अठरा विश्वे दारिद्र्याशी झगडतांना कुटूंबातील कर्ता पुरुष सोडून गेलेला. अशाही स्थितीत खचून न जाता धीरोदात्तपणे संसाराचा गाडा पुढे रेटणाऱ्या शेतकरी विधवांच्या संसारात आशेचा किरण पसरविण्याचे काम शासन तर वेगवेगळया माध्यमातून करीतच असते मात्र काही स्वयंसेवी संस्थाही सामाजिक जाणीवेतून पुढे येत आहेत. असेच कार्य दीनदयाल या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथे नुकतेच शेतकरी विधवा महिलेला आटाचक्कीचे वाटप करण्यात आले.
दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात दीनदयाल शेतकरी विकास प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११४ कुटूंबांना दत्तक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर येथील देवी अहिल्या स्मारक समितीच्या वतीने पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथील भारती पवार या शेतकरी विधवेस आटाचक्कीचे वाटप करण्यात आले.
भारती पवार यांच्या पतीने २००८ मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांना दोन एकर शेतीवर एक मुलगा आणि एका मुलीचा चरितार्थ चालवावा लागत आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे उघड्यावर आलेल्या परीवाराला मदतीचा हात म्हणून भारती यांना ही मदत करण्यात आली.
याचप्रमाणे सायखेडा येथील मंगला कवडू शेंडे, कविता देविदास कुळमेथे, मीरा जनार्दन नवघरे या तीन शेतकरी विधवांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. तर सायखेडा येथील रेखा चंद्रकांत गुरनुले व पांढरकवडा येथील दिपमाला तुळशीराम कोडापे यांना शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कलात्मक पिशव्या कशा शिवाव्यात याचे प्रात्याक्षिक दाखविले गेले. पतीच्या आत्महत्येनंतर दीनदयाल परिवारआपल्याला लहान बहिणीप्रमाणे सांभाळत असून भाऊबीजेपासून ते सुख दु:खाच्या प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभा राहत असल्याचे यावेळी भारती पवार यांनी सांगितले.
महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहून कुटूंब व समाजाचा आधार बना असा संदेश या स्वयंसेवी संस्थेकडून दिला जात आहे. दिनदयाल संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे विधवांना आर्थिक मदत मिळाली असून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे
No comments:
Post a Comment