Monday, August 29, 2011

कोकणात हळद लागवडीला ‘आत्मा’ देणार गती

जागतिक बाजारपेठेत हळदीला असलेली मागणी पाहता शेतकऱ्यांना निश्चितच चांगला मोबदला मिळू शकतो. कोकणात मुळातच हळदीची लागवड फार कमी प्रमाणात होताना दिसते. परंतु गेल्या काही वर्षात गुहागर, चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये हळद लागवडीचे प्रयोग काही शेतकऱ्यांनी केलेले आढळतात. कोकणातील भौगालिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामान हळद लागवडीसाठी पूरक आहे. सरासरी ६४० ते ४ हजार २०० मि.मि. वार्षिक पर्जन्यमान असलेल्या व स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या भागामध्ये या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. या पिकासाठी १८ ते २८ सेंटीग्रेट तापमान आवश्यक असते. समुद्र सपाटीपासून ४५० ते ९०० मीटर उंचीवर या पिकाची लागवड होऊ शकते. कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या तालुक्यांमध्ये या पिकाची लागवड उत्तम पध्दतीने होऊ शकते.

कोकणातील जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी येथील हवामानाला अनुरुप असलेल्या हळदीच्या जातीची निवड करण्याची गरज आहे. सध्या फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापूरी आदी हळदीच्या सुधारित जाती उपलब्ध आहेत. त्यामध्ये फुले स्वरूपा या जातीच्या ओल्या हळदीचे २५८.३० क्विंटल प्रती हेक्टर तर वाळलेल्या हळदीचे ७८.८२ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळू शकते. सेलम या जातीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन साडेआठ ते नऊ महिन्यांमध्ये मिळवता येते. कृष्णा जातीच्या हळदीचे प्रती हेक्टरी ५५ ते ५८ क्विंटल कच्च्या स्वरूपात तर पक्व हळद ८ ते ९ महिन्यात उपलब्ध होऊ शकते.

कोकणातील भूरूपानुसार हळदीची लागवड करता येऊ शकते. आज शेतकरी भातशेतीची वेगाने कामे करीत आहेत. कोकणात पडीक जागांमध्ये हळद लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वनियोजन केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येईल. हळदीची लागवड करण्यासाठी कृषी विभागामार्फत दोन प्रकारच्या लागवडींची माहिती देण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने सरी-वरंबा पध्दत व रुंद वरंबा किंवा गादी वाफा पध्दतीचा समावेश आहे. सरी-वरंबा पध्दतीत पाटाने पाणी देण्याची व्यवस्था असते. त्यामध्ये ७५ ते ९० सें.मी. वर सऱ्या पाडून लागवड केली जाते. रुंद वरंबा पध्दतीत पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत १५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्या लागतात. त्यासाठी गादी वाफे तयार करून घेणे आवश्यक असते. हळदीची लागवड करण्यासाठी वापरण्यात येणारे बियाणे सुप्तावस्था संपलेले असणे आवश्यक असते.

हळदीचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बियाण्याला प्रामुख्याने किड व बुरशीपासून वाचवण्यासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के, प्रवाही २० मि.ली. काबेन्डाझीन ५० टक्के पाण्यात मिसळणारे १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हळकुंड बियाण्यावर प्रक्रिया करावी. कोकणातील शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टींची तंत्रशुध्द माहिती आत्मा या योजनेमार्फत देण्यात येत आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.

कोकणात भातशेतीसोबतच शेतकरी भाजी, कडधान्य (पावटा, कडवा, तुरी) यांचीदेखील लागवड करतात. हळद लागवडीसोबतदेखील शेतकऱ्यांना आंतरपीक घेण्याची संधी आहे. त्यामध्ये श्रावण घेवडा, मिरची, कोथंबीर ही पिके शेतकरी घेऊ शकतात. कोकणात सध्या कराड, कोल्हापूर आदी भागांतून मोठ्या प्रमाणात भाजी आयात केली जाते. हळदीसोबत जर आंतरपीक घेतले गेले तर येथील भाजीची मागणीदेखील काही प्रमाणात स्थानिक शेतकऱ्यांकडून पूर्ण करता येईल.

शेतकऱ्यांनी प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ यांच्या बागायतीकडे लक्ष दिले आहे. त्यावरील रोग नियंत्रणासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु अपेक्षित उत्पादन मिळताना दिसत नाही. आता हळद लागवडीकडे वळल्यास त्यांना निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. हळदीवर प्रामुख्याने कंदमाशी, पानातील रस शोषून घेणारे ढेकूण, पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रार्दुभाव होतो. तो नियंत्रणात आणण्यासाठी इंडोसल्फानचा वापर करुन कमी खर्चात किटक नियंत्रण करता येते.

हळदीवर पडणारे कंदकूज व पानावरील ठिपके हे रोग नियंत्रणात आणणेदेखील सोपे आहे. मेटॅलॅक्सिल, मॅकॉझेब या बुरशीनाशकांचा व बोर्डो मिश्रणाची फवारणी करून रोगाचे नियंत्रण करता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच इतर नाविन्यपूर्ण पिके शेतीत घेतली तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

No comments:

Post a Comment