गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आधी शह-काटशहाच्या राजकारणापासून प्रत्येकाने दूर राहायला पाहिजे. हेवेदावे नसायला पाहिजेत, तेव्हाच कुठे गावाची प्रगती साधता येते. हा मौल्यवान संदेश प्रत्यक्ष जोपासणा-या यवतमाळ जिल्हयातील हिवरा (संगम) या गावाच्या विकासाविषयी असेच काही सांगता येईल. कारण या गावात एकीच्या बळातून ग्रामस्थांना विकासाचा सूर सापडला आहे.
हिवरा संगम तसेही एकवीरा देवीमुळे विदर्भ-मराठवाड्यात प्रसिध्द आहे. गावाची लोकसंख्या ३८३१ असून पैनगंगेच्या संगमामुळे गावाला नैसर्गिक सौदर्य प्राप्त झाले आहे. एक शिस्तीचे गाव म्हणून हिवरा संगमने जिल्ह्यात नावलौकीक मिळविला आहे. या आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती दिलीप पोटे यांनी शासनाच्या अनेक योजना गावात आणल्या.
विकास कामात गावकऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरत असल्याने गावात विकासाची गंगा अवतरली. माहूर-नांदेड रोडवर माहूर पासून नांदेड मार्गे जातांना अवघ्या ७ किलोमिटर अंतरावर असलेले हिवरा संगम हेस्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिध्द आहे. शक्तीपीठापैकी एक असलेले एकवीरा देवीचे मंदिर गावातच असल्याने गावात भक्तीमय वातावरण आहे. त्यामुळे भांडण तंट्याला वाव मिळत नाही. समन्वयातून गावाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे. राज्य शासनाने तंटामुक्त अभियान हिवरा येथे गावकऱ्यांनी राबविले असून, गावातील तंटे गावातच मिटविण्यावर त्यांचा भर राहीला आहे.
कोणत्याही विकास कामाची सुरुवात ही ग्रामपंचायत कार्यालयातून होते. सरपंच लोकांना वेळ देता यावा म्हणून ठरलेल्या वेळात त्या ग्रामपंचायत कार्यालयात बसून असतात. गावात विविध विकास योजनेतून रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा या मुलभूत सुविधेसह गावात दारुबंदीसाठी गावकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.
महिला सरपंच म्हणून महिलांच्या बचतगटाला योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या बचतगटाला स्वयंपूर्ण करण्यासाठी गावातच मार्गदर्शन करुन विविध योजनाही महिला बचतगटांपर्यंत पोहचविण्याचे कार्य ग्रामपंचायत पुढाकार घेऊन करते. गावात स्वच्छता अभियान राबवित असतांना रस्त्यावरील अतिक्रमण काढणे मोठे जिकरीचे काम असले तरी नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते. गावाच्या विकासात गावकरी श्रमदान करीत असल्याने विकास कामात बाधा येत नाही. जिल्हा परिषदेचे गावाच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या सहकार्याने गावात सिमेंट रस्ते, शाळा इमारती, घरकुल योजना तसेच विविध फंडातून कोट्यावधी रुपयांची कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविता आली. या कामातून गावातील लोकांना रोजगार देता आला. तसेच गावकऱ्यांनी श्रमदानातून उभारलेली येथील स्मशानभूमी म्हणजे गावाची एकता, समन्वय आणि विश्वासातून आत्मपरिक्षण करावयाला लावणारे विलोभनिय स्थळ झाले आहे. स्मशानभूमीत समाधी स्थळासाठी क्रमवारी ठरलेली असून लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत, जात-पात ही व्याख्याच गावकऱ्यांनी मोडीत काढली आहे. येथील स्मशानभूमीचे सौदर्य म्हणजे गावकऱ्यांच्या विश्वातून व सहकार्याने एक नंदनवन तयार झाले आहे. तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात हिवरा संगम ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गावाच्या विकास कामांची पाहणी करुन अनेकजण गावाच्या उपक्रमांचे कौतुक करीत आहेत व काही गावे अनुकरण करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
No comments:
Post a Comment