कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे एक कोटी रुपये खर्चून खत नियंत्रण प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. बाजारपेठेतील खतांचे गुणनियंत्रण करुन शेतकऱ्यांना दर्जेदार खते उपलब्ध करण्यासाठी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. खतांतील घटक तपासणीचे कामही सुरु झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला कृषी परंपरा आहे. जिल्ह्यातील मोठी लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. त्याचबरोबर सहकारी साखर कारखाने, हरितगृहे, फलोत्पादन, मसाल्याची पिके, भाजीपाला यासारखी उच्च तंत्रज्ञानावर आधारित पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या पिकांसाठी रासायनिक खतांसह सेंद्रिय व जैविक खतांचा वापर केला जातो. परंतु खतांची गुणवत्ता तपासण्याची सोय नव्हती. त्यासाठी पुण्याला जावे लागे. बऱ्याचवेळा नमुने तपासून येईपर्यंत शेतकऱ्यांना दर्जा नसलेले खत विकले जात असे. प्रयोगशाळा नसल्यामुळे खतांचे नमुने मुदतीत तपासून देण्यावर मर्यादा येत होत्या. पण केंद्र शासनाच्या निधीतून ही प्रयोगशाळा साकारली आहे. त्यामुळे खतांचे नमुने घेणे आणि त्याची तपासणी करणे अतिशय सोपे झाले आहे.
कोल्हापुरातील मार्केट यार्डच्या परिसरात ही प्रयोगशाळा सुरु झाली आहे. या परिसरात शेतकऱ्यांची वारंवार येणे जाणे असल्यामुळे शेतकऱ्यांना खतांचे नमुने देणे आणि अहवाल घेणे या बाबी सोयिस्कर झाल्या आहेत. नत्र, स्फुरद, पालाश यासह आर्द्रता व गोळीचा आकार आदींसह पाच-सहा घटकांची तपासणी येथे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांना योग्य गुणवत्तेची खते मिळण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खत (नियंत्रण) आदेश 1985 अस्तित्वात आहे. सध्या राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती येथे प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. कोल्हापुरात ही प्रयोगशाऴा झाल्यामुळे काम खत तपासणीची काम आणखी सोपे झाले आहे. या प्रयोगशाळेची वार्षिक तपासणी क्षमता 1400 नमुने इतकी. या प्रयोगशाळेत राज्य शासन व जिल्हा परिषद कृषी विभागाची यंत्रणा जे नमुने आणून देईल त्याची गुणवत्ता तपासण्यात येईल.
रविंद्र राउत, माहिती अधिकारी, कोल्हापूर
No comments:
Post a Comment