जालना जिल्ह्यातील घोडेगाव येथील रहिवाशी रामभाऊ सखाराम मोहिते यांच्याकडे ३.५ एकर कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीत मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कापूस या पिकांच्या उत्पन्नातून त्यांच्या गरजा पूर्ण होणे कठीण होते.
सन १९९३-९४ मध्ये त्यांनी जालन्याजवळ असलेल्या कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे कामगार म्हणून रोजंदारी सुरु केली. याच रोजंदारीबरोबर ते शेतीचेही धडे घेऊ लागले. तसेच या केंद्रातील विज्ञान मंडळाचे सदस्य झाले. कोरडवाहू शेतीत काहीतरी वेगळे करुन दाखवावे, असे त्यांनी ठरवले. नदीकाठी असलेल्या जमिनीत स्वकष्टाने विहीर पूर्ण करुन त्या पाण्यावर बागायत कापूस, गहू यासारखी पिके घेऊन कोरडवाहू जमीन पूर्ण बगायती केली.
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या क्षेत्रावर मातृवृक्षाची लागवड करुन रोपे व कलमांची निर्मिती सुरु केली. यातूनच पुढे कृषी विभागाकडून रोपवाटिकेचा परवाना मिळवून 'अनुसया फळरोपवाटिका' सुरु केली. तसेच गांडूळ खत प्रकल्प उभा करुन स्वत:ची गरज भागवून गांडूळ खताची विक्री करु लागले.
आई-वडिलांनी आकार दिला, भाऊ लक्ष्मण व जावजय यांनी साथ दिली. तसेच पत्नी निरक्षर असूनही नेहमीच माझ्या कामात साथ देत आहे, असे सांगून श्री मोहिते यांनी आपल्या यशाचे सहस्य उलगडले. कृषी विज्ञान केंद्र, सामाजिक वनीकरण व कृषी विभाग यांनी मला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच माझी प्रगती व आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असेही ते अभिमानाने सांगतात.
No comments:
Post a Comment