Thursday, August 4, 2011

श्रावणात घन निळा बरसला. . .

नागपूरातील सगळ्यात गर्दीचा भाग म्हणजे सीताबर्डी. असंच गर्दीतून वाट काढत असताना दोन व्यक्तीतील संवाद कानावर पडला. “अरे तू काही सांगू नकोस तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी ” मला हे वाक्य ऐकतांना गंमतच वाटली. आपला अनुभव किती आहे हे सांगण्यासाठी सुद्धा पावसाळा ऋतुची मदत घ्यावी लागते. होय ना? 

श्रावण सुरु होतो तेव्हा तर पावसाळ्यातील सर्वात आल्हादायक वातावरण असतं. वृत्तपत्रात काम करत असताना आम्ही नेहमी गंमतीने म्हणायचो पावसाळा सुरु झाला की पावसाच्या कवितांचा, लेखांचा अगदी महापूर येतो. मात्र सर्वाधिक जर कशावर लिहिल्या जात असेल तर पहिला पाऊस, पहिली आठवण, पहिलं प्रेम... (खर म्हणजे ह्या गोष्टी अगदी बा‍लिश वाटणारेही यावरील साहित्य मात्र आवडीने वाचत असतात.) ऋतु जरी तीन असले तरी श्रावण हा हिरवा ऋतूराजच आहे. 

श्रावणाला श्रावण सोमवारपासून सुरुवात होते. मग जी सणांची मांदीयाळी सुरु होते ती सणांची सम्राज्ञी म्हणजे दिवाळी येईपर्यंत. दिवाळी एकदा गेली की सणांचा महोत्सव संपला. अनेक सणांचा गुलदस्ता स्वातंत्र्य दिनासारखा राष्ट्रीय उत्सव पिकांना संजीवनी देणारा पाऊस या सगळ्यांचा विविधरंगी मिलाप घेऊन श्रावण येतो. भक्तीभावाचा श्रावण येताना आपल्यासोबत गृहीणींसाठी अनेक व्रतवैकल्य घेऊन येतो. जुन्या प्राचीन ग्रंथामध्ये श्रावणात केलेल्या धार्मिक विधीला महत्व दिलेलं आहे. हा श्रावण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला राखी बांधून जातो, तर राबराब राबणाऱ्या शेतकरी राजाच्या मित्राला म्हणजेच बैलाला कृतार्थतेनं जेवायला यायचं निमंत्रण देतो. पोळ्याला आमच्या वऱ्हाडात तर अगदी लहान लहान मुलांपासून प्रत्येकजण गावात बैलाला आदरान निमंत्रण देताना म्हटलं जात ‘आज आवतन घ्या... उद्या जेवायला या.’ असा हा श्रावण सगळ्या महिन्यांपेक्षा आवडतो. कारण यामध्ये येणारा पाऊस हा ‍िरम‍झिमणारा, शांत सरीत येणारा, संगीतातील एखाद्या वाद्यांसारखाच असतो. पश्चिमेतील बिथोवेनसारख्या संगीतकारांनी वनात जाऊनच उच्चस्तरीय संगीताची निर्मिती केले असल्याचे संदर्भ सापडतात. 

कविता खूप असल्या तरी पावसावरची रविद्रनाथ टागोरांची बिष्टी पोडे टापूर टुपुर... नदेय एकलो बान! यातील बिष्टी शब्दाचा अर्थ वृष्टी होतो आणि नदेय एकलो बान म्हणजे नदीला आला पूर. पावसाच्या अनेक कविता तोंडपाठ असतानाही मला हीच कविता का आवडते कारण यातली नादमयता. टापूर टुपुर ह्या शब्दांमध्ये पावसाचा थेंब जमिनीवर पडण्याचा आवाज किती सुंदररित्या सांगितल्या आहे. शब्दकळा खरा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवतात. वऱ्हाडी भाषेत तर पाऊस कसा आला असा प्रश्न विचारत नाही. तर पाणी किती आलं अस विचारतात. आणि याच्या उत्तरात पावसाचे वर्णन करणारे शब्द कसे असावे, तर वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ सांगतात पाणी सापकसुपक, मुरतोनी, डबरोनी आल. मुरतोनी म्हणजे जमिनीत मुरेल इतपत. तर डबरोनी म्हणजे ज्याच्यात डबके साचतात. 

शाळा-कॉलेजमध्ये असताना श्रावण आवडायचा कारण सुट्या जास्त मिळायचा. एरवी पाण्याच्या बाबतीत लिहियाचे झाल्यास नदीचे आत्मकथन, महापूर असेच विषय आठवतात. असा हा श्रावण सृष्टीला नवीन शालू नेसवतो. इंद्रधनुष्याचे नवीन रंग वातावरणात पसरवतो. सगळ्यांमध्ये चैतन्य, उत्साह आणतो. आणि अशातच कानावर शब्द पडत असतात..श्रावणात घन निळा बरसला. . . .



  • शैलजा वाघ- दांदळे
  • No comments:

    Post a Comment