प्रमोद सुर्वे यांचे वडील आनंदा सुर्वे यांनी आपला मुलगा मुक-बधीर असला तरी त्याला लिहिता वाचता आले पाहिजे, तो स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे या भूमिकेतून विटा येथील मुक-बधीर विद्यालयात त्याला शिक्षणासाठी घातले. या विद्यालयात विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्यामुळे प्रमोदचे वडील दररोज त्याला एसटीने विटा येथे शाळेत घेऊन जात-येत होते. त्यांनी सलग दोन वर्षे मुलाच्या शिक्षणासाठी हेलपाटे घातले. पुढे प्रमोद स्वत: एसटीने शाळेला जाऊ लागला. या शाळेत त्याने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
आपण मुक-बधीर असल्याने मुक-बधीर मुलीशीच लग्न करण्याचा निश्चय प्रमोदने केला आणि त्याप्रमाणे नात्यातीलच एका मुक-बधीर मुलीशी त्यांनी लग्न केले. तिचे शिक्षण जेमतेम झाले होते. लग्नानंतर या दाम्पत्यांनी घरची शेती विकसित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ताकारी योजनेचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन द्राक्ष पीक घेण्याचा निर्णय घेतला. तीस गुंठे क्षेत्रावर त्यांनी द्राक्ष बागेचा उपक्रम राबविला व त्यातून चांगले उत्पादनही घेतले. यासाठी विविध तज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेतला तसेच इतरांनी द्राक्ष बागेबाबत केलेल्या उपाययोजना याची माहिती घेऊन द्राक्षाचे पीक घेतले.
द्राक्ष पिकावर कोणते औषध फवारावे याचे तंत्र या दाम्पत्याने आत्मसात केले होते. स्वत: सुर्वे कुटुंबीय औषधाची फवारणी करतात. तीस गुंठे द्राक्ष बागेतून वर्षाकाठी दोन लाखाच्यावर उत्पन्न मिळविले आहे. द्राक्ष बागेबरोबरच दोन वर्षापासून त्यांनी ऊस पीकही घेण्यास सुरुवात केली आहे. एक एकरातून ६५ टनापर्यंत उसाचे उत्पादन काढण्यात त्यांना यश आले आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेस मोठा फटका बसल्यामुळे त्यांनी द्राक्ष बाग काढून त्याठिकाणी भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे.
उसाबरोबरच त्यांनी शेतात गेल्या वर्षी ढबू मिरचीची लागवड केली. बारा गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या ढबू मिरचीच्या उत्पादनातून त्यांना सव्वा लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. शेतीला जोड म्हणून त्यांनी तीन म्हशी व दोन गायींचे संगोपन करण्यास सुरुवात केली. या गायी-म्हशींची देखभाल करण्याबरोबरच चारापाणी व औषधे वेळच्यावेळी गायी म्हशींना देतात. स्वत: दूध काढून ते डेअरीला घालणे व दुधाचा हिशोब ठेवणे आदी कामे ते पार पाडतात.
प्रमोद आनंदा सुर्वे व मनिषा सुर्वे या मुक-बधीर दाम्पत्यांची जगण्याची धडपड व त्यांनी आपल्या जन्माबरोबरच आलेल्या व्यंगाला दोष न देता आव्हानाला तोंड देऊन त्यावर यशस्वीपणे मात करुन संसाराचा गाढा हाकला आहे. या दाम्पत्याने जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आलेल्या संकटावर मात करुन आनंदाने सुखाचा संसार फुलवून या परिसरातील शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला आहे.
No comments:
Post a Comment