पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करणे हा विषय सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. पर्यावरणाचे रक्षण होऊन त्याचा समतोल राखावा यासाठी पर्यावरण शिक्षण आणि जनजागृतीची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणांच्या विविध पैलूंविषयी जाणीव व्हावी या उद्देशाने बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी सारख्या ग्रामीण भागातील संत सावतामाळी इंग्लिश मिडियम स्कूलने मोफत शिक्षणाबरोबरच सर्व वर्ग ई-लर्निंग, इकोफ्रेंडली, कागद विरहित शाळा असे विविध उपक्रम राबवून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कै. मधुकर राजेनिंबाळकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत सावतामाळी इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना डोर्लेवाडी येथे २००८ मध्ये झाली. संस्थेने पहिल्याच वर्षी आपला शैक्षणिक दर्जा सिध्द करून शाळेला मान्यता मिळविली. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने देशापुढे पर्यावरण रक्षणाचे मोठे आव्हान उभे राहीले आहे.
शाळा तसेच इतर शासकीय, निमशासकीय संस्था यांना लागणारा प्रचंड कागद, त्यामुळे होणारी वृक्षतोड याचा प्रतिकूल परिणाम वातावरणावर होत आहे. हे टाळण्यासाठी संस्थेने या वर्षीपासून कागद विरहित शाळा हा उपक्रम संस्थेने राबविला आहे. संस्थेने शाळेची वेबसाईट तयार करून मुलांच्या प्रवेशापासून ते शाळेचे दैनंदिन वेळापत्रक, वह्या पुस्तकांची यादी, अभ्यासक्रम, ओळखपत्र, निकालपत्र, शाळेचे विविध दाखले, मासिक पालक बैठक, विविध उपक्रम, सुट्टयाचे निरोप आदी सर्व माहिती त्यावर दिली आहे. शाळेचे सर्व कामकाज संगणकामार्फत होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील पालकही इंटरनेटच्या जगाशी जोडले गेले आहेत. अशा प्रकारे निर्सगाचाही समतोल राखण्यासाठी संस्थेने छोटासा का होईना पण खारीचा वाटा उचलला आहे.
संस्थेचे अध्यक्ष्य अभिजितराजे निंबाळकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी गुणवत्ता असूनही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यासाठी संस्थेने गेल्या तीन वर्षापासून माफक शुल्कात प्रवेश देऊन दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही याचा सर्वांना फायदा होत नव्हता. त्यामुळे या वर्षीपासून संस्थेने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment