Monday, August 29, 2011

चळवळ कुपोषण मुक्तीची

नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे कुपोषणा विषयीच्या घटना वारंवार ऐकायला , वाचायला मिळतात. खरतर कुपोषण हा आजार नसून समाज व्यवस्थेतील चालीरीती, परंपरा, अंधश्रध्दा आणि अज्ञान यामुळे निर्माण झालेली समस्या आहे असे वाटते. विशेषत: लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आढळते. असे का घडते याची कारणे शोधून त्यावर उपाययोजा करणे अपेक्षित आहे. ही समस्या निवारणासाठी समाजात व्यापक स्वरुपात जनजागृतीची चळवळ आरोग्य यंत्रणे समवेत स्वयंसेवी संस्थांनी समन्‍वयातून उभारली पाहिजे.


कुपोषणाची कारणे

राज्यामध्ये कुपोषणाच्या बाबतीत मेळघाटमधील कुपोषण नेहमीच चर्चेत असते. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्याचा समावेश मेळघाट परिसरात होतो. या तालुक्यातील ग्रामीण भागात, दुर्गम भागात, विशेषत: आदिवासी गाव आणि पाडयामध्ये कुपोषीत बालके आढळतात. या भागातील आदिवासी समाजात अज्ञान आणि अंधश्रध्दा मोठया प्रमाणावर आहे. मूल किंवा कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली तर औषधोपचारापेक्षा त्या मुलांच्या पालकांचा, कुटुंबाचा विश्वास अंधश्रध्देच्या माध्यमातून भोंदू बाबावर अधिक असतो. औषधोपचार घेण्याकडे त्यांचा कल दिसून येत नसल्यामुळे कुपोषणाला वाव मिळतो.

बाल विवाहाची प्रथा ही देखील कुपोfषित मुलाला जन्म देण्यास कारणीभूत ठरते. या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण, महिलांचे शिक्षण हा अभाव आहे. त्यामुळे मुला-मुलींचे योग्य वयात विवाह करण्याचा विचार न करता बाल वयातच लग्न करण्याची प्रथा आढळून येते. कमी वयात लग्न झाल्यामुळे त्या बालकाच्या आईचा अशक्तपणा, मुलाचे संगोपन करण्याची क्षमता, आर्थिक स्थिती आदि कारणामुळे गरोदरपणात मातेला देण्यात न येणारा पुरक आहार हा देखील कुपोषणाला बाधक आहे. वास्तविक पाहता जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर मातांची तपासणी, त्यांना आहार व औषधोपचार दिला जातो. मात्र या बाबीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे असे कुपोषण वाढीस लागते.

सामाजिक मन परिवर्तन

राज्यातील दुर्गम भागात दारिद्रयामध्ये जीवन जगणाऱ्या कुटुंबामध्ये कुपोषणाची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येते. ह्या कुपोषण मुक्तीसाठी समाजातील विविध घटकांनी मदतीचा हात पुढे करण्याची खरी गरज आहे. सुदृढ, सधन, सुशिक्षीत कुटुंबांनी कुपोषीत बालकांसाठी तन मन धनाने सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. सामाजिक मत परिवर्तनासाठी तसेच कुपोषीत कुटुंबांच्या प्रबोधनासाठी आरोग्य मेळावे आयोजित करणे व या मेळाव्यांना ग्रामस्थांना उपस्थित ठेऊन आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती पोहोचविणे, अंधश्रध्देविरुध्द त्यांचे मत परिवर्तन करणे, आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेली आचार संहिता काय करावे काय करु नये याबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करणे योग्य ठरेल.

कुपोषित बालकांसाठी उपाय योजना

राज्यातील कुपोषित मुलांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी नवसंजिवनी हि महत्वाकांक्षी योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत १५ जिल्ह्यात ८३ ग्रामीण कुटीर रुग्णालये, ३९१ प्राथमिक आरोग्य केंद्र, ७८ प्राथमिक आरोग्य पथके, ५२ फिरती आरोग्य पथके कार्यरत आहेत. सुमारे ८५५७ पाडयांना आणि ८१०९ गावांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

जिल्हा प्रशासन सज्ज

अमरावती जिल्ह्यात मेळाघाटसह कुपोषित बालकाची श्रेणी सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी रिचा बागला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील कुपोषित मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांची श्रेणी सुधारण्यासाठी आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत ९०४ ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सप्टेंबर २०१० पासून या केंद्रातून ८२७३ बालकांवर विशेष उपचार करण्यात आले आहेत. ३० दिवसाच्या औषधोपचारांनतर ७११३ बालकांच्या वजनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले.

जिल्हा परिषदेच्या वतीने दुर्गम भागातील आजारी मुलांना रुग्णालयात तातडीने आणता यावे व त्याला औषधोपचार मिळावे या दृष्टीकोणातून १३ नवीन मोटर वाहने मेळघाटात रवाना करण्यात आली. बाल मृत्यूचा दर कमी होण्यास हा उपक्रम लाभदायी ठरेल.

प्रशासनाच्या वतीने कुपोषित बालकांच्या उपचारासाठी उपाययोजना सातत्याने सुरुच असतात. तरी देखील दुर्गम भागातील या नागरिकांनी मुलांच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समाजात असलेल्या भ्रामक कल्पना, अंधश्रध्दा, अघोरी उपाय आदि प्रकारांना तिलांजली दिली पाहिजे व आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येणे अपेक्षित आहे.

  • अशोक खडसे 

  • No comments:

    Post a Comment