Wednesday, August 31, 2011

प्रयोगशील शेतकरी

पुरंदर तालुक्यातील साकुर्डे हे गाव ! गावातील प्रयोगशील शेतकरी सुरेश सस्ते यांनी स्वत:ची शेती विकसित करताना गावातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान शेताच्या बांधावर पोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. श्री. सस्ते म्हणतात, २००५ मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून शेतकरी-शास्त्रज्ञ मंचातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती झाली. शेती सुधारण्यासाठी या मंचाचा सदस्य झालो. त्यातून पीक प्रात्यक्षिके, फळबाग व्यवस्थापन, जल-मृद संधारणाचे उपाय, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, राहूरीमध्ये शिवारफेरी अशा उपक्रमांतून शेतीतील बदल समजले स्वत:च्या शेतीमध्ये त्यांचे अनुकरण सुरु केले. त्याचवेळी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचेही मार्गदर्शन मिळू लागले.

ते पुढे म्हणाले, सहा भावांची मिळून ३५ एकर शेती आहे. दोघे भाऊ शेतीचे नियोजन करतात. त्यातील १५ एकर क्षेत्र विहीर बागायत, तर २० एकर कोरडवाहू आहे. सुधारित शेतीच्या नियोजनानुसार २००६ मध्ये फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत सात एकर सीताफळ आणि सव्वा एकर अंजीर लागवड केली. सीताफळासाठी चार बाय चार मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणून शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीच्या मिश्रणाने खड्डे भरुन पुरंदर स्थानिक जातीची पावसाळा सुरु झाल्यावर लागवड केली परंतु त्या वर्षी पाऊस कमी झाला, त्यामुळे काही रोपे मेली. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय फलोद्यान अभियानांतर्गत फेब्रुवारी २००७ मध्ये शेततळे घेतले, त्यामुळे संरक्षित पाण्याची सोय झाली. जून २००७ मध्ये सीताफळाच्या रोपांची लागवड केली. अनुदान आणि स्वत:चे पैसे घालून सीताफळ आणि अंजिरला ठिबक केले. सध्या सात एकर सीताफळ आणि सव्वा एकर अंजीर, एक एकर डाळिंब दीड एकर चारा, चार एकर क्षेत्रामध्ये ज्वारी, बाजरी आणि गहू, वाटाणा, भेंडी, भुईमूग अशी पिके आहेत.

सिताफळाला पावसाळ्यानंतर गरजेनुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. सीताफळ लागवडीत पहिली तीन वर्षे आंतरपीक घेतले. उडीत, मुगाचा पाला जागेवर कुजविला. हिरवळीच्या खतासाठी तागाचे पीक घेतले. दरवर्षी जून महिन्यात प्रत्येक झाडाला दीड पाटी शेणखत आणि अर्धी पाटी गांडूळ खत आळ्यातील मातीमध्ये मिसळून दिले. झाडांना छत्रीसारखा आकार दिला.

सन २०१० मध्ये पावसाळी बहर धरला. त्याआधी मे महिन्यात झाडांवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी केली. झाडांच्या आळ्यात दीड पाटी शेणखत आणि अर्धी पाटी गांडूळ खत मिसळून दिले. खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असल्याने फुले आणि फळांची वाढ चांगली झाली. जुलैत फळकुजीच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी केली. पंधरा दिवसांनी प्रति लिटर पाण्यात एक ग्रॅम कार्बेन्डझिम मिसळून फवारणी केली. ऑगस्ट महिन्यात पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील विभागीय विस्तार केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्‍ल्याने प्रति एकरी १५०० क्रिप्टोलिमस माँट्रोझायरी भुंगेरे सायंकाळी सहानंतर बागेत सोडले.सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर, बागेची योग्य मशागत आणि पाणी व्यवस्थापनामुळे फळांचा चांगला आकार मिळाला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फळांची काढणी सुरु झाली.पहिल्या बहरात प्रति झाड सरासरी दहा किलो फळे मिळाली. सात एकरांतील १४०० झाडापैकी एक हजार झाडांपासून उत्पादन मिळाले. सरासरी ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. फळांची विक्री सासवड आणि पुण्याच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना केली. पहिल्या बहराच्या उत्पादनातून खर्च वजा जाता दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले. यंदा पुन्हा पावसाळी बहर धरला आहे. झाडाची उंची आठ फुटांपेक्षा जास्त जाऊ नये म्हणून हलकी छाटणी केली आहे.

सिताफळाबरोबरच सव्वा एकर मध्यम हलक्या, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत अंजीरची लागवड केली. पाच बाय पाच मीटर अंतरावर योग्य आकाराचे खड्डे खणून त्यात शेणखत, चांगली माती, निंबोळी पेंडीचे मिश्रण भरुन जूनमध्ये रोपांची लागवड केली. बागेतील पट्टयामध्ये झेंडू लागवड केली. या झेंडूचेही चांगले उत्पादन मिळाले. झाडांना योग्य आकार शेंड्याची हलकी छाटणी केली.झाडांना योग्य आकार दिला. फळांची काढणी नोव्हेंबरमध्ये सुरु झाली. फळांची गुणवत्ता चांगली असल्याने बागेतच स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केली. काढणी फेब्रुवारीपर्यंत सुरु होती. व्यापाऱ्यांनी सरासरी २५ रुपये प्रति किलो दर दिला. एका झाडाला पहिल्या बहरात सरासरी १५ किलो फळे मिळाली. साधारणपणे सव्वा एकरातून दोन टन फळांचे उत्पादन मिळाले. पहिल्या बहरातून दोन वर्षाच्या व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता दर चांगला असल्याने चांगला नफा मिळाला, फेब्रुवारीपर्यंत फळे संपल्यानंतर बागेला विश्रांती दिली. मे महिन्यात झाडांवरील वाळलेली, रोगट पाने काढली. सन २००९ मध्ये पुन्हा खट्टा बहर धरला, बागेचे योग्य व्यवस्थान ठेवले. तांबेराग्रस्त पाने काढून टाकली. शिफारशीनुसार रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी केली. बोगच्या व्यवस्थापनाचा खर्च ४० हजार आला. प्रति झाड ४० किलो फळे मिळाली. सरासरी दर २० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. खर्च वजा जाता या वर्षी एक लाख २० हजार मिळाले.

२०१०-११ मध्ये मीठा बहर धरला. ऑगस्टमध्ये पानगळ केली. शेंड्यांची छाटणी केली. रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन ठेवले. सप्टेंबर महिन्यात प्रत्येक झाडाला पाच पाटी शेणखत, एक पाटी गांडूळ खत, एक किलो डीएपी, एक किलों निंबोळी पेंड आळ्यात मिळसून दिली. ऑक्टोबर पहिल्या आठवड्यामध्ये ठिबकने पाणी देण्यास सुरुवात केली. साधारणपणे १५ फेब्रुवारीपासून फळे मिळाली. सरासरी ३० किलो दर मिळाला. या वर्षी नीरा, पुणे आणि स्थानिक बाजरपेठेत फळे विकली. या वर्षीच्या बागेच्या व्यवस्थापनाला ७० हजार खर्च आला. सव्वा एकरातून १२ टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सुमारे २.२० लाख रुपये नफा मिळाला. फळांचा दर्जा चांगला मिळाला. व्यापारी बागेत येऊन खरेदी करतात. नीरा बाजापेठेतही चांगला दर मिळतो.

एक एकर मध्यम जमिनीत २००८ मध्ये डाळिंबाच्या भगव्या जातीची लागवड केली. ऑक्टोबर २०१० मध्ये बागेतील पट्टयात देशी झेंडूचे आंतरपीक घेतले. खर्च वजा जात तीस हजार मिळाले, डाळिंबाचे उत्पादन सुरु झाले.


पूरक व्यवसायाबाबत बोलताना सस्ते म्हणाले की, सध्या आमच्याकडे सहा होल्स्टिन फ्रिजियन आणि दोन खिलार गाई आहेत. खिलार गाईंचे दूध घरी वापरतो. होल्स्टिन फ्रिजियन गाईंपासून सरासरी १५ ते २० लिटर दूध मिळते. रोज ५० लिटर दूध डेअरीला पाठवितो. चाऱ्यासाठी मक्याची लागवड केली आहे. जनावरांना कडबा कुट्टी दिली जाते. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गाईंचे योग्य व्यवस्थापन ठेवले आहे.सहा जनावरांच्या व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता महिन्याला दहा हजार मिळताता.दरवर्षी दहा ट्रॉली शेणखत तयार होते. हे शेणखत शेतीला वापरातो. वर्षभरात चार टाक्यांतून पाच टन गांडूळ खत तयार होते. अंजीर, सीताफळ आणि डाळिंब बागेसाठी वे वापरले जाते.

सध्या वनराजा या सुधारित जातीच्या ५० कोंबड्या आहेत. या कोंबड्यांपासून दररोज २० अंडी मिळतात. गावातच सरासरी चार रुपये दराने अंडी विक्री होते. केंबडीला सरासरी २०० रुपये दर मिळतो दोन उस्मानाबादी शेळ्या आहेत. सुमारे पाच ते सहा महिन्यांचे करडू दोन हजार रुपयांना विकले जाते, लेंडीखतही मिळते.

शेती करताना फळबाग, पुष्प शेती, पशुपालन, कुकुटपालन या पूरक व्यवसायी जोड देणे आवश्यक आहे. मी नाविन्यपूर्ण प्रयोग केला, प्राप्त यश मिळाले. इतर शेतकऱ्यांनी देखील कौशल्यपूर्ण शेती करावी. फायदा निश्चित होईल, असे ते विश्वासाने सांगतात.

No comments:

Post a Comment