Thursday, August 11, 2011

अंधमहिलांचे आर्थिक पुनर्वसन


नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड इंडिया अंध महिला विकास समितीची स्थापना २००२ मध्ये झाली. या संस्थेच्या प्रमुख सौ.वृंदा थत्ते आहेत. ही संस्था अलिबाग व मुरुड तालुक्यात कार्यरत असून १८ ते ५० वयोगटातील अंधमहिलांना आर्थिक सहाय्य करुन त्याच्या पुनर्वसनाचे काम करते. प्रत्येकाच्या गरजेनुसार महिलांना व्यवसाय दिला जातो. या व्यवसायामध्ये बांबू पासून टोपल्या बनविणे व विविध वस्तु बनविणे, राख्या, पणत्या, पाकिटे, मेणबत्या, पुष्प गुच्छ, शोभिवंत मेणबत्या या संस्थेत अंध महिला बनवित असतात. तसेच दीपावली निमित्त आकाश कंदिल सुद्धा तयार केले जातात.

या संस्थेमध्ये एकूण १०८ महिला काम करत असून या महिलांना दररोज ७५/- रु. मजुरी देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्या महिला संस्थेमध्ये येऊ शकत नाहीत. अशा अंध महिलांच्या घरी जाऊन संस्थेचे शिक्षक त्यांना प्रशिक्षण देवून वस्तू बनवून आणतात. बऱ्याच महिलांनी मेणबत्तीचे व्यवसाय सुरु केले आहेत.आज पर्यंत या व्यवसायातून सुमारे २० ते २५ अंध महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. या संस्थेकडून महिलांनी व्यवसायासाठी मदत करण्यात येते व विक्री केलेल्या मालातून त्यांना उत्पन्न मिळते. या संस्थेतील महिलांना रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मेणबत्ती, खडू, काथ्यापासून पायपुसणी, स्क्रिन पेंटींग असे विविध प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही महिलांना जिल्हा परिषदेने १०,०००/- रुपये अनुदान व्यवसायासाठी दिले. तसेच काही महिलांना शेतीकरिता बी,बियाणे औजारे घेण्यासाठी अनुदान देण्यात आले.

श्रीमती गुलाब विनायक पाटील-काथ्यापासून पायपुसणे बनविणे यासाठी संस्थेकडून मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमती श्रुतिका पाटील-या महिला घरी बसून मेणबत्त्या, कृत्रिम फुले बनवितात. शोभना गायकवाड - या महिला भाजीच्या व्यवसाय करतात. त्यांना या व्यवसायासाठी अनुदान मिळाले आहे. संस्थेच्या संचालिका सौ.वृंदा थत्ते यांना रायगड भूषण, महाराष्ट्राची सुकन्या व राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार (नाशिक) तसेच चेंढरे सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सौ.थत्ते या एम.ए.(समाजशास्त्र) या विषयांच्या पदवीधर आहेत. मधुबन महिला मंडळाकडून या संस्थेस अंध महिलांना चॉकलेट उत्पादनासाठी फ्रिज भेट म्हणून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment