Friday, August 19, 2011

मधूर बचत

आदिवासी भागाच्या विकासासाठी बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध प्रयत्नांचे मधु फळ मिळू लागले आहे. कळवण तालुक्यात मध उत्पादनात मिळालेले यश लक्षात घेऊन नोंव्हेंबर मध्ये एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने शुध्द मध उत्पादनाचे एक स्वतंत्र्य युनिट सुरु करण्यात येणार आहे.

कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या पायथ्याशी बिलवाडी हे छोटेसे गांव , महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गंत गावात सहा बचतगट सुरु झाले आहेत. शेती व जोड व्यवसाय करणे यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. बचत गटाच्या माध्यमातून शेतीला पूरक अशा मध उत्पादन क्षेत्रात शिरकाव करतांना या महिलांची ओळख महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी ज्योती निंभोरकर यांच्याशी झाली. निभोकर यांनी तळेगांव दाभाडे येथून २०११ मध्ये २२ मध्ये कॉलनी (पेटया ) या बचत गटाला दिल्या. या पेटीसाठी बचत गटाने १० हजार रुपये जमा केले, तर महामंडळाने ९० हजार रुपयांची मदत केली. पेटीत एक राणी माशी व बाकीच्या सेवेकरी माश्या असतात. या पेटीसोबतच मध काढण्याचे यंत्र, ॲपिक्स सेराइं‍डिका या जातीतील मधमाशी, जाळी यांसह इतर साहित्य देण्यात आली. यासाठी एका पेटीमध्ये प्रत्येकी साधारणत: ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो.

महामंडळाच्या वतीने बिलवाडी, देवळीवण, बौरदैवत, बेटकीपाडा, चिंचवाडा या गावातील ३० महिलांना मध तयार करण्याचे साहित्य देण्यात आले. सेंट्रल बी रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इ‍न्स्टिटयूटच्या वतीने त्यांना तीन दिवसाचे कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. महिलांनी प्रशिक्षण मिळाल्यानंतर ख-या अर्थाने आपली कामकाजाचा श्रीगणेशा केला.

सकाळी मधपेटयांचे निरिक्षण करणे, साधारणत: काल जेवढया माश्या होत्या, तेवढया आहेत की नाही यांचे परिक्षण महिलांकडून केले जाते. मधमाश्या मधपेटयांपासुन साधारण एक किलोमीटर अंतरावर पराग कण शोधत फिरतात. यासाठी त्यांनी कांदयाच्या शेतीतच हा उपक्रम राबविला . कांदा बीजात मोठया प्रमाणावर परागकण असल्याचा फायदा होणे , हेही एक कारण यामागे आहे. एका हंगामात सुरुवातीच्या काळात चार महिन्यामध्ये कमीत कमी दोन किलो मध मिळतो. या शिवाय एका पेटीतून चार किलो मेण मिळते. मध बनण्याची प्रक्रिया सुरु असतांना त्या पेटयांना मुंग्या लागू नये, ही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण मधाला मुंग्या लागल्या तर ते मध विक्रीयोग्य राहत नाही. यासाठी सुरुवातीपासूनच पेटी ज्या स्टॅन्डवर असते, त्यांचे पाय पाणी असलेल्या चार वाटयांमध्ये ठेवले जातात.

महामंडळाने प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र पेटी करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हा खर्च त्या व्यक्तीने स्वत: करावयाचा आहे. यामुळे बचत गटाच्या स्वत:च्या मालकीच्या जादा पेटया तयार होत आहेत. बचत गटाने आपले पहिले उत्पादन मिळविले असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र बाजारपेठेत त्याचे मुल्य वाढावे यासाठी मंडळाच्या व्यवसायवृध्दीसह केंद्रात नि:शुल्क पॅकेजिंग केले जाते. कुठल्याही प्रकारची प्रसिध्दी न करता मधाची मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. शुध्द स्वरुपातील हे मध् नाशिक येथील महिला आर्थिक विकास महामंडळ येथे उपलब्ध आहे. संपर्क क्रमांक ०२५३-२५८०६०८ असा आहे.

सदर मध निर्मिती ही चार महिन्यात होते. एका पेटीच्या मधातून ३०००/- हजार रुपये उत्पादन मिळते. कळवण आदिवासी विभागात सुरु केलेल्या या ५ गावातील बचतगटांना दिलेल्या २२ पेटयामधुन प्रथम हपतयात ६६ हजार रुपये उत्पादन निव्वळ नफा झालेला आहे. हा शेतीपुरक व्यवसाय असून यांचा जास्तीत जास्त लाभ शेतक-यांनी तसेच सुशिक्षीत बेरोजगार व बचतगटांनी घ्यावा असे, आवाहनही मध उत्पादन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


  • अशोक साळी

  • No comments:

    Post a Comment