बचत गट चळवळीमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. या चळवळीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे राहिले. पुरुष मंडळीदेखील बचत गटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. 'एकमेका साह्य करू'च्या तत्वाला अनुसरून विविध व्यवसाय यशस्वीपणे सांभाळतांना त्यांच्यातील एकोप्याची भावनादेखील वृद्धींगत होत आहे. अशीच प्रेरणा घेऊन रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील पालशेतच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन कल्पवृक्ष कृषी स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना केली आणि हा बचत गट त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने 'कल्पवृक्ष' ठरला आहे.
गुहागरपासून १० किलोमीटर अंतरावर पालशेत गावात शहरी वातावरणाचा प्रभाव जाणवतो. अशा वातावरणात बचत गटाची संकल्पना रुजविणे तसे कठीणच. मात्र पंचायत समितीच्या गजेंद्र पवनीकर यांच्या मार्गदर्शनाने काही ग्रामस्थ प्रभावित झाले. सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २००६ मध्ये कृषी स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली. गटाच्या स्थापनेपूर्वी ही मंडळी इतरांच्या शेतात ठिबक सिंचनाचे काम करीत. बचत गटाच्या माध्यमातून आपल्या मालकीच्या शेतात कष्ट करण्याच्या प्रेरणेने ते गटशेतीकडे वळले.
गटातील सदस्यांनी दरमहा १०० रुपये बचत करण्यास सुरुवात केली. शेकडा दोन टक्के दराने सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा फिरता ठेवला. जानेवारी २००८ मध्ये बचत गटाचे प्रथम मुल्यांकन होऊन गटाला २५ हजाराचा फिरता निधी मिळाला. त्याचा वापरदेखील अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी करतांना न चुकता कर्जाची परतफेड करण्यात आली. हिशेबही चोख पद्धतीने ठेवण्यात आल्याने द्वितीय मुल्यांकनात गटाला केळी लागवडीसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यापैकी अडीच लाख अनुदान व अडीच लाख बँक कर्जाच्या रुपात देण्यात आले.
अडीच एकर जमीन भाडेपट्टयाने घेऊन केळीची लागवड शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. स्वत:च्या मालकीच्या शेतात कष्ट करतांना सदस्यांमध्ये विशेष उत्साह होता. सूक्ष्म पद्धतीने शेतीची माहिती घेऊन कामांचे नियोजन करण्यात आले. केळीचे उत्पादन घेतांना न चुकता दरवर्षी २५ हजार रुपयांचा कर्जाचा हप्तादेखील नियमितपणे देण्यात आला. फयान वादळाच्यावेळी पिकाचे नुकसान झाल्याने त्यावर्षी मात्र गटाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातून सावरत बचत गटाने आता चांगली आर्थिक घडी बसविली आहे. दरवर्षी पाऊणे दोन लाख रुपये शेतीपासून उत्पन्न मिळत असल्याचे बचत गटाचे सदस्य संदिप वजरेकर यांनी सांगितले.
प्रारंभी केळी यलो बनाना म्हणून ठाणे येथील बाजारात पाठविण्यात येत होत्या. मात्र स्थानिक बाजारात केळीला चांगला भाव आल्याने त्यांची विक्री जिल्ह्यांतर्गतच केली जात आहे. शेतीचे क्षेत्र आणखी एक एकराने वाढविण्यात आले असून त्याचा आणखी विस्तार करण्याचा मनोदय वजरेकर यांनी बोलून दाखविला. बचत गटाने जलसाक्षरता, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यासारख्या सामाजिक कार्यातही सहभाग घेतल्याने गावकऱ्यांच्याचेही सहकार्य त्यांना मिळविता आले. गावातील इतरही शेतकऱ्यांना बचत गट स्थापनेसाठी गटाचे सदस्य मार्गदर्शन करीत आहेत.
'केल्याने होत आहे रे...' याचे उदाहरण इतरांसमोर ठेवीत बचत गटाच्या सदस्यांनी सभोवतालच्या परिस्थितीला अनुरुप शेतीचा आदर्श प्रस्तूत केला आहे. त्यामुळेच २०१०च्या राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजने अंतर्गत गटाला जिल्हा स्तरावरील द्वितीय पुरस्कार मिळाला. पुरस्कारामुळे बचत गटाच्या सदस्यांचे मनोबल वाढले असून केळीचे उत्पादन अधिक वाढविण्यावर या बचत गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. बचत गटाचे यश परिसरातील इतर शेतकऱ्यासाठी प्रेरक ठरले आहे.
No comments:
Post a Comment