सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ तालुक्यातील झाराप येथील पाकिजा स्वयंसहायता महिला बचत गटाने दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन, भाजीपाला लागवड शेळीपालन आदी व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले आहे.
पाकिजा महिला बचत गटाची स्थापना २८ एप्रिल २००७ मध्ये करण्यात आली. झाराप गावात भात, कुळीथ, नाचणी यासारखी पिके घेतली जातात. या गावात वायंगणी शेतीही केली जाते. गावामध्ये दुग्ध व्यवसाय तसेच विट व्यवसाय केले जातात. मुंबई-गोवा या महामार्गावर गाव असल्याने कलिंगड, ऊसाचा रस इ.विक्री केल्यास छोटे-मोठे व्यवसाय केल्यास आपली खऱ्या अर्थाने प्रगती होईल म्हणून झाराप मुस्लीमवाडीतील १२ महिलांनी एकत्र येत आपला एक स्वतंत्र महिला बचत गट असावा असा निश्चय केला. गोमुख संस्था कुडाळ तालुका संघटक विजय कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८ एप्रिल २००७ मध्ये पाकिजा स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची स्थापना केली.
बँकेत केलेल्या बचतीमधून सुरुवातीला औषधोपचार, मुलांच्या शिक्षणाला, घर बांधणीसाठी, लग्नसमारंभासाठी आदी यांनी कर्ज स्वरुपात रक्कम मिळू लागली. या बचतगटाला ६ महिने पूर्ण झाल्या नंतर गोमुख संस्थेने पंचायत समिती मार्फत गटाचे पहिले मूल्यमापन ३१ आक्टोंबर २००७ रोजी करुन फिरता निधी २० हजार रु. वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेने मंजूर केले. या निधीतून पाकिजा महिला बचतगटातील महिलांनी कुक्कुटपालन, भाजीपाला लागवड व विक्री, शेळीपालन आदी व्यवसाय सुरु केले. या व्यवसायाच्या माध्यमातून या गटाला काही प्रमाणात आर्थिक प्राप्ती झाली.
या बचतगटातील महिलांनी शेती व्यवसायाबरोबर दुग्धव्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या दुग्धव्यवसायासाठी कुडाळ पंचायत समितीमार्फत व गोमुख संस्था पुणे क्षेत्रीय कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने गटाच्या अध्यक्षा निलोफर अब्दुल करीम शेख यांच्या घरी सुमारे ५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाला विजय कोरगावकर व विस्तार अधिकारी भरत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
पाकिजा महिला बचत गटाच्या प्रस्तावावरुन गटाचे दुसरे मुल्यमापन करण्यात आले. मूल्यमापनानंतर या बचतगटाला वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेने ३ लाख रु. मंजूर केले. त्यामध्ये १ लाख १० हजार रु. अनुदान व रु. १ लाख ९० हजार बँक अर्थसहाय्य दिले. यामधून सुरुवातीला १२ म्हशी खरेदी केल्या व मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरु केला.
पाकिजा महिला बचतगटाकडे एकूण ३० म्हशी असून दर दिवशी सुमारे ५० लिटर दूध डेअरीमध्ये व सावंतवाडी येथे विक्रीसाठी नेले जाते. म्हशींचा चारा, खाद्य, वेळोवेळी होणारी तपासणी व बँकेचा हप्ता भरता प्रति महिना ८ ते १० हजार रुपयांचा फायदा होत असतो. गोमुख संस्थेचे व कुडाळ पंचायत समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही एवढी गरुड झेप घेवू शकतो. असे मत या गटाच्या अध्यक्षा निलोफर अब्दुल करीम शेख यांनी व्यक्त केले.
पाकिजा महिला बचतगटाने दुग्धव्यवसायाबरोबर लाल भाजी, मुळाभाजी, दोडकी, पडवळ, कारली, भेंडी, मिरची, नाचणी, भुईमूग, कुळीथ तसेच पावसाळी भातशेतीबरोबर उन्हाळी वायंगणी शेतीतूनही आर्थिक उन्नती साधली आहे. या गटाने उत्पादित केलेली भाजी कामळेवीर, सावंतवाडी बाजारपेठेत तसेच मुंबई-गोवा महामार्गावर विक्रीसाठी ठेवण्यात येते. तसेच कुक्कुटपालन व शेळीपालनातूनही आर्थिक् कमाई करत असतात. या कुक्कुटपालन व शेळीपालनास झाराप पंचक्रोशीत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पंचक्रोशीत होणाऱ्या लग्नसराईनंतर पाचपरतवानाला मुंबईहून येणाऱ्या चाकरमानी, गटारी अमावास्ये शिवाय सावंतवाडी, कामळेवीर, होडावडा, तळवडा आदी बाजारपेठांमधून कोंबडी व शेळीच्या मटणासाठी मोठ्याप्रमाणावर मागणी असते. या व्यवसायात अति उष्म्यामुळे कोंबडी तर अज्ञात रोगाने शेळी पिले मरण पावतात. त्यामुळे काही वेळा नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे या गटाच्या उपाध्यक्षा आरिफ जद्दी यांनी सांगितले.
पाकिजा महिला बचतगटास सन २००९ मध्ये तालुकास्तरीय व्दितीय क्रमांकाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बचतगटातील सर्व सदस्यांना वेळोवेळी घरातील पुरुषांप्रमाणे वाडीतील व गावातील ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक कुडाळ तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भरत ठाकूर व आनंद कुंभार गटविकास अधिकारी आर.के.जोशी, गोमुख संस्थेचे विजय कोरगावंकर, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक सरपंच, कुडाळचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य मिळत असल्याने बचतगटातील सर्व महिलांनी सांगितले.
पाकिजा महिला बचतगटाच्या अध्यक्षपदी निलोफर शेख, उपा-आरिफ जद्दी , ताईराम जद्दी, शमशाद जद्दी, मूमताज जद्दी, जैतून जद्दी, नूरजहाँ जद्दी, नैरुननिसा खान, जरिना आजरेकर, मुबीना आजगावकर व सुरेखा भैर या सर्व सदस्य दारिद्र्यरेषेखाली असून आपल्या व्यवसायात तळमळीने सहभाग घेऊन यशस्वीरित्या व्यवसाय सांभाळत आहेत.
No comments:
Post a Comment