Saturday, August 4, 2012

महत्व ग्रामसभांचे

आपण देशात लोकशाही स्वीकारली आहे. या लोकशाहीचा मजबूत पाया म्हणजे आपल्याकडे असणारी पंचायतराज व्यवस्था होय संघराज्य स्तरावर संसद आणि राज्यस्तरावर विधीमंडळाच्या माध्यमातून कायदे तयार केले जातात. प्रत्यक्षात खेडयात वसणाऱ्या आपल्या देशात जनतेची सर्व कामे व विकास आणि आरोग्य शिक्षण आदी बाबी स्थानिक स्वराज्य सेवा संस्थाच्या माध्यमातून होतात. ग्रामीण भागात पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचं स्थान महत्वाचं ठरतं.

ग्रामीण जनतेसाठी जिल्हा परिषद एक मिनी मंत्रालयच असते. मात्र गावपातळीवर सर्व बाबी ग्रामपंचातीने हाताळायच्या असतात. गावात नेमकेपणानं कोणती विकासकामे होणे आवश्यक आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ कुणाला द्यायचा याची निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनाच असायला हवा. गावात असणारा ग्रामसेवक किंवा सरपंच आपल्या पसंदीने कुणालाही हा लाभ देवू शकू नये यासाठी ही बाब आवश्यक ठरते.

ग्रामसभेला हा अधिकार मिळावा यासाठी भारतीय संविधानात 73 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे.

राज्यघटनेतील कलम 243 अनुसार ग्रामसभेला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यात आणि निर्णयाचा अधिकार थेट गावपातळीवर ग्रामस्थांना देण्यात या घटनादुसस्तीचा फायदा होईल तसेच ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आणि पारदर्शक होणार आहे.

ग्रामसभा कधी घेण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. या अधिनियमाच्या कलम 7 अनुसार 6 ग्रामसभा आयोजित करण्याच्या तारखांसह विशेष वेळापत्रक देण्यात आले आहे.

गणराज्य दिन अर्थात 26 जानेवारी रोजी पहिली ग्रामसभा घ्यायची असते. दुसऱ्या ग्राम पंचायतीसाठी मार्च महिन्याची निवड करण्यात आली आहे.

1 मार्च ते 8 मार्च म्हणजे नागरी संरक्षक दिनापासून महिला दिनापर्यंतच्या आठ दिवसात कधीही ही सभा घेता येते.

एप्रिल महिन्यात 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत म्हणजे पंचायत राज दिवसापासून महाराष्ट्र दिनापर्यंतच्या कालावधीत तिसरी सभा घेता येते.

क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन अर्थात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान चौथी ग्राम सभा घ्यायची असते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी पाचवी ग्रामसभा तर वर्षातील सहावी ग्रामसभा 19 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत म्हणजेच ग्रामस्थ दिनापासून जागतिक महिला अन्याय निवारण दिनापर्यंतच्या कालावधीत घ्यायची आहे.

ग्राम पंचायतीसाठी केवळ मतदान करुन आपला हक्क संपत नाही तर गावचा हा गाडा चालावा व उपेक्षित आणि वचितापर्यंत शासकीय मदत पोहचावी या करीता ग्रामसभेत प्रत्येकाने हजेरी लावणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणे महत्वाचे आहे. लक्षात ठेवा या ग्राम सभांच्या निमित्ताने सत्ता थेट आपल्या हाती आली आहे.

- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment