उडान लोक संचालित साधन केंद्र, हिंगणघाट कार्यक्षेत्रातील सुमारे २० कि.मी. अंतरावरील अल्लीपूर गाव. गावात माविमव्दारा स्थापित ८ बचतगट असून जास्तीत जास्त महिला गरीब, गरजू व मजूर वर्गातील आहे. अशाच घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या परिस्थितीशी उद्योगाच्या माध्यमातून झुंज देवून परिस्थितीत बदल घडविण्यासाठी धडपडत असलेल्या महिलेची कथा...
चंदा भगत समता महिला बचत गटाची सदस्य आहे. गटामध्ये येण्यापूर्वी घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. गरीबीच्या परिस्थितीत काढलेले दिवस. दररोज मिळेल ते मोलमजुरीचे कामकाज करुन संसाराचा गाडा चालविण्यासाठी पतीला हातभार लावायचा. मजुरी करण्याकरिता घरातून बाहेर पडण्यास मनाई नव्हती. परंतु काहीही चांगले कार्य करण्यास घरातून बाहेर पडण्यास मात्र मनाई. अशा परिस्थितीत घरच्यांच्या विरोधास न मानता आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना कधी मनमोकळेपणाने वाव देता आला नव्हता.
एके दिवशी माविम सहयोगीनीनी आम्हाला गटाच्या माध्यमातून एकत्र आणले आणि विविध प्रशिक्षण व वेळोवेळी मार्गदर्शन करु लागल्या. गटाच्या निमित्याने आम्ही एकत्र येवू लागलो व मनमोकळेपणाने गटाच्या मिटींगमध्ये आम्ही चर्चा करु लागलो. हळूहळू घरच्यांचा विरोध संपला. कारण त्यांना गटातून मिळणारे कर्ज घरातील अडचणींवर मात करण्यास कामी येवू लागले. आता मला घरच्या मंडळीकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.
जसजसे गटाचे वय वाढू लागले. तसतसा माझा आत्मविश्वास अधिक वाढू लागला. गटासोबत घरच्यांचासुध्दा विश्वास जिंकल्याने व त्यांची साथ मिळाल्याने दररोज न मिळणा-या मजुरीवर मात करण्याचा विचार सुरु केला.
मी एके दिवशी माझ्या पतीशी चर्चा केली की गटातून कर्ज घेवून जर आपण एक सिजनेबल उद्योग सुरु केला तर ? त्यांना प्रस्ताव आवडला व आम्ही गटातून कर्ज घेवून पोळ्याचा बैलांचा साजशृंगार तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला आणि पहिल्या पोळ्याला आम्ही बनविलेल्या मालाची चांगली विक्री झाली.
गटाने आर्थिक सहाय्य करुन ज्याप्रमाणे मला मदत केली. त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाने सुध्दा माझ्या व्यवसायात हातभार लावून मदत केली. यातून माझा व माझ्या पतीचा उद्योगविषयीचा आत्मविश्वास वाढला असून आम्ही कुठल्याही प्रकारचा उद्योग सुरु करण्यास दोघेही तयार आहोत.आता माझ्या व्यवसायात माझी छोटी मुलगीही आनंदाने हातभार लावते.मी माझ्या मुलीला तिच्यामधील गुणांना त्याच माध्यमातून उजाळा मिळावा म्हणून प्रोत्साहन देत असते. या उद्योगाने माझ्या घरची आर्थिक परिस्थितीतच नव्हे तर मानसिकतेमध्येही चांगला बदल झाला. त्यामुळे आता उद्योग हेच माझे व कुटुंबियांचे ध्येय आहे.
No comments:
Post a Comment