नागपूर हे भौगोलिकदृष्ट्या भारतातील मध्यवर्ती ठिकाणी आहे, अमेरिका, युरोप व मध्य आशिया देशांशी आणि पूर्वेकडील देश चीन, जपान व ऑस्ट्रेलिया यामध्ये महत्वाचा दुवा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ, (मिहान) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र महाराष्ट्र विमानतळ विकास या कंपनीची २६ ऑगस्ट २००२ रोजी स्थापना करण्यात आली.
मिहान प्रकल्प नागपूर विदर्भ विभागाचा अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण असून विदर्भ विकास कार्यक्रमात हा प्रकल्प अंतर्भूत करण्यात आला आहे. मिहान प्रकल्पांतर्गत सर्व बाधितांचे पुनर्वसन करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव २० जुलै २००५ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे सादर करण्यात आला.
१२ एप्रिल २००५ रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यबल समितीच्या झालेल्या बैठकीत मिहान प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे मिहान प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची योजना तयार करावी, असे निर्देश दिले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ११ डिसेंबर २००७ रोजी मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची योजना जाहीर केली. या योजनेत प्रकल्पग्रस्तांसाठी नागरी सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मिहानजवळील सेझसाठी पुनर्वसित होणाऱ्या चार गावांसाठी खापरीजवळील शंकरपूर रस्त्यावर पुनर्वसन वसाहत उभी होत आहे. त्यामध्ये ६८० घरे पूर्णत: बांधण्यात आली आहे. अन्य १९ सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या सुविधा उभारणीचे काम ९५ टक्के पेक्षा जास्त झाले आहे.
मिहान व सेझ या प्रकल्पासाठी पाच गावे पूर्ण व सहा गावे अंशत: पुनर्वसित होणार आहेत. त्यापैकी खापरी रेल्वे, दहेगाव, तेल्हारा व कलकुही या गावांसाठी मिहानला विकसित करणारी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) खापरीजवळील शंकरपूर रस्त्यावर पुनर्वसन वसाहत उभी करीत आहे.
रेटॉक्स कंपनीकडे या वसाहतीतील बांधकामाचे कंत्राट आहे. करारानुसार एमएडीसीने रेटॉक्सला या बांधकामासाठी पैशाऐवजी ४५ एकर जमीन विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे. खापरी रेल्वे, दहेगाव, तेल्हारा व कलकुही या चार गावांमधील ६८० घरे तेथील २५ एकर जमिनीवर वसविली आहे. प्रत्येकासाठी ३०० चौरस फुट क्षेत्रफळाचे घर बसविले जाणार आहे. त्यानुसार पुनर्वसन वसाहतीमध्ये घरांसह १९ सुविधा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, दुकाने, ग्रामपंचायत कार्यालय, प्रसूतीगृह, खेळाचे मैदान, बाजार, इमारत आदींचा समावेश आहे. या सर्वच सुविधांची कामे तेथे सुरु आहे. मात्र घरांच्या उभारणीला प्राधान्य दिले जात आहे.
६८० घरे पूर्ण बांधून झाली आहेत. त्यांच्या रंगरंगोटीसह ती घरे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित घरे प्राथमिक स्तरावर आहेत. पुनर्वसन वसाहतीतील २० ते २२ किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण आहेत. त्याचे डांबरीकरणही झाले आहे. पाणी पुरवठ्याची सोय देखील वसाहतीच्या उभारणीत प्राधान्याने सुरु आहे.
या वसाहतीमध्ये प्रत्येकी १.५ लक्ष लिटरच्या दोन टाक्या उभारल्या आहेत. मिहान-सेझ प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या योजनेद्वारेच येथे पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी वडगाव धरणातून विशेष जलवाहिनीद्वारे पाणी सेझमधील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले आहे. तेथून पुनर्वसन वसाहतीसाठी या दोन टाक्यांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या उभारणी, रस्ते व पाणी पुरवठ्याची सोय यांना प्राधान्य दिले जात आहे. उर्वरित सुविधांची उभारणी देखील सुरु आहे. येथील गावांचे पुनर्वसन आदर्श पद्धतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment