Sunday, August 14, 2011

धानोरा गावात अवतरली दूधगंगा

लहान शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असते. त्यामुळे शेतीच्या व्यवसायाला अशा शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासारख्या पूरक व्यवसायाची जोड दिली तर त्यांच्या आर्थिक उत्पनात निश्चित भर पडू शकते. दुधाचा व्यवसाय हा रोज नगदीचा व्यवहार असल्यामुळे दररोज खिशात पैसा खुळखुळतो आणि हेच मर्म ओळखून यवतमाळ जिल्ह्यातील धानोरा (ता. उमरखेड ) येथील शेतकऱ्यांनी बालाजी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून रोज २५० ते ३०० लिटर दुग्धोत्पादनाव्दारे दुधगंगेची निर्मिती केली आहे. त्यामुळे आज या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.

उमरखेड या तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किलोमीटर अंतरावर धानोरा हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. बहुतांश लोकांचा शेती व शेतमजुरी व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा असल्याशिवाय प्रगती नाही याची जाणीव येथील शेतकऱ्यांना असल्यामुळेच या गावात १९८२ मध्ये बालाजी दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन झाली. या संस्थेचे ६५ सदस्य आहेत. सुरुवातीस दररोज केवळ १० लिटर दूध संकलन व विक्रीस प्रारंभ झाला. आज या गावामध्ये १५० संकरित गाई, १०० गावराण गाई आणि २५ म्हैसींच्या उपलब्धतेमुळे सुमारे २०० ते २५० लिटर दुधाचा पुरवठा दररोज शासकीय दूध डेअरीला करण्यात येतो.

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत आता एकात्मिक दुग्ध विकास प्रकल्पाव्दारे दुग्ध विकासाला चालना दिली जात आहे. धानोरा येथील बालाजी दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवड या प्रकल्पासाठी झाली. संस्थेतील ५० लाभार्थ्यांची निवड करुन प्रत्येक लाभार्थ्याला २ या प्रमाणे १०० गाई ५० टक्के अनुदानावर वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकल्पासाठी ४७ लाख १३ हजार रुपये खर्च होत आहे. त्यामध्ये गाईसाठी निवारा, वैरण गोडावून, पशूखाद्य, जनावरांच्या आरोग्याची देखभाल, दूध मशिन, एक हजार लिटर क्षमतेचा बल्क कुलर, संगणकीय वजन प्रणाली आदी सुविधांच्या समावेशामुळे शास्त्रोक्त पध्दतीने दूध संकलन शक्य आहे.

या दुग्ध प्रकल्पाच्या उभारणीसाठी संस्थेने योजनेतील तरतुदीप्रमाणे दोन एकर शेत जमीन लिजवर घेतली. याठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी, गाईसाठी निवारा, वैरण गोडावून, १०० वासरांकरिता निवारा, कार्यालय, संगणक बल्क कुलर या बाबी तयार करुन घेतल्या आहेत. दूध उत्पादकांनी एकत्र येऊन मुक्त गोठा पध्दतीने दुग्ध व्यवसाय करावा हा मूळ उद्देश या प्रकल्पाचा आहे.

या दुग्ध प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्य प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. गुरांना वैरणीची व्यवस्था असणे ही अत्यंत महत्वाची बाब असल्याने या संस्थेने हिरव्या चाऱ्यासाठी १६ एक जमीन भाडे तत्वावर घेतली आहे. या ठिकाणी उत्पादित चारा गोठ्यातील गाईसाठी उपयोगात येऊ शकतो. गाईंना मुबलक प्रमाणावर हिरवा चारा मिळाल्याने दुधात वाढ तर पशुखाद्याच्या खर्चात बचत होत आहे.

सध्या या प्रकल्पाअंतर्गत चांगल्या दर्जाच्या २० संकरित गाई सदस्यांना पुरविल्या आहेत. या गाई खरेदीनंतर आठ- दहा दिवसातच या गाईंनी चौदा कालवडी आणि पाच गोऱ्हे दिले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात २०० ते २५० लिटरची वाढ झाली. पूर्वी प्रत्येक दूध उत्पादकाला ४ ते ५ लिटर दूध विक्रीतून ८० ते ९० रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र आता या प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या मिळालेल्या २० संकरित गाईंमुळे सुमारे १५ ते २० लिटर दुधापर्यंत वाढ झाली. त्यामुळे प्रत्येकाला दररोज ३०० ते ३५० रुपये अर्थात महिन्याला १० हजार रुपये मिळू लागले आहेत. या प्रकल्पातील उर्वरित गाई लवकरच उपलब्ध झाल्यानंतर धानोरा गावातून दररोज १००० ते १२०० लिटर्स दूध पुरवठा होत राहील आणि या दूधगंगेच्या माध्यमातूनच या शेतकऱ्यांची गंगाजळी भरेल असा विश्वास वाटतो.


  • अशोक खडसे

  • No comments:

    Post a Comment