Monday, August 8, 2011
राजस्व अभियान ठरले विद्यार्थ्यांना लाभदायी
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त परभणी जिल्ह्यात १ मे २०११ पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजस्व अभियान राबविले जात आहे. कुठलीही योजना किंवा अभियान म्हटले की त्यात विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा विचार केला जात नाही. मात्र अलिकडच्या काळात शासनाने देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
शालेय सत्राच्या पहिल्या दिवशीच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक असो की शासनाच्या शिष्यवृत्तीचा थेट लाभ मिळण्यासाठी ई-स्कॉलरशीप योजना असो. शासनाच्या या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याला जिल्हा प्रशासनानेसुध्दा प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना राजस्व अभियानांतर्गत आपली प्रमाणपत्रे चुटकीसरशी मिळू लागली आहेत.
परभणी तालुक्यातील विविध शाळांमधील १ हजार ११५ विद्यार्थ्यांना परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजस्व अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार ज्योती पवार यांनी यशस्वीरित्या हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केल्यामुळे पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चालु शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून यासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र एका तासात वितरित करण्याचा संकल्प परभणीच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी केला. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे.
तालुका स्तरावरील विद्यार्थ्याला प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये म्हणून ८ जूनपासून हे राजस्व अभियान तालुकास्तरावर राबविण्यात आले. या अंतर्गत प्रत्यक्ष शाळांमध्ये शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या राजस्व अभियानात आतापर्यंत १ हजार ११५ विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. यात नृसिंह विद्यामंदिर पोखर्णी येथे एकूण ४० प्रमाणपत्र, पंडित जवाहरलाल नेहरु विद्या मंदिर सिंगणापूर १०, कै. गणपतराव रेंगे पाटील विद्यालय, असोला १०, गोपिनाथ विद्यालय पिंगळी ४९, कै. बाबारावजी पाटील विद्यालय झरी ४, कै. बापुसाहेब जामकर विद्यालय दैठणा ८७, तहसील कार्यालय तथा सेतू सुविधा केंद्र, परभणी ८५४, कै. हरिबाई वरपुडकर महाविद्यालय पेडगाव ६०, सरस्वती विद्या निकेतन महाविद्यालय, कारेगाव १० अशा एकूण १ हजार ११५ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. एकूण दाखल प्रकरणांपैकी फक्त १२६ प्रमाणपत्र प्रलंबित असून विद्यार्थ्यांच्या हितासह एकूण ११ बाबींचा समावेश असणाऱ्या राजस्व अभियानाचे काम जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment