येतं. ती गोष्ट म्हणजे गावातलं पोस्ट ऑफिस. आपल्या देशातली पोस्टाची संस्कृती ही शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे. ज्या काळात इंटरनेट, दुरध्वनी, ईमेल, फॅक्स वगैरे सोयी नव्हत्या, त्या काळात तर संपर्कासाठी एकच जागा होती. आपलं पोस्ट ऑफिस. तेथूनच सारा संपर्क चाले. पोस्टमन तार घेऊन आला की घरातली माणसं धास्तावत, वाटे, तार आली म्हणजे काहीतरी वाईट बातमी असणार. पोस्टमन पत्र घेऊन आला की चेहेरे खुलत. दुर अंतरावर राहणाऱ्या आप्तांची ख्याली-खुशाली कळण्याचा आणि त्यांना ती कळवण्याचा ‘पत्र’ हा एकच मार्ग तेव्हा असे. त्या काळापासून पोस्ट ही केवळ सोय नव्हे, तर ह्या देशातली एक संस्कृतीच बनलेली आहे. आज संपर्काची अनेक साधनं घरोघर आणि गावोगावी आली आहेत. पण तरीही पोस्टाची संस्कृती आजही जाणवल्याशिवाय रहात नाही.
आपण अगदी अलिकडलं म्हणजे लंडन येथे चाललेल्या ऑलिंपिक सामन्यांचं उदाहरण घेऊ. ऑलिंपिक सामन्यांचं उदघाटन 27 जुलै रोजी झालं. पण आपल्या पोस्ट खात्याने त्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजे 25 जुलै रोजी ‘लंडन 2012 ऑलिंपिक खेल’ असे शब्द असलेलं अत्यंत आकर्षक आणि बहुरंगी असं पोस्टाचं तिकीट प्रकाशित केलं. हे तिकीट 20 रूपये किंमतीचं आहे. हे तिकीट तुम्हाला पहायचं असेल तर जायला हवं www.indiapost.gov.in ह्या संकेतस्थळावर. तुम्हाला माहीत आहे का की भारतीय पोस्ट खातं हे जगातील सर्वांत मोठं पोस्ट खातं आहे? भारतात आज एकूण दीड लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसेस आहेत.
भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही विशाल देश. पण तरीही दर 21 चौरस किलोमीटर मागे एक पोस्ट ऑफिस आज आपल्या देशात आहे. आपल्या पोस्ट खात्याचा वार्षिक अहवाल दरवर्षी प्रसिद्ध होतो. हा अहवाल म्हणजे पोस्ट खात्याशी संबंधित सर्वाधिक विश्वासार्ह माहितीचे संदर्भ स्थान. हा वार्षिक अहवाल पोस्टाच्या उपरोल्लेखित संकेतस्थळावर वाचण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. हा अहवाल अवश्य चाळा. तुमच्या ज्ञानात एकीकडे महत्त्वाची भर पडेल, आणि दुसरीकडे त्याच वेळी आतापर्यंत कधीही न ऐकलेली गंमतीदार माहिती कळल्यावर तुमचे मनोरंजनही होईल. हे एक उदाहरण पहाः गेल्या वर्षीच्या अहवालानुसार देशात एकूण 1,54,979 पोस्ट ऑफिसेस होती. पण त्यातली 1,39,182 पोस्ट ऑफिसेस ही ग्रामीण भागातील आहेत. फक्त 15,797 म्हणजे केवळ 10.19 % कार्यालये ही शहरी भागातील आहेत. हे आकडे पाहिल्यावर कळतं की भारताला गावांचा देश असं का म्हणतात. ह्या संकेतस्थळावर अशा उपयुक्त आणि मनोरंजक माहितीची रेलचेल आहे. ती सर्वच द्यायची झाली तर एक लेखमालाच तयार होईल. पण एक गोष्ट मात्र आवर्जुन सांगायला हवी, ती म्हणजे देशभरातील पिन कोडची डिरेक्टरी (तीही सर्चेबल) ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दोन प्रकारे तुम्ही पिन कोड तिथे शोधू शकाल. एक म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या गावाचा पिन कोड शोधता येईल, आणि दुसरं म्हणजे एखादा पिन कोड हा कोणत्या ठिकाणचा आहे हे जाणता येईल. ही सोय खुद्द पोस्ट खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर असल्याने ती पुर्णपणे विश्वासार्ह आहे हे महत्त्वाचे.
पोस्टाची बचत बँक सेवाही आहे. संपूर्ण देशात मिळून एकूण सुमारे 9 कोटी बचत खाती आज आहेत. यातली अर्थातच सर्वाधिक ही ग्रामीण भागातील असणार हे ओघानेच आलं.
असं हे पोस्टाची सर्वांगीण माहिती देणारं www.indiapost.gov.in हे महत्त्वाचं संकेतस्थळ. मला ते नेहमीच उपयोगी पडतं. तुम्हीही त्यात अवश्य मुशाफिरी करून पहा.
- माधव शिरवळकर (ms@pujasoft.net)
No comments:
Post a Comment