवाह जागा ठेवण्यासाठी लेखन करणारी शकुंतला भेटते. स्त्रीचं लेखिका असणं या कथेत प्रभावीपणे चित्रित झालं आहे.
मुस्लिम स्त्रीच्या प्रश्नांचा वेध घेणाऱ्या कथाही यात आहेत. यापैकी ‘परपुरुष’ कथा तोंडी तलाकाभोवती गुंफलेली आहे. तर जहाँ आरा इमामची ‘अस्र’ कथा बांगलादेश युद्धाच्या वेळी स्त्रीजीवनावर झालेल्या पुरुषसत्तेच्या आणि धर्मसत्तेच्या आक्रमणावर आधारित आहे. पूरबी बसूच्या ‘अरांधन’ (बुट्टी) या कथेत एक दिवस स्वयंपाक करण्याच्या आपल्या कामाला दांडी मारणारी राधा भेटते. महाश्वेतादेवींच्या कथेचा अपवाद सोडता, यातील सर्वच कथांचा केंद्रबिंदू स्त्रीचं जीवन व अनुभव हाच आहे. स्त्रीचं वात्सल्य, निर्मितिक्षमता, हळुवार स्वभाव, स्त्रीपणामुळे येणारे प्रश्न, समर्पण भावना अशा विविध स्त्री-वैशिष्ठ्यांच चित्रण करणाऱ्या कथा एकत्रितपणे वाचताना मिळणारा आनंद बंगाली संस्कृतीशीही जवळीक घडवून आणतो. स्त्रीच्या मनात डोकावताना स्त्रीवाचकांना स्वतःशीच संवाद साधल्याचा अनुभवही येऊ शकेल.
नंदिनी आत्मसिध्द
No comments:
Post a Comment