Sunday, January 20, 2019

राष्ट्रवादी चे ओबीसी नेते छगन भुजबळ हे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यात यशस्वी होतील काय...? राजेश खडके सकल मराठी समाज


     
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी दुपारी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत तासभर चर्चा केली. एमआयएमचे नेते खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी मला एकही जागा नको, मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडतो पण प्रकाश आंबेडकरांचा सन्मान करत त्यांना महाआघाडीत सामावून घ्या, असे आवाहन केले होते. त्यानंतर आघाडी व वंचित बहुजन नेत्यांत चर्चा सुरू झाल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बुलढाणा येथे पोहचलेली निर्धार परिवर्तन यात्रा सोडून औरंगाबादमध्ये येऊन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणे पसंत केले आहे. रविवारी दुपारी तासभर या नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीला छगन भुजबळांसह आमदार बळीराम सिरस्कर, आमदार सतीश चव्हाण, आमदार हरिदास भदे, माजी आमदार विजय मोरे, प्रा. किसन चव्हाण प्रा. सदानंद माळी आदी नेते उपस्थित होते. या बैठकीचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी महाआघाडी करताना वंचित बहुजन आघाडीला किती जागा हवा आहेत याचा अंदाज भुजबळांच्या माध्यमातून आघाडी घेत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर राज्यातील काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहेत दुसरीकडे, शरद पवारांसोबतचा त्यांचा वैचारिक वाद जगजाहीर आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत महाआघाडीबाबत बोलणार नाही. मी दुय्यम नेत्यांशी बोलणार नाही काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलेन असे वक्तव्य आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी केले होते. त्यामुळे प्रदेश काँग्रेस पातळीवरून त्यांच्याशी चर्चा करण्यास कोणीच तयार नाही. मध्यतरी माणिकराव ठाकरे व विखेंनी आंबेडकरांनी चर्चा केली होती. मात्र, त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी मागील पंधरवड्यात छगन भुजबळ यांची मुंबईत भेट घेतली होती. भुजबळ हे शरीराने राष्ट्रवादीत असले तरी मनाने वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत असे वक्तव्य या भेटीनंतर आंबेडकरांनी केले होते. भुजबळ हे ओबीसी वर्गातून येतात. त्यामुळे ओबीसी व दलितांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा बहुल नेत्यांनी संधी दिली नसल्याचा आरोप आंबेडकर करत आले आहेत. राज्यातील 180 मराठा कुटुंबातच सत्ता फिरते असा आरोप मागील आठवड्यातील सांगलीतील सभेत त्यांनी केला होता. त्यामुळे आंबेडकरांशी बोलणी करण्यास मराठा नेते कचरत असताना भुजबळांनी पुढाकार घेतल्याचे कळते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने तेच यापुढे प्रकाश आंबेडकरांशी वाटाघाटी करतील अशी माहिती समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपविल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यात यशस्वी होतील काय...?

No comments:

Post a Comment