सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी पेणचे कै.वामनराव देवधर यांनी श्रीगणेशाच्या मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला. पुढे त्यांच्याकडे शिकण्या-या काही कारागिरांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि हा व्यवसाय भरभराटीस येत गेला. पेण नगरपरिषदेकडे नोंदणी झालेले जवळपास १५० मुर्तीकार आजमितीला पेण शहरात आहेत, तर पेण शहराच्या हद्दीबाहेर, तालुक्यातही अनेक गावातून आणि घरातून गणेश मुर्तींचा व्यवसाय नावारुपाला आला आहे. नुसत्या पेण शहरातील गणेश मुर्तीची दरवर्षीची उलाढाल अंदाजे १५ ते २० कोटीच्या घरात आहे.
पेण शहरात गणेश भक्तांची आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पेणचे हे वैशिष्टय आणि महत्व ओळखून पेण नगरपालिकेने श्रीगणेश संग्रहालयाची निर्मिती दि.२७ डिसेंबर,२००९ रोजी केली. अल्पावधितच हे संग्रहालय अत्यंत लोकप्रिय झाले आहे. अनेक नामवंत गणेश भक्तांबरोबरच क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही या संग्रहालयाला भेट दिली आहे.
या संग्रहालयात शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्याचे साचे, गणेशाच्या विविध आकाराच्या असंख्य मूर्त्यांची अत्यंत सुबकपणे मांडणी करण्यात आली आहे. त्याबरोबरच पेण शहरातील मान्यवर मूर्तीकार, मूर्तीकारांची माहिती, छायाचित्रे विविध वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झालेले विशेष लेख, त्यांची कात्रणे, विविध मान्यवर व्यक्तींनी संग्रहालयास दिलेल्या भेटींची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहे.
हे प्रदर्शन कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी सुरु असतेच, परंतु पूर्व कल्पना दिल्यास सुट्टीच्या दिवशीही खुले ठेवण्यात येते, अशी माहिती पेण नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री.प्रभाकर कांबळे यांनी दिली. या संग्रहालयास भेट देणा-या व्यक्तींसाठी अभिप्राय नोंदवही ठेवण्यात आली असून त्यातून भेट देणा-या गणेश भक्तांचे, पर्यटकांचे मनोगत मोजक्या व भावपूर्ण शब्दांत व्यक्त झालेले दिसून येते.
शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, कर वसुली आणि अन्य अनुषंगिक कामे करत असताना पेण शहराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे अत्यंत महत्वाचे काम या संग्रहालयाच्या माध्यमातून पेण नगरपरिषदेने केले आहे. प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असे हे पेणचे गणेश संग्रहालय आहे.
सुट्टीच्या दिवशी आपणास भेट द्यावयाची असल्यास येथे संपर्क साधावा. श्री.प्रभाकर कांबळे,
मुख्याधिकारी,पेण, नगरपरिषद, पेण, दूरध्वनी क्र.०२१४३-२५२०२३, २५२८२४.
No comments:
Post a Comment